News Flash

प्रेम करा खाण्यावर, खाण्याच्या पद्धतीवर!

भूक नसताना खाल्लेलं अन्न पचनाला हानिकारक असतंच पण त्यात पोटोबासुद्धा रुसून बसतात.

प्रेम करा खाण्यावर, खाण्याच्या पद्धतीवर!
आपल्या आहारावर प्रेम करत खाल्लं तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि त्या आहारामुळे शरीराचं पोषणही चांगलं होतं.

पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

खावे नेटके
आहारशास्त्र आणि खाद्यप्रेम हे समीकरण अगदीच विरोधाभास निर्माण करणारं आहे. पण आपल्या आहारावर प्रेम करत खाल्लं तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि त्या आहारामुळे शरीराचं पोषणही चांगलं होतं. त्यासाठी हे पत्र तुम्ही वाचाच!

प्रिय खवय्यांनो,

असं म्हणतात की जेवण प्रेमाने तयार केलं की ते चविष्ट होतं. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ असं म्हटलं जातं. पण आहारशास्त्र मात्र ‘प्रेमाने खाणार त्याला आरोग्य लाभणार’ असं म्हणतं.

सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाता. वेगेवेगळी द्रव्यं पिता. पण वेळ आणि खाण्याचं समीकरण मात्र जमता जमत नाही. मग हळूहळू सतावते ती वारंवार होणारी अ‍ॅसिडिटी, मलावरोध, थकवा, अपुरी झोप आणि वाढणारी ढेरी.. मग सुरू होतो गुगल शोध (गुगल -ए -आझमचा काळ आहे ना!)

सोपे आणि सुटसुटीत उपाय शोधता शोधता या उपायांमुळेच आपण कधी आणि कसे गुटगुटीत होऊ लागतो हे लक्षात येत नाही. मग वाटतं का या डाएटच्या मागे लागायचं? त्यापेक्षा मी सगळंच काही खाईन.

अचानक गोड किंवा अतिशय तिखट खाणं वाढतं. वेळेचं आणि खाण्याचं समीकरण बिघडतं. रक्त तपासणीमध्ये वाढलेलं कोलेस्टेरॉल, साखर, यकृतातील द्रव्ये ठळक होतात आणि या सगळ्याचं खापर फोडलं जात ते आवडत्या अन्न-पदार्थावर.

तुम्ही जितक्या प्रेमाने ताटातील पदार्थ खाता..आता तुम्ही म्हणाल प्रेमाने म्हणजे? आम्ही प्रेमाचं असतं तेच खातो. नावडतं काही खातच नाही मुळी. पण कसं आहे प्रेमाने खाणं म्हणजे चवीचवीने वेळ घेऊन खाणं. सोप्या शब्दात सांगायचं तर, अन्न नीट चावून चावून खाणं. हो त्यासाठीच तर दात दिलेत आपल्याला!  आज नाश्ता किती वेळात खाल्लात ते आठवून पहा बरं.. १५ मिनिटं? की पाच मिनिटं? अन्न नीट चावून खायला हवं कारण तसं खाल्लं तरच ते पचायला हलकं होतं.

आपण नेहमी डाएट संदर्भात पाश्चात्त्य देशातील संशोधनाबद्दल वाचतो. उदाहरणार्थ, हे अन्नपदार्थ तब्येतीला वाईट किंवा अमुक प्रकारचं अन्न शरीरासाठी उपायकारक असतं. पण कधी डाएट किंवा आहार या शब्दाचा अर्थ जाणून घेतलाय का? अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि आपल्याकडेच नाही तर पाश्चात्त्य देशातसुद्धा डाएट किंवा आहार ही सुकर जीवनाचा मार्ग दाखवणारी संस्कृती आहे.

मग आपण आडवळण का बरं घ्यावीत?

प्रत्येकाने आपापलं आहारस्वातंत्र्य जपायला हवंच. आणि डाएट म्हटलं की कपाळावर आठय़ा येणार असतील तर ते डाएट उपयोगाचं नाहीच. तुम्ही डाएट का करताय याचा विचार करा. खरं तर प्रत्येक जण जे काही खातो ते त्याचं त्याचं डाएट असतं- रोजची खाद्यशैली. त्याला एक छान शिस्त लागली की आनंदी खाद्यशैलीतून आनंदी जीवनशैली तयार होते.

खाण्याच्या तत्त्वांपकी एक तत्त्व म्हणजे आपल्या भुकेचा मान राखणं. म्हणजे आपली गरज लक्षात घेऊन खाणं. भुकेच्या दुप्पट खाणं निरुपयोगी आणि अपायकारक असतं.

भूक नसताना खाल्लेलं अन्न पचनाला हानिकारक असतंच पण त्यात पोटोबासुद्धा रुसून बसतात.

संताप किंवा निराशा अशा नकारात्मक भावनिकतेने खाण्यापेक्षा ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या भावनेने खाणं कधीही उत्तम! कारण नकारात्मक भावनांमुळे जशी मनाची कोंडी होते तशीच नकारात्मक भावनेतून खाताना पोटाचीही कोंडी होते. हाच नियम पटापट खाऊन झटपट आवरणं याबाबतीत देखील लागू होतो.

जेवण मुळी आवरायचं नसतंच, त्याचा आस्वाद घ्यायचा असतो. खवय्ये असोत किंवा शिस्तबद्ध खाणारे, जेवणाचा गंध, स्वाद हे जाणून घेऊन खाताना एक वेगळाच आनंद होतो.

आहारशास्त्रमध्ये कसला आलाय जेवणाचा आस्वाद असं एक विचार मनात डोकावू शकतो; त्याचसाठी या गुजगोष्टी करणं आवश्यक वाटलं.

आनंदी खाण्याचा मूलमंत्र म्हणजे आनंदी वातावरणात खाणं. तुम्ही कुठेही असा, शक्यतो बसूनच जेवण करा. धावत धावत, उभ्याउभ्या जेवण टाळाच.

‘डोक्यातला ताण पोटावर दिसायला वेळ लागतो, पण तो दिसतोच!’ बसून जेवण केलं तर ते रुचकर लागतं आणि पचतंसुद्धा!

कोणत्याही स्थानिक किंवा लहानपणापासून आहारात समावेश असलेल्या अन्न पदार्थावर विनाकारण बहिष्कार टाकू नका. उदाहरणार्थ, भाताचे पदार्थ खाणाऱ्यांनी एकदम भातावर बहिष्कार टाकला तर कसं चालेल?

आपण भात आणि डाळ एकत्र खातो. कधी कढी-भात, दही-भात, वरण-भात, व्हेज बिर्याणी सोबत कोिशबीर, नॉन व्हेज बिर्याणीसोबत सलाड आणि कोिशबीर!

भातासोबत खाल्ल्या जाणाऱ्या डाळी-कडधान्ये, दूग्धजन्य पदार्थ यात प्रथिने असतात. भातातील कबरेदके आणि प्रथिने यांचा समतोल साधणं मात्र जमायला हवं.

म्हणजे भात आणि डाळ यांचं प्रमाण समान असावं आणि हो; त्यावर थोडासा िलबाचा रस असेल तर उत्तमच! पण िलबाचा रस कशासाठी ? ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी! म्हणजे तुमच्या पचनक्रियेत येणारा साखरेचा भार कमी होईल. पांढरा तांदूळ खावा की लाल की काळा हा एक महत्त्वाचा प्रश्न. मधुमेह असणाऱ्यांनी शरीरातील साखरेला पूरक अशी धान्ये खावीत. हातसडीचा तांदूळ किंवा लाल तांदूळ खायला काहीच हरकत नाही. पण अर्थात प्रमाणात खाणं आवश्यक आहे. कडधान्यं आणि उसळी नेहमी शिजवून खाणं उत्तम!

अलीकडे सलाड म्हणून कच्ची कडधान्यं सर्रास खाल्ली जातात. मग चवच नाही जेवणाला असं वाटायला लागतं. कडधान्यं पचविण्याचा प्रयत्नात अर्थातच पोटात जळजळ होणं, गॅस (वायू निर्माण होणं) होणं अशा समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी कडधान्यं नेहमी उकडून किंवा शिजवूनच खावीत.

आता वळूया फळांकडे!

डाएट म्हटलं की आपल्या गुगललाही फळांचं महत्त्व ठाऊक झालंय. त्यामुळे रोज भरपूर फळं खा असं म्हटलं की लगेच जेवणानंतर फळं खाल्ली जातात.

अहो, दिवसातून किमान दोन फळं खावीत असं म्हणतात आमच्या भाषेत; पण ती जेवणांनंतर लगेच खावीत असं कोणीही सांगितलेलं नाहीये! फळं जेवणानंतर किंवा जेवणात खाण्यापेक्षा स्वतंत्र खाणंच उत्तम!

फळांचा रस काढला तर तो फळातील तंतू पूर्णपणे नाहीसे करतो. त्यामुळे त्यातील साखरेचं प्रमाण आपसूकच वाढतं आणि पोषकद्रव्यंदेखील निघून जातात. म्हणून फळांच्या रसापेक्षाही संपूर्ण फळ खाणं केव्हाही चांगलं. आणि हो, ऋतुमानानुसार फळं खाणं कधीही उत्तम! फक्त सफरचंदाने उत्तम आरोग्याचा मक्ता घेतलेला नाहीये. संत्रं, पेरू, डािळब, पपनस, अननस या फळांचा आहारात अवश्य समावेश करा.

दूध म्हणजे पूर्ण अन्न असं आपल्या बऱ्याचदा वाचनात येतं. कारण त्यात सगळ्यात जास्त पोषकतत्त्वं असतात. पण म्हणून दुधाचं अतिरिक्त सेवन करणं अपायकारक ठरू शकतं. रोज दोन वेळा दूध किंवा दूग्धजन्य पदार्थाचा आहारात समावेश करायला काहीच हरकत नाही.  पण आधीच शरीरात अतिरिक्त चरबी असेल तर दुधावरच्या सायीपासून तयार केलेलं दही न खाल्लेलं उत्तम!

दुधाचे गोड पदार्थ खाताना जिभेवर संयम राखायला हवा. शरीराला कॅल्शिअम, प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वं पुरविण्यासाठी दूध आणि दूग्धजन्य पदार्थ आवश्यक आहेत. परंतु ज्यांना दूध पचत नाही; किंवा ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे (दुधात असणारं लॅक्टोज न पचणं) त्यांनी दूध टाळलं तर बरं. अशा वेळी आहारामध्ये दुधाव्यतिरिक्त इतर पौष्टिक अन्नपदार्थाचा समावेश करावा.

तेलकट पदार्थ चमचमीत असतात आणि सगळ्यांचे लाडकेदेखील! पण स्निग्ध पदार्थ आणि डाएट यांचा गेले कित्येक वर्ष ३६ चाच आकडा आहे. आणि तो तसाच असायला हवा! तीन चमचे तेल सहा खाद्यपदार्थामध्ये नक्कीच वापरले जाऊ शकते. (नाश्त्याचे पदार्थ, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण) कोणताच खाद्यपदार्थ तेलात पोहत नाहीये ना याची मात्र खबरदारी घ्या.

आणि या तीन चमचे तेलाव्यतिरिक्त मूठभर तेलबिया आणि सुकामेवा यांचा आनंदाने आस्वाद घ्या.

मूठभर म्हणजे नेमकं किती तर दोन बदाम, दोन अक्रोड, दोन अंजीर, दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया आणि दोन चमचे अळशी! हे मधल्या वेळचं चटपटीत पौष्टिक खाणं!

मांसाहारी खाद्यपदार्थ

मांसाहार करणाऱ्यांनी मासे, चिकन, खेकडे यांपासूनचे पदार्थ बनविताना तेलाचं प्रमाण आणि जेवणात कच्च्या भाज्यांचं प्रमाण यांवर विशेष लक्ष ठेवावं. चवीने खाताना त्याचा अतिरेक करू नका.

निरनिराळी पेयं आणि डाएट

आहारात पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शरीराची आद्र्रता राखण्यासाठी पाण्यासारखं पेय नाही. त्यामुळे नियमित पाणी पिणं आवश्यक असतं. शीतपेयांच्या जाहिरातीत दाखवला जाणारा जोश आणि नेहमीच्या आयुष्यातील जोश यांत बरीच तफावत असते. त्यामुळे शीतपेयांपासून दूर राहणं उत्तम! चहाकॉफीबद्दल सांगायचं तर यापकी कोणत्याही एकाचा एकच प्याला चवीचवीने पिणं उपायकारक आहे.

खाणं आपलं जगणं व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. आपण जेवणाआधी एक श्लोक म्हणतो ‘वदनी कवळ घेता..’ त्यात शेवटची ओळ अशी आहे, ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हेच खरं तर डाएटचं किंवा उत्तम आहाराचं गमक आहे. योग्य प्रमाणात खाण्यामुळे योग्य प्रमाणात ऊर्जा निर्माण करणं होते. त्यामुळे खाणं ही साधना आहे ती आनंदाने करा आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करा.

टीव्ही बघत किंवा मोबाइलवर बोलत असताना जेवू नका. आपण देवपूजा करताना देवावर लक्ष केंद्रित करतो मग पोटपूजा करताना हाच नियम का डावलायचा? तुमचे विचार थेट तुमच्या खाण्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे खाताना फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचारांचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. खाण्यावर जितकं प्रेम आहे तेवढंच खाण्याच्या पद्धतींवर देखील प्रेम करा. अगदी खाणं ताटात वाढण्यापासून ते प्रेमाने पोटात जाईपर्यंत! खाण्याचा रंग, गंध, चव यांची आणि आपल्या इंद्रियांची उत्तम लय साधत अन्न खाल्ल्यास उत्तम स्वास्थ्य लाभते. खाणं जगणं व्हावं असं वाटत असेल तर आहारावर प्रेम करा. आहार तुमच्या शरीराची उत्तम काळजी घेईल याची खात्री माझी!

तुमचं,

चविष्ट आणि पौष्टिक डाएट
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:01 am

Web Title: love your food 2
Next Stories
1 डेटवर जाताय? अशी करा कपड्याची निवड
2 शाओमीने चीनच्या आधी भारतात लाँच केला बहुचर्चित Redmi Note 7 Pro
3 होंडाच्या Navi मध्ये आलं नवं फीचर, किंमतीत बदल
Just Now!
X