स्टॅनफर्डच्या वैज्ञानिकांनी कर्करोगाच्या निदानासाठी रक्ताची चाचणी शोधून काढली असून ती किफायतशीर व संवेदनशील मानली जात आहे. अगदी कमी वेळात यात कर्करोगाचे निदान करता येते. सिंगल कलर डिजिटल पीसीआर असे या चाचणीचे नाव असून यात अगदी बारीक जनुकीय उत्परिवर्तने रक्तातील कर्करोग पेशींच्या मदतीने ओळखता येतात. यात एका कुपीत रक्त घेतले जाते व एकाच अभिक्रियेत तीन उत्परिवर्तित रेणू शोधता येतात. या चाचणीत व्यक्तिगत उत्परिवर्तनेही शोधता येतील त्यामुळे ही चाचणी व्यक्तिविशिष्ट पातळीवरही विकसित करता येऊ शकते. यात कर्करोग गाठी असलेल्या रुग्णाचे रक्त घेऊन अनेक प्रकारच्या कर्करोगांचे निदान करता येते, असे अमेरिकेतील स्टॅनफर्डचे प्राध्यापक हान्ली पीजी यांनी सांगितले. कर्करोग रुग्णांच्या शरीराचे प्रतिमाचित्रण करावे लागते ते खर्चीक व कालहरण करणारे असते, त्यामुळे ही चाचणी जास्त सोपी व कमी वेळात करता येण्यासारखी आहे. रेणूंवर आधारित या चाचणीमुळे कमी खर्चात निदान होते. डीएनए सिक्वेन्सिंगपेक्षाही चाचणी सोपी आहे. सहा रुग्णांवर ती यशस्वी झाली असून त्यात पाच रुग्णांचे आधीच कर्करोग निदान झाले होते. ‘दी जर्नल ऑफ मॉलिक्युलर डायगॉनॉस्टिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.