रिलायन्स जिओने मागील काही वर्षात टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. रिलायन्सच्या दमदार पदार्पणामुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. रिलायन्सने मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंगची सुविधा दिल्यानंतर आपला फिचर फोन बाजारात दाखल केला. या फोनला अतिशय कमी कालावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. या यशानंतर रिलायन्स जिओ स्वस्त स्मार्टफोन घेऊन येणार असल्याची चर्चा टेलिकॉम क्षेत्रात सुरु आहे. सुत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, जिओ कंपनीने स्थानिक कंपन्यासोबत पार्टनरशीप केली असून स्थानिक सप्लायर्सला भारतात प्रोडक्शन कॅपिसिटी वाढवण्यास सांगितले आहे. पुढील वर्षी २० कोटी स्मार्टफोन्स युनिट्स तयार करण्याचे जिओ कंपनीचे ध्येय आहे.

कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन जिओ फोनचे एक व्हर्जन असू शकते. ताज्या रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनची संभावित किंमतही देण्यात आली आहे. Bloomberg च्या रिपोर्टनुसार, गुगलच्या अँड्रॉयड आधारित जिओचा हा स्मार्टफोन जवळपास ४ हजार रुपये (५४ डॉलर) किंमतीचा असू शकतो. जिओच्या स्वस्तात मस्त प्लॅनसह हा स्मार्टफोन येऊ शकतो असा अंदाज टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रिलायन्स जिओचे लक्ष्य पुढील दोन वर्षात १५ ते २० कोटी स्मार्टफोन विकण्याचे आहे. रिलायन्स जिओच्या या निर्णयामुळे भारतीय फॅक्टीरांना फायदा होणार आहे. इंडिया सेलुलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतात १६.५ कोटी स्मार्टफोन आणि जवळपास इतकेच बेसिक फोन असेंबल झाले आहेत. रिलायन्स जिओच्या स्वस्त स्मार्टफोनने चिनी कंपन्याना टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ रिलायन्स नाही तर भारती एअरटेल सुद्धा ४ जी स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारीत आहे. या स्मार्टफोनला मोठी स्क्रीन देण्यात येणार असून यामध्ये युट्यूब, म्युझिक, व्हॉट्सअॅप, फेसबुक अशी इतर स्मार्टफोनप्रमाणे सर्व फिचर्स देण्यात येणार आहेत.