मेड इन इंडिया क्लाउड स्टोरेज सर्व्हिस DigiBoxx ग्राहकांना 26GB फ्री स्टोरेज देत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनीने ही ऑफर आणली असून या आठवड्यात साइन-अप करणाऱ्या युजर्सना 26GB फ्री स्टोरेजचा फायदा मिळेल. म्हणजे नवीन युजर्सना 6GB एक्स्ट्रा स्टोरेज मिळेल, कारण डिजीबॉक्सवर 20GB स्टोरेज असेही फ्री दिले जाते. डिजीबॉक्स सर्व्हिस गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती. फ्री आणि पेड सबस्क्रिप्शन असे दोन्ही पर्याय या क्लाउड स्टोरेजसाठी आहेत. लाँचिंगच्या एक महिन्यानंतर या सेवेचे जवळपास 4 लाख सक्रीय युजर्स असल्याचा दावा DigiBoxx ने केला आहे.

निती आयोगाने आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी डिसेंबरमध्ये भारतात DigiBoxx नावाने नवीन क्लाउड सर्व्हिस सुरू केली. Digiboxx क्लाउड सर्व्हरमध्ये युजर्स फोटो, व्हिडिओ यांसारखा आपला खासगी डाटा स्टोअर करु शकतात. Digiboxx क्लाउड सर्व्हिस Google Drive, Mircrosft One Drive यांसारख्या क्लाउड सर्व्हिसला टक्कर देईल. DigiBoxx वर स्टोअर होणारा डाटा भारतातच राहतो. DigiBoxx द्वारे तुम्ही तुमचा एक आयडी बनवून डाटा स्टोअर करु शकतात, हा डाटा इतरांसोबत शेअरही करता येईल. यात ऑन-डिमांड रिअल टाइम अ‍ॅक्सेस आणि एडिटिंग यांसारखे पर्यायही आहेत. सर्व फॉरमॅटचा सपोर्ट याला आहे. DigiBoxx च्या फाइल्स InstaShare द्वारे लगेच शेअर करता येतील.

DigiBoxx साठी शुल्क किती आकारणार ?
DigiBoxx ची क्लाउड सर्व्हिस दरमहा केवळ 30 रुपयांमध्ये मिळेल. यात तुम्हाला 5 टीबी स्टोरेज आणि 10 जीबीपर्यंत साइज असलेल्या फाइल्स अपलोड करता येतील. यात तुम्ही तुमचं जीमेल अकाउंटही कनेक्ट करु शकतात. डिजिबॉक्सची फ्री सर्व्हिसही आहे, यामध्ये तुम्हाला 20 जीबी स्टोरेज आणि 2 जीबीपर्यंत साइज असलेल्या फाइल्स अपलोड करता येतात. याशिवाय एक 999 रुपयांचा प्लॅनही आहे, यात युजर्ससाठी 50 टीबीपर्यंत डाटा स्टोरेज आणि फाइल अपलोड करण्याची कमाल साइज 10 जीबी असेल. यात एकावेळी 500 युजर्सशी कनेक्ट होता येईल. म्हणजे ही सेवा गुगलच्या जी-सूटप्रमाणेच आहे.