भेदभाव केल्यामुळे पीडिताचे फक्त आरोग्य तसेच कल्याण याचे नुकसान होत नसून यामुळे त्याच्या जोडीदाराचा भावनाविष्कार कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासासाठी जवळपास २ हजार जोडप्यांचे विश्लेषण करण्यात आले. भेदभाव करण्यामुळे जोडप्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे या अभ्यासात अभ्यासण्यात आले.

ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला भेदभावाचा सामना करायला लागतो, त्या वेळी संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच त्या व्यक्तीला नैराश्याचा सामना करावा लागतो. तथापि, हे इथेच संपत नाही. या आलेल्या ताण आणि नैराश्याचा परिणाम सोबत देणाऱ्या जोडीदारावरही होतो, असे अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक विल्यम चोपिक यांनी म्हटले आहे.

संशोधकांनी ५० ते ९४ वर्षे वयाच्या १ हजार ९४९ जोडप्यांचा यासाठी अभ्यास केला. सहभागी झालेल्या जोडप्यांनी भेदभावामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम, उदासीनता, नात्यामध्ये ताण आणि भावनाविष्कार (रोमँटिकपणा) कमी झाल्याचे सांगितले. भेदभाव हा कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो. मात्र त्याच वेळी आपण त्याचा ताण न घेता त्यावर मात करायला हवी. अन्यथा हा आलेला ताण घरात येतो आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले.