जगाची थाळी
चिमिचुरी या नावाने आमच्यासमोर आलेला पदार्थ म्हणजे चक्क आपल्याकडे करतात तसा पण थोडाफार वेगळा हिरव्या मिरच्यांच्या ठेचा होता. काही ठिकाणी तो सॉससारखादेखील वापरला जातो.

हाडे गारठवणारी थंडी आणि सुसाट वारे… घरी बसावे तरी वैताग आणि बाहेर कुठे जावे तर किमान पाच थर कपडे चढवून बाहेर जावे लागणार, असले बेक्कार पर्याय समोर असताना आठवडय़ाच्या शेवटी नेमकं काय करावे हा दर हिवाळ्यात छळणारा प्रश्न! अशाच एका हिवाळी संध्याकाळी, आम्ही काही वेगळे खायला म्हणून पेरुव्हीयन रेस्तराँमध्ये गेलो! पेरुव्हीयन जेवण म्हणजे नेमके काय खायला मिळेल याचा अजिबात अंदाज लावता येत नव्हता. अर्थात नकाशावर पेरू हा देश तरी कुठे चट्कन सापडतो! तसेच हे! तर तिथे गेलो आणि निराळेच जग समोर आले. भात, मटण, रताळी आणि बटाटय़ाचे पदार्थ! ओळखीचे जिन्नस आणि नावे भलती!

शेळीचे मटण तसे क्वचित मिळत असल्याने, तेच मागवले. तर कोळशावर खरपूस भाजलेले मटणाचे तुकडे, बटाटय़ाच्या काचऱ्या आणि एका वाडग्यात हिरवी चटणी असे समोर आले! इथे कुठे हिरवी चटणी, असा विचार करत पहिला घास तोंडात घातला आणि जोरदार ठसकाच लागला! हा चक्क पाणीदार ठेचा होता मिरच्यांचा!! थोडे निराळे तरी जहाल प्रकरण! ही काय भानगड आहे, असे विचारले तर याला चिमिचुरी (Chimichurri) असे म्हणतात हे समजले! अशी ही तेजतर्रार चिमिचुरी. हा मूळ पदार्थ अर्जेन्टिनाचा, मात्र उरुग्वे, बोलिविया, पेरू, चिले इथेदेखील हा पदार्थ लोकप्रिय आहे! मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांत हा पदार्थ मुख्यत्वे आढळतो. बाहेरून आलेले राज्यकत्रे तसंच निर्वासितांमुळे इथल्या मूळ खाद्यसंस्कृतीवर युरोपीय प्रांतांचा प्रभाव जाणवतो. इथे जास्त करून स्पॅनिश आणि इटालियन खाद्यपरंपरांचे मिश्रण आढळते. बास्क (Basque) या स्पेन आणि फ्रान्सच्या मध्ये वसणाऱ्या प्रांताची, अतिप्राचीन, अर्थात इंडो युरोपियन भाषांच्या आधीची भाषा, असा लौकिक असलेल्या भाषेतील छी-मी-छो-री  (tximitxurr) म्हणजे ‘कोणत्याही क्रमाने घालून मिसळेले पदार्थाचे मिश्रण’ यावरून या पदार्थाचे नाव आले असावे असा एक कयास आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे की अर्जेन्टिनाच्या एका युद्धादरम्यान एक आयरिश माणूस तिथे ब्रिटिश सन्यात होता, त्याचे नाव जॉन करी किंवा मॅक करी असे होते. या माणसाने हा पातळसर ठेचा पहिल्यांदा बनवला, ज्यामुळे त्या पदार्थालाच त्याच्या नावाचा अपभ्रंश लावला गेला! चिमिचुरी हा भाजलेल्या भाज्या, मटण यावर घालून खायचा पदार्थ म्हणून खास प्रसिद्ध आहे. याचे दोन उपप्रकार आहेत. चिमिचुरी वेर्द (chimichurri verde) हा हिरव्या रंगाचा आणि चिमिचुरी रोजो (chimichurri rojo) हा लाल रंगाचा असतो. या पदार्थात मुख्यत्वे पास्ल्रे, लसूण, विनेगार, मीठ, िलबू, तेल, पाणी आणि कधी सुक्या लाल मिरचीची पूड, जिरेपूड, मिरपूड घातली जाते. काही ठिकाणी पास्ल्रेबरोबर कोिथबीर, ओरेगानो किंवा बेसिल देखील वापरली जाते. या सगळ्या गोष्टी अंदाजाने घालून, पूर्वी खलबत्त्यासदृश भांडय़ात कुटून घेतल्या जात. आता काळानुरूप मिक्सरवर भरडसर वाटून घेतल्या जातात. अगदी पातळसर, दाट हिरव्या गंधाचा आणि रंगाचा हा रुचकर प्रकार पहिल्याप्रथम भुरळ घालतो तो वासाने! सर्व ताज्या वनस्पतींचा काहीसा उग्र तरी मोहक वास! मग त्याची चव अतिशय स्पष्ट तरी अनेक पापुद्रे असल्यागत एक एक करून उलगडत जाते. यासोबत कोळशावर खरपूस भाजलेल्या रसरशीत मटणाची चव. त्याच्या प्रत्येक फटीतून हा रसदार पदार्थ झिरपत जातो आणि निराळीच चव तयार होते. बटाटे, रताळी, इतर पिष्टमय भाज्या, मटणाचे प्रकार या सगळ्या गोष्टींबरोबर हा सॉस म्हणून खाल्ला जातो, कधी सॅण्डविचमध्ये देखील सॉससारखा हा पदार्थ वापरला जातो. बहुतेकदा हा पदार्थ हिरवा किंवा लाल असला तरी तिखटाला कमी-जास्त करता येतो.

या चिमिचुरीचे वर्णन वाचून, चव चाखून, मला आपल्या ठेच्याची आठवण येत राहिली! अगदी गावरान दिसणारा ठेचा आता आकर्षक बंद पाकिटातूनदेखील विक्रीस येतो. तरी ताज्या ठेच्याची चव निराळीच! लाल मिरच्यांचा ठेचा आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा ही दोन्ही अगदी रांगडी प्रकरणे! ताज्या भाकरीसोबत किंवा शिळ्या पोळीसोबत, कधी तर चक्क ब्रेडला सॉससारखे फासून, कसेही खाल्ले तरी अशा फक्कड जमलेल्या ठेच्याची लज्जत काय वर्णावी! वऱ्हाडी ठेच्याची एक अदा तर कोल्हापुरी ठेच्याची दुसरीच तऱ्हा! चुलीवर खोलगट कढईत किंचित भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्यांचा सर्वदूर पसरलेला खाट, त्यावर मोगरीच्या कळ्या भासाव्या अशा लसणीच्या पाकळ्या आणि किंचित भरडसर मीठ! कोमट झाल्यावर बत्त्याने ठेचून घेतले, पुन्हा कढत तेलात किंचित परतून घेतले की झाला चमचमीत ठेचा तयार! लाल सुक्या मिरच्यांचा वऱ्हाडी ठेचा तसाच. रंगच इतका आकर्षक की नजर खिळून राहील! प्रत्येक घासाला जिभेवर झोंबणारा, मनात आणि पोटात तेवढीच आग लावणारा हा अगदी आवडता पदार्थ! भारतात राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यात खास मान्यता मिळवलेला हा पदार्थ अगदी अवचित दूरच्या देशी भेटला, निराळ्या रूपात! तरी त्यातील नखरेल हिरवेपण, फटकळ जहालपण आणि खुमासदार अदा काही लपत नव्हती!

या पदार्थाची आणखी एक निराळी नाळ आहे, युरोपात, इटली, स्पेन, फ्रान्स या देशांतदेखील ठेच्याची निराळी रूपं आढळतात. इटलीत, विशेषकरून सिसिली इथला सल्मोरिग्लिओ (salmoriglio) सॉस अशाच पद्धतीने बनवला जातो. मासे, चिंबोऱ्या, तिसऱ्या आणि भाजलेले मटण यासोबत हा पदार्थ मुख्यत्वे खाल्ला जातो. फ्रेंच खाद्यसंस्कृतीत पेर्सिलेड (Persillade) हा सॉस अशाच प्रकारे वापरला जातो. िशपल्यावर किंचित हिरवागार ठिपका ठेवून अतिशय आकर्षक मांडणी करून हा सॉस खाल्ला जातो. इटालियन आणि फ्रेन्च सॉस हे चवीला कमी तिखट बनवले जातात. कधीकधी यात काही निराळ्या वनस्पतीदेखील वापरल्या जातात. तमालपत्र, टॅरागॉन या वनस्पतींची पाने देखील या करता वापरली जातात. जुन्या आणि नव्या व्यापारी मार्गांद्वारे, हिरव्या वनस्पती ठेचून, जेवणाची रुचकर सोबत करण्याची ही परंपरा, अनेक देशांत पोचली आणि रुजली! इटालियन, स्पॅनिश आणि ब्रिटिश सनिक जिथे जिथे गेले, तिथे तिथे ही चटणी/सॉस रुजलेला आढळतो.

अशी ही चिमिचुरी अचानक दूरदेशी आम्हाला सापडली! त्या थंडीच्या दिवसात, मनात एक निराळीच धुगधुगी आली. ती ऊब ओळखीच्या चवीची होती, त्या खडकाळ, रासवट प्रांताची होती. जिथून उपटून आमचे हे रोपटे, दूर देशी आम्ही रुजवू पाहत होतो. एकीकडे असेच अवचित, तुकडय़ातुकडय़ाने कुठे कुठे महाराष्ट्र भेटत राहतो, कधी विदर्भ, कधी कोकण, तर कधी पुणे मुंबईच्या चवी-स्मृती घेऊन! तर दुसरीकडे, इतिहास, भूगोल याविषयांची अशीच चमचमीत उजळणी होते! व्यापारी मार्गामुळे जगात झालेले बदल, युद्ध, आंतरराष्ट्रीय ताणतणाव, हे तर अभ्यासाला असतं, मात्र हा चविष्ट इतिहास, शक्यतांपाशी थांबून केलेले रंजन आणि अतिशय आनंददायी उदरभरण, हा सुरेख योग! असा चविष्ट इतिहास सगळ्यांना सापडो हीच इच्छा!
प्राजक्ता पाडगावकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा