प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com
नोंद (पूर्वार्ध)
मुंबई विद्यापीठाचा पुरातत्त्व विभाग आणि ‘इंडिया स्टडी सेंटर’च्या सहकार्याने खाद्यसंस्कृतीतील इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या दोनदिवसीय परिषदेचे मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मराठी भाषा भवनात आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने…

अलीकडेच मुंबईत पुरातत्त्वशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून खाद्यसंस्कृतीचा वेध घेणारी ‘आíकओब्रोमा’ ही पहिली परिषद झाली. ‘आर्किओ’ म्हणजे प्राचीन आणि ‘ब्रोमा’ म्हणजे अन्न किंवा खाद्यपदार्थ. या परिषदेत खाद्यसंस्कृतीचा परंपरागत पद्धतीने विचार करतानाच नव्या पर्यायी मार्गाच्या अभ्यासावरही भर देण्यात आला होता. या परिषदेचे आयोजक बहि:शाल शिक्षण विभागाच्या संचालक आणि इन्स्टुसेन संस्थेच्या विश्वस्त मुग्धा कर्णिक यांनी खाद्यपदार्थाचे वैविध्य अभ्यासपूर्ण पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढील १०० वष्रेदेखील कमी पडतील, असे निरीक्षण नोंदवले.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…

परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘अन्नाचा इतिहास’ या विषयावर डॉक्टरेट असलेल्या, इतिहासाच्या प्राध्यापक डॉ. मोहसिना मुकादम यांनी अन्न क्षेत्राची नोंद कुणीच कशी करून ठेवली नाही, याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. डॉ. कुरुष दलाल यांनी पुरातत्त्वीय अभ्यासात सापडलेले गेल्या हजारो वर्षांतील अन्नावशेष आणि त्यातून प्रकाशझोतात आलेल्या बाबी मांडत मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करताना अन्न हा किती महत्त्वाचा घटक आहे हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. वैद्य शैलेश नाडकर्णी यांनी आयुर्वेद या पारंपरिक भारतीय तत्त्वप्रणालीचा आरोग्याशी असलेल्या संबंधांवर प्रकाशझोत टाकला. सई कोरान्ने खांडेकर आणि रुशीना मुनशॉ-घिल्डियाल यांनी भारतातील मुलभूत अन्न असलेल्या डाळी, कडधान्ये, तृणधान्ये यांचा आपल्या आहारातील वैविध्यपूर्ण अंतर्भाव आणि संपूर्ण भारतखंडात या अन्नघटकांचा असलेला वापर मनोज्ञ पद्धतीने मांडला. सिद खुल्लर या सुप्रसिद्ध खाद्यतज्ज्ञाने आहारातील चरबीचे महत्त्व अधोरेखित करीत, आजघडीला शरीरासाठी आवश्यक असलेल्या स्नेहांना शत्रू ठरवणाऱ्या षड्यंत्रांची अभ्यासपूर्ण मांडणी केली. तर रामेश गौरी राघवन यांनी चहा आणि कॉफी या नवागत पेयांचे भारतातील आगमन, त्यावर झालेले संस्कार, त्यासंबंधींचे किस्से आणि सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

खाद्यपदार्थाबाबत बोलायला लागल्यावर केवळ पाककृतींनाच महत्त्व दिलं जातं. पण कुठलीही खाद्यसंस्कृती ही केवळ त्यापुरतीच मर्यादित नाही. गेल्या हजारो वर्षांपासून खाद्यसंस्कृती बदलत गेली आहे. हा बदल त्याकाळची भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती आणि हवामानावर मोठय़ा प्रमाणात अवलंबून होता. अन्नाच्या शोधात झालेलं स्थलांतर संस्कृतीच्या आदानप्रदानाला मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरलं. सांस्कृतिक दृष्टिकोनातून याचा क्वचितच अभ्यास केला गेला. पण पाश्चात्त्य देशांमध्ये अलीकडे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी पुढे येताहेत. त्यांचे संदर्भ इतर विषयांशी जोडून, भूतकाळ तपासून भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी अभ्यास होतो आहे. आपल्याकडे सांस्कृतिक वैविध्य असलं तरी अभ्यासाच्या बाबतीत अनास्थाच दिसते. खाद्यसंस्कृतीचं दस्तावेजीकरण व्हावं यासाठी या  परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदाच पाऊल उचलले गेले आहे.

अन्न हेच औषध… – डॉ. शैलेश नाडकर्णी, आयुर्वेद अभ्यासक

आयुर्वेदाने अन्नालाच औषध आणि औषधालाच अन्न मानलं आहे. आपण जे खातो ते कधी खातो यालादेखील महत्त्व आहे. शिवाय खाणं म्हणजे केवळ चावून खाण्याचे पदार्थ नव्हेत. तर आपण जे काही पितो तेसुद्धा पचणं आवश्यक असतं. पेय म्हणजेच पिता येणारे, लेह्य़ म्हणजे चाखून, चोखून खाल्ले जाणारे, भोज्य म्हणजे संपूर्ण जेवण आणि भक्ष्य म्हणजे आहारात कधीतरी समाविष्ट केले जाणारे पदार्थ अशी वर्गवारी आयुर्वेदामध्ये आहे. आपलं शरीर ही एक प्रयोगशाळा आहे. पोटात गेलेल्यापकी काय घ्यायचं आणि काय नाही ते शरीराला चांगलं ठाऊक असतं. शरीराबाहेर पडणारा मल हे शरीराच्या आत काय सुरू आहे याचा आरसा असतो. काही विशिष्ट पदार्थामुळे आपल्याला विकार जडतात, त्यावर औषधांपेक्षा तो पदार्थ खाणं बंद करणं हाच योग्य उपाय ठरतो. पूर्वापार परंपरेनुसार ऋतू आणि सणांना विशिष्ट पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. त्यामागेही वैज्ञानिक कारणं आहेत, परंतु काळासोबत त्यातील विज्ञान मागे पडून हल्ली अंधश्रद्धांनाच अधिक प्रोत्साहन दिलं जातंय. ताटात लोणचं डाव्या बाजूला वाढलं जातं कारण ते कमी खाल्लं जावं, रात्री दही खाऊ नये कारण ते पचायला जड असतं या सर्व गोष्टी हित भूक म्हणजेच चांगलं खाणं आणि मित भूक पचायला चांगलं या प्रकारात मोडतात. कारण आयुर्वेदात पचनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळेच काहीकाळ साचेबद्ध झालेल्या या विज्ञानाकडे वेगळ्या नजरेतून पाहण्याची गरज आहे.

पुरातत्त्वशास्त्राशी संबंध – डॉ. कुरूष दलाल, ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ 

पुरातत्त्वशास्त्र हा मानवाच्या भूतकाळाचा अभ्यास आहे. कायम अन्नाच्या शोधात असणारी एक जमात आणि अन्न पिकवणारी दुसरी जमात हा फरक अनेक गुपिते उघड करणारा आहे. २.६ लाख वर्षांपूर्वी सापडलेल्या माणसाच्या दातांच्या नमुन्यांवरून तो काय खात असतील हे कळते. तर दहा हजार वर्षांपूर्वी सापडलेल्या शेतकऱ्यांचे दात किडलेले असल्याने त्यांच्या आहारात साखरेचे प्रमाण अधिक होते हे सिद्ध झालेय. युरोपातील देशांमध्ये मृतदेह शवपेटीत ठेवण्याची पद्धत असल्याने शेकडो वर्षांनंतरही त्यांच्या पोटातील न पचलेल्या अन्नावरून अनेक गोष्टी सिद्ध करता येतात.

कुठल्या प्रदेशातील लोकांनी कशा प्रकारची भांडी तयार केली यातून त्यांच्या खाण्याच्या सवयींचा अंदाज बांधता येतो. िभतींवरील चित्रांवरून माणूस कोणत्या प्राण्यांची कशा प्रकारे शिकार करीत असे, त्यासाठी कोणती हत्यारे वापरली जायची याचाही अभ्यास करण्यात आलाय. एवढेच नव्हे तर पाच हजार वर्षांपूर्वीचे आपण ज्यांना देवदेवता मानतो अशा व्यक्तींनीही  केवळ बीफच नाही तर अतिशय कोवळ्या बछडय़ाचे मांसदेखील खाल्ले असण्याची शक्यता आहे. कारण पोषणत्त्वानुसार आहारशास्त्रामध्ये नर वासराच्या मटणाला अतिशय वरचे स्थान देण्यात आले आहे. पुरातत्त्वशास्त्र हे आपल्याला अन्नपदार्थाचे मूळ आणि त्याचा प्रवास समजून घेण्यास मदत करते.

त्यामुळे हा विषय माणूस आणि जागांच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. एवढेच नाही तर आपण का खातो आणि काय खातो हे समजून घेण्यासही मदत करतो.

धान्यांपासून का रे दुरावा? – सई कोरान्ने-खांडेकर

भारतात एके काळी बाजरी, ज्वारीसारख्या धान्यांचा मोठय़ा प्रमाणात आहारात समावेश असायचा. मात्र गेल्या काही वर्षांत शहरी स्वयंपाकघरांमधून ही धान्य हद्दपार झाली आहेत. शेतीतील जैवविविधतेसाठी भारत ओळखला जातो. मात्र मोजकीच पिके घेऊन हळूहळू आपली ही ओळख पुसली जातेय. जव किंवा सातू आयुर्वेदिकदृष्टय़ा अतिशय चांगले असून किडनी स्टोनसारख्या आजारांवर प्रभावी औषध म्हणून काम करते पण आता ते केवळ प्राण्यांचे खाद्य झाले आहे. गहू आणि धान्यांच्या बाबतीत झाले तेच भोग तांदळाच्याही वाटय़ाला आले आहेत. सळी आणि विही या भारतातील तांदळाच्या मूळ जाती होय. अलाहाबादचा जंगली तांदूळ किंवा बंगालचा गोिवदोभोग तांदूळ ही त्या त्या प्रदेशाची खासियत होती. मात्र तांदळाच्या स्थानिक जाती नष्ट होऊन केवळ चांगला दिसणारा आणि पांढऱ्या रंगाच्याच तांदळाची मागणी सध्या वाढतेय. मक्याच्या कणसाच्या काही प्रजाती सिक्किममध्ये पिकत होत्या. मात्र दक्षिण अमेरिकेतून आलेल्या कणसाला सध्या सर्वाधिक मागणी आहे. पोंख किंवा हुर्डासारखी ऋतुमानानुसार उगवणारी धान्यसुद्धा गावाची वेस क्वचितच ओलांडताना दिसतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, कांगनी, वरी, कोद्रा ही सर्व धान्ये भारताबाहेरून आली असली तरी त्यांचा आपल्या आहारातील वापर मोठय़ा प्रमाणावर होता. धान्य हा कला संस्कृतीचाही अविभाज्य भाग गणला जात असे. त्यामुळे धान्यांबाबत प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे.

अन्न स्निग्ध असावे… – सिद खुल्लर, खाद्य समालोचक

शेतीचं तंत्र अवगत नसताना मानव शिकार करत असे. प्राण्यांचं कच्चं मांस आणि त्यांची चरबी हाच त्याचा मुख्य आहार होता. त्यातून शरारीला ऊर्जा मिळे. पुढे याच स्नेहांना काही व्यवसाय चतुरांनी आयोग्यासाठी घातक ठरवलं. जागतिक पातळीवर आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारा पदार्थामधील स्नेह काढून टाकून त्याची जागा साखरेनं घेतली. ज्याची खरं तर आपल्या शरीराराला फार आवश्यकता नाही. त्याचा प्रचार करण्यासाठी साखर उद्योजकांनी वैज्ञानिकांना पसे दिल्याच्या इतिहासाची फार कमी लोकांना माहिती आहे.

आपले अन्न स्निग्ध असावे. स्निग्ध म्हणजे तुपकट, तेलकट किंवा तळलेले पदार्थ असा अर्थ अपेक्षित नाही. तर योग्य प्रमाणात स्नेह म्हणजे तूप, लोणी, दही, तेल वगरे शरीराला वंगण देणाऱ्या वस्तूंचा आहारात समावेश असणे अपेक्षित आहे. स्निग्ध अन्न अधिक रुचकर लागते, अग्नी प्रदिप्त होण्यास मदत करते, सहजतेने पचते, शरीराचे योग्य प्रमाणात पोषण करते, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थाचे सेवन केल्याने शरीर सुदृढ होण्यास, शरीरबांधा उत्तम राहण्यास मदत होते.  फळं, तेलबिया, डेअरी पदार्थ आणि मांसाहारी पदार्थातून मिळणारा स्न्ोह खरंतर खाण्यासाठी आणि काही आजारांवरील उपचार म्हणून अत्यंत आवश्यक आहे. तेराव्या शतकातील दक्षिणेतील मंदिराच्या िभतीवर घाण्याने तेल काढण्याची चित्रे कोरलेली आहेत. यावरून ही खाद्यपरंपरा किती जुनी आहे याचा अंदाज येईल.

पक्के मांसाहारी खवय्ये – डॉ. मोहसिना मुकादम, खाद्यसंस्कृती अभ्यासक

आपली खाद्यसंस्कृतीही नष्ट होऊ नये म्हणून अलीकडेच कोंकणी-मुस्लीम समुदायाच्या चिपळूणमधील कडवई गावातले लोक एकत्र आले आणि त्यांनी ‘जायका-ए-कडवई’ हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित केलं आहे. यामध्ये त्यांनी कोंकणी-मुस्लिमांच्या पाककृतींची नोंद करून ठेवली आहे.

कोंकणी-मुस्लिमांमध्येही रोजचं जेवण हे िहदू शेजाऱ्यांसारखं असतं. पण सणावाराला बनवल्या जाणाऱ्या पदार्थावर इस्लामिक प्रभाव दिसतो. एकत्र खातात ते एकत्र राहतात, असं हा समुदाय मानतो. त्यामुळे गावजेवण करण्याला पूर्वी खूप महत्त्व दिलं जायचं. कोंकणी-मुस्लीमांना मटण, ओले मासे, सोडे, कुट्टा म्हणजे जवळा, खारवलेला बांगडा विशेष आवडीचा. बटाटा घातलेली मटण बिर्याणी किंवा रस्सा ही तर त्यांची खास ओळख.  कडवे वाल, लाल चण, लाल चवळी (गूळ घातलेली चवळीची पेज) कुळथाचं पीठ, मुळा, चवळी, बारीक मेथी या पालेभाज्यांचाही नेहमीच्या आहारात समावेश असतो. यांना प्रत्येक पदार्थामध्ये नारळ हवाच. उन्हाळ्यात घरगुती मसाला बनवण्याचीही परंपरा आहे. पापड तयार करताना कांद्याच्या रसात पीठ भिजवलं जातं. कर्जाचे पापड हा या समुदायातील प्रसिद्ध प्रकार आहे. मटणाचं प्रमाण कमी असलेला अकनी पुलावही विशेष लागतो. गोड पदार्थामध्ये भानोले, सकरवले, सुक्री, गंजी, दुधेळी यांचा समावेश होतो. भरपूर ड्रायफ्रूट घालून नारळाच्या दुधात तुकडय़ांचा दुधी हलवा बनवण्याची पद्धत कोंकणी-मुस्लिमांमध्ये आहे.

ते आले आणि रमले – रेहा मित्रा दलाल, फूड ब्लॉगर आणि पारशी पदार्थ विशेषज्ञ

हजार-बाराशे वर्षांपूर्वी पारशी लोक आपला झोराष्ट्रीयन धर्म घेऊन भारतात आले. त्यांनी आपली खाद्यसंस्कृती येथे आणली आणि रुजवली. नंतर इथल्या लोकांच्या स्वयंपाकाची अनेक कौशल्ये, स्थानिक पदार्थ आणि पाककृती त्यांनी उचलल्या. गुजराती, कोळी, पाठारेप्रभू, गोवन यांच्यामुळे पारशी नारळाच्या प्रेमात पडले. नवलकोल आणि फ्लॉवरची भाजी नारळाच्या दुधात बनवण्याची पद्धत पारश्यांमध्ये आहे. फालुदा, तार हलवा, बकलावा, गझ ही पारश्यांनी भारतीयांना दिलेली गोड पदार्थाची देण आहे. केळ्याच्या पानात वाफवून केलेली पात्रानी मच्छी आणि त्याच मसाल्यात केलेला छोटय़ा वांग्याचा रवय्यो ही खास पारश्यांची ओळख आहे.

अंडी हा पारशी लोकांच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ. विविध प्रकारची लोणची पारशी लोकांमध्ये तयार केली जातात. त्यातील व्हेज लोणच्यांवर गुजराती आणि नॉनव्हेज लोणच्यांवर गोवन लोकांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या शाकाहारी पदार्थात मांसाहाराचा अंश असतोच. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मसूरच्या भाजीत बकऱ्याची जीभ ज्याला ‘मसूर मा जीब’ असं म्हटलं जातं. आबघोष आणि धनसाक या पारशी लोकांच्या ट्रेडमार्क डिशेस आहेत. पोपटजीनो पेनो हे इडलीच्या भांडय़ासारखं दिसणारं भांडं ही पारशांची भारतातील निर्मिती. यामध्ये ते ताडीत आंबवलेल्या गव्हाच्या पिठापासून इडलीसदृश न्याहरीचा पदार्थ तयार करतात.

दाल में कुछ… – रुशीना मुनशॉ-घिल्डियाल, स्तंभलेखिका आणि गढवाली खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक

हडप्पा संस्कृतीपासून वैदिक काळ ते चंद्रगुप्त मौर्याच्या लग्नातही डाळींचा उल्लेख आढळतो. पूर्वीपासूनच पोषक आहार, आíथक मूल्य, प्रवासासाठी सोपा पदार्थ म्हणून डाळ लोकांसोबत मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित झाली. त्रिनिदादमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी नेलेली डाळ आता तेथील लोकांच्या आहारातील मुख्य घटक आहे. ब्रिटिशांनी डाळ युरोपात नेली. त्यामुळेच भारतात कधीही न आलेल्या व्हिक्टोरिया राणीच्या स्वयंपाकघरातही डाळ नियमितपणे शिजवली जात असे.

भारतीयांच्या आहारातील डाळ हा प्रमुख पदार्थ असून संस्कृतीच्या अनुषंगानेही डाळीचं महत्त्व लक्षात येतं. म्हणूनच ‘दाल में कुछ काला है’ किंवा ‘घरकी मुर्गी दाल बराबर’सारख्या म्हणी आजही सर्रास वापरल्या जातात. मांसाहार न करणाऱ्या शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा प्रमुख स्रोत डाळ हाच राहिला आहे. तसंच अनेक कडधान्ये आणि तृणधान्यांचाही यामध्ये समावेश होतो. चणा, अरहर, मूग, उडीद, मसूर या सर्वपरिचित डाळी असल्या तरी प्रादेशिक डाळींचीदेखील आपल्याकडे कमतरता नाही. वरीमोथ (काश्मीर), तोर, नवरंगी, भट (उत्तराखंड), आवरे (कुर्ग), कडू वाल या डाळींचा प्रादेशिक वापर मोठा आहे. डाळ फक्त स्वतंत्रपणे तयार केली जात नाही तर वेगवेगळ्या भाज्या, खिचडी, मांसाहारी पदार्थ, आंबवलेले पदार्थ, गोड पदार्थ, पुऱ्या, भज्या, चटण्या, पापड यांसारख्या अनेक पदार्थामध्ये वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. आणि भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे इतक्या विविध प्रकारे डाळ खाल्ली जाते. जगातील अनेक देश भविष्यातील भूकबळी आणि कुपोषण यांचा गांभीर्याने विचार करत असताना आपण वेळीच डाळींचं महत्त्व ओळखून त्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत.

मौखिक खाद्यपरंपरा – लिओरा पेझारकर, वारसा व्यवस्थापन अभ्यासक

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील ज्यू समुदायाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज घडीला बेने इस्रायली ज्यूंची भारतातील एकूण लोकसंख्या पाच हजारांहून कमी आहे. दोन हजार वर्षांपूर्वी मध्य-पूर्व आशियातून आलेला हा समाज भारताताच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात स्थिरावला. महाराष्ट्रीय आणि ज्यू अशी दुहेरी ओळख घेऊन ते जगत आहेत. बेने इस्रायलींच्या कोशर या आहार कायद्यामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत लिहून ठेवलेलं आहे. प्राणी कसा कापला जावा, तसंच विरुद्ध अन्न असलेल्या वज्र्य पदार्थाची नोंदही यामध्ये केलेली आढळते. नारळाचं दूध हा त्यांच्या आहारातील मुख्य पदार्थ आहे. तर दर शनिवारी मटणाचं जेवण करण्याची पद्धत आहे. सणसमारंभ आणि आनंद साजरा करतानाही मटणाच्या जेवणालाच पसंती दिली जाते. आहारात मोठय़ा प्रमाणात वनस्पती तुपाचा वापर केला जातो. सणांच्या वेळी केली जाणारी सोयीची करंजी, रवा करंजी, चिकाचा हलवा या काही महत्त्वाच्या पाककृती आहेत. पोहे आणि खवलेल्या खोबऱ्यापासून तयार केलेला बेने इस्रायलींचा मलिदा खूपच प्रसिद्ध आहे. हा समुदाय पहिल्यांदा भारताच्या किनाऱ्याला लागला तेव्हा त्यांनी कडू वाल खाल्ले होते. त्याची आठवण म्हणून सणाच्या दिवशी ते खाल्ले जातात. या समुदायाच्या सर्वाधिक पाककृती मौखिक परंपरेतूनच जपल्या गेल्यात. त्यामुळे ‘सांधण’सारख्या पदार्थाच्या पाककृती काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत नामशेष होत चाललेल्या या समुदायाची सर्वच गोष्टींचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड सुरू आहे.

 संस्कृतीची ओळख – आंद्रे बाप्टिस्टा, पुरातत्त्वज्ञ आणि इस्ट इंडियन कम्युनिटी खाद्यपदार्थ विशेषज्ञ

पारसी, कोळी, पाठारे-प्रभू यांच्याही आधीपासून मुंबईचे मूळ रहिवासी असल्याचा दावा करणारा ‘इस्ट-इंडियन’ समाज त्यांच्या विशिष्ट खाद्यपदार्थासाठी ओळखला जातो. खरंतर शहरीकरण, पाश्चात्तीकरण आणि ग्लोबलायझेशनमुळे केवळ खाद्यपदार्थ हीच त्यांच्या संस्कृतीची मुख्य ओळख म्हणून शिल्लक आहे. गोवा आणि मुंबईच्या समुद्रकिना-यालगतच्या परिसरात स्थिरस्थावर झालेला हा समाज मूळचा मुंबईकर. सोबतच उरण, कोरलाई, चौल, पालघर या भागात त्यांची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रीयन ही ओळख असलेल्या या समाजाच्या खाण्यात इथले मसाले आणि पदार्थ बनवण्याच्या पध्दतीची झलक दिसते. तर पदार्थाच्या नावांमध्ये पाश्चिमात्य परंपरा आणि स्थानिक घटकांचं प्रतििबब दिसतं. मुंबईचे स्थानिक ख्रिश्चन म्हणून ओळख असेल्या या समाजाने ब्रिटीशांच्या जवळपास सर्वच गोष्टी स्विकारल्या. जेवणासाठी तांब्या-पितळेच्या भांडय़ांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तर काळ्या मातीच्या भांडय़ात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात.

बॉटल मसाला ही ‘इस्ट-इंडियन’ समाजाची खास ओळख असली तरी हल्ली तो वेगवेगळ्या पध्दतीने तयार केला जातो. मार्च महिन्यात तयार केल्या जाणाऱ्या या मसाल्यात २५हून अधिक मसाल्यांचा समावेश असतो. मटण, चिकन, बीफ आणि भाज्यांमध्ये त्याचा वापर केला जातो.  मांसाहाराला पसंती देणारा हा समाज मटण करीमध्येही भाज्यांचा वापर करतो.
सौजन्य – लोकप्रभा