महिंद्रा समूहाच्या महिंद्राज ट्रक अँड बस डिव्हिजनने (एमटीबी) इंटरमीडिएट कमर्शिअल वेहिकल्सच्या फुरीओ या नवीन श्रेणीच्या कमर्शियल लाँन्चची आज घोषणा केली. अधिक जास्त नफा मिळवा नाहीतर ट्रक परत करा अशी अभूतपूर्व गॅरंटी फुरीओसोबत देण्यात येत आहे. फुरीओ सादर करून महिंद्राने आईसीव्ही विभागात पदार्पण केले आहे व आता ही कंपनी व्यापारी वापराच्या वाहनांची संपूर्ण श्रेणी सादर करणारी कंपनी बनण्यासाठी सज्ज आहे. आजपासून फुरीओ भारतात सर्वत्र उपलब्ध होणार असून याच्या किमती फुरीओ१२ १९ फीट एचएसडीसाठी 17.45 लाख रुपयांपासून व फुरीओ१४ १९ फीट एचएसडीसाठी 18.10 लाख रुपयांपासून सुरु (एक्स-शोरूम पुणे) होत आहेत.

यावेळी बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पवन गोयंका यांनी सांगितले की, “अधिक जास्त नफा मिळवा किंवा ट्रक परत करा या आजवर कधीही दिल्या न गेलेल्या, ग्राहकमूल्य वाढवणाऱ्या गॅरंटीसोबत बाजारपेठेत दाखल केलेली नवीन फुरीओ श्रेणी आमची या उद्योगाप्रतीची वचनबद्धता व आमच्या उत्पादनावरील आमचा पक्का विश्वास दर्शवते. सीव्ही व्यवसायात आम्ही केलेल्या लक्षणीय गुंतवणुकीचे हे फलित आहे. आज आम्ही जगातील कदाचित पहिला व कदाचित एकमेव सीव्ही ब्रँड आहोत ज्यामध्ये तीनचाकीपासून ४९ टी ट्रकपर्यंत सर्व प्रकारची वाहने उपलब्ध आहेत. सर्वाधिक सुरक्षित, सर्वाधिक एर्गोनॉमिक व आरामदायी केबिन्स असलेले फुरीओचे डिझाईन आमच्यासाठी नवे परिवर्तन तर आणेलच शिवाय या उद्योगक्षेत्रातही नवे मापदंड निर्माण करेल.”

महिंद्राचे ५०० पेक्षा जास्त इंजिनियर्स, १८० पुरवठादार यांचे ४ वर्षांहूनही अधिक काळापासून सुरु असलेले प्रयत्न व ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक यांचे फलित म्हणजे महिंद्रा फुरीओ. याआधी एमटीबीने हेवी कमर्शिअल वाहनांची ब्लाझो श्रेणी सादर केली, त्यासोबत अतिशय यशस्वी व लोकप्रिय ठरलेली ‘मायलेज गॅरंटी’ देण्यात आली ज्यामुळे महिन्द्राला बाजारपेठेतील आपला हिस्सा दुपटीने वाढवण्यात मदत मिळाली.