महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिची क्लासिक लीजंड्स ही कंपनी जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल दाखल करण्यास सज्ज झाली आहे. कंपनीनं 293 सीसीच्या इंजिनाचं अनावरण केली असून लवकरच ही मोटरसायकल रस्त्यावर पळताना बघायला मिळणार आहे. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं जे 499 सीसीचं होतं. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून महिंद्रा नवीन जावा बाजारात आणणार आहेत.

नवीन इंजिन… फोटो सौ. जावामोटरसायकल्स डॉट कॉम

पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये आनंद महिंद्रांच्या उपस्थितीत नवीन जावा मोटरसायकल बाजारात दाखल केली जाणार आहे. इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

क्लासिक लीजंड या महिंद्रांच्या मालकिच्या कंपनीनं झेक ब्रँडच्या भारतातल्या विक्रीसाठी आवश्यक ते परवाने घेतले आहेत. मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात येणार असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात येणार नाही व डीलर्स वगैरे वेगळे नेमण्यात येणार आहेत. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी तरूणाईनं उचलून धरलेल्या जावाला आताचा तरूण वर्ग कसं स्वीकारतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.