महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी गुरुग्राममधील Hapramp या स्टार्टअपमध्ये १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ब्लॉकचेन आणि सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञाावर हे स्टार्टअप काम करतं. आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांनी २०१८ मध्ये या स्टार्टअपची सुरूवात केली होती. ज्याचा आपण शोध घेत होतो, असं स्टार्टअप दोन वर्षांनी सापडलं असल्याची माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून दिली. Hapramp हे स्वदेशी स्टार्टअप आहे आणि युवा फाऊंडर्सतर्फे याची सुरूवात करण्यात आली आहे. तसंच क्रिएटिव्हिटी, तंत्रज्ञान आणि डेटा सुरक्षा हे सर्व याठिकाणी एकत्र सापडतं, असंही ते म्हणाले.

२०१८ मध्ये आनंद महिंद्रांनी ट्विटरद्वारे काही खास निकषांची पूर्तता करण्याऱ्या भारतीय सोशल मीडिया स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. तसंच त्यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे माजी कार्यकारी अधिकारी जसप्रित बिंद्रा यांना एक नेक्स्ट जेन भारतीय स्टार्टअप शोधण्यासाठी मदत करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी बिंद्रा यांनी Hapramp ची टीम वेब ३.० सोशल नेटवर्क विकसित करत असल्याचं त्यांना सांगितलं. तसंच हे वाढत्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर विकसित करण्यात येत आहे.

कंपनीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

त्यांना Hapramp फाऊंडिंग टीमचे एक्झिक्युटिव्ह अॅडव्हायझर आणि मेंटोर म्हणू साइन करण्यात आलं आहे. आपल्या फ्लॅगशिप सोशल नेटवर्कींग सोल्यूशन GoSocial सोबतच, Hapramp 1Ramp.io चं देखील काम करते. हे स्टीम ब्लॉकचेन आणि अ‍ॅस्टेरिया प्रोटोकॉल द्वारा संचालित एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. अ‍ॅस्टेरिया प्रोटोकॉल सार्वजनिक डेटाचा खासगी आणि सुरक्षितपणे हाताळण्यास करण्यात मदत करेल.

“आम्ही या निर्णयानंतर आनंदीत आहोत. त्यांच्या गुंतवणुकीमुळे आपल्या कंपनीचा विस्तार करणं आणि काँटेंट तयार करण्याऱ्यांना अधिक सक्षम करण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया Hapramp चे फाऊंडर आणि सीईओ शुभेंद्र विक्रम यांनी दिली. परंतु त्यांनी व्हॅल्युएशनवर कोणतीही माहिती दिली नाही.