13 November 2019

News Flash

मलेरियावरील औषध श्रवणदोषावरही उपयोगी

याबाबतचे संशोधन अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे.

मलेरियावरील उपचारासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जात असलेल्या औषधाचा उपयोग हा आनुवंशिकतेने किंवा जनुकीय व्याधीमुळे येणाऱ्या बहिरेपणाला प्रतिबंध करण्यासाठी होऊ शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबतचे संशोधन अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे. यासाठी त्यांनी झेब्रा माशाचा वापर केला. मलेरिया प्रतिबंधक म्हणून वापर होत असलेल्या अर्टेमिसिनीन या औषधाचा झेब्रा माशावर काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला.

या औषधामुळे अंतर्कणाच्या संवेदी पेशींना काही विशिष्ट प्रथिने ओळखणे शक्य होते. विशेष पटलासाठी आवश्यक असलेली ही प्रथिने ओळखल्यानंतर त्यांचा या पटलापर्यंत पुरवठा करणेही शक्य होते. ही क्रिया घडल्यामुळे श्रवणक्षमता पूर्ववत होते, तिच्यामध्ये सुधारणा घडून येते, असे संशोधकांना दिसून आले.

अंतर्कणातील संवेदी पेशींच्या बाह्य़पटलापर्यंत ही प्रथिने किती प्रमाणात पोहोचतात, यावर श्रवणक्षमता अवलंबून असते. आनुवंशिक व्याधींमुळे या प्रथिनांत अचानक घडून येणाऱ्या काही बदलांमुळे या ऐकण्याच्या क्षमतेमध्ये घट होते. प्रथिनांमधील या बदलांमुळे ते पेशींच्या बाह्य़पटलापर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात.

अंतर्कणातील संवेदी पेशी या त्यांच्या पृष्ठभागावरील केसांसारख्या केशीय पेशींनी झाकलेल्या असतात. या केशीय पेशी ध्वनींमुळे निर्माण होणाऱ्या स्पंदनांचे, हालचालींचे रूपांतर विद्युतीय संकेतांमध्ये करतात. हे संकेत चेतापेशींद्वारे मेंदूतील श्रवणविषयक माहिती गोळा करणाऱ्या आणि तोल सांभाळणाऱ्या भागापर्यंत पोहोचवले जातात.

अर्टेमिसिनीन या औषधामुळे अंतर्कणाच्या पेशींचे कार्य सुरळीत होऊन श्रवणक्षमता आणि तोल सांभाळण्याची क्षमता पूर्ववत होते, असे ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

First Published on June 15, 2019 12:59 am

Web Title: malaria hearing loss