हिटर वा गीझरचा वापर बहुधा थंडीच्या दिवसांत होतो. उन्हाळय़ात वापर केला जात नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते आणि उन्हाळा संपल्यानंतर लक्षात येते की गीझर खराब झाला आहे. त्यामुळे गीझरची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे.

  • गीझरची जोडणी करण्यापूर्वी त्याचा वापर कोणत्या पाण्यासाठी करणार आहोत, ते पाहणे आवश्यक आहे. पाणी जर क्षारयुक्त असेल तर गीझरच्या कंटेनरमध्ये क्षार जमा होतात आणि कालांतराने गीझर खराब होतो.
  • गीझरसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता शुद्ध नसेल तर थंडीचे दिवस सुरू होण्यापूर्वी गीझरची साफसफाई करणे आवश्यक आहे.
  • वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मातीचे प्रमाण अधिक असेल तर गीझरच्या आतमध्ये माती जमा होते. गीझरला जोडणाऱ्या पाइपामध्ये माती जमा होऊन काही दिवसांनी ते ब्लॉक होतात.
  • गीझरला देण्यात आलेली विद्युत जोडणी योग्य आहे की नाही ते पाहा. कधी कधी जोडणी योग्य प्रकारे नसेल तर विद्युत धक्का लागण्याची शक्यता असते. करंट लागत आहे असे लक्षात आल्यास तात्काळ विद्युत तंत्रज्ञाला बोलावून घ्या.
  • विद्युत जोडणी योग्य नसेल तर गीझरमधून पाणी गळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
  • गीझरवर उष्णतेचा जास्त दाब पडल्यास त्याचा एलिमेंट खराब होऊ शकतो. विद्युत पुरवठा कमी-अधिक प्रमाणात होत असेल तर शक्यतो गीझरचा वापर करू नका.
  • गीझर अधिक वेळ सुरू ठेवू नका. नाही तर त्यावर अधिक दाब पडून तो खराब होऊ शकतो.
  • काम झाल्यानंतर गीझर बंद करणे आवश्यक आहे.