दिग्गज भारतीय कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या ‘थार’ (Thar) या लोकप्रिय ‘ऑफ रोड’ एसयूव्हीबाबत महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या 1,577 थार गाड्या परत मागवल्या आहेत. थारच्या डिझेल व्हेरिअंटमधील गाड्या कंपनीने रिकॉल केल्या आहेत.

थारच्या डिझेल व्हेरिअंटमधील काही गाड्यांच्या कॅमशाफ्टमध्ये दोष आढळला आहे. कारमधील इंजिनजवळ कॅमशाफ्ट नावाचा एक भाग असतो ज्यामुळे इंजिन नीट काम करतं. 7 सप्टेंबर ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान निर्मिती झालेल्या थार एसयूव्हीच्या डिझेल व्हेरिअंटमध्ये हा दोष आढळलाय. सप्लायर प्लान्टमध्ये मशीन सेटिंगमध्ये दोष निर्माण झाला होता, त्यामुळे थारच्या डिझेल व्हेरिअंटच्या काही गाड्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. दोष असलेल्या गाडी मालकांना कंपनीकडून स्वतः संपर्क केला जाणार असून खराब पार्ट बदलण्याचा खर्चही कंपनी करणार आहे.

दरम्यान, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसादामुळे Mahindra Thar च्या डिलिव्हरीला उशीर होत असून ग्राहकांची प्रतीक्षा लांबत आहे. Mahindra Thar च्या AX OPTIONAL व्हेरिअंटची दिल्ली एक्स-शोरूम किंमत १२.१० लाख रुपये आहे. तर LX व्हेरिअंटची किंमत १२.७९ लाख रुपये आहे. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर महिंद्रा थारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्लोबल NCAP ‘सेफ कार फॉर इंडिया’ क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 4 स्टार्स मिळाले आहेत.