मलेरियाचे निर्मूलन करणे तत्त्वत: शक्य असले, तरी सध्या वापरात असलेल्या लसींमधील त्रुटी आणि मलेरिया नियंत्रणाची साधने- पद्धतींमधील दोष लक्षात घेता मलेरियाच्या संपूर्ण निर्मूलनाची सध्या शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचे जागतिक मलेरिया संचालक डॉ. प्रेडो अलोन्सो यांनी सांगितले की, मलेरियाचे निर्मूलन करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे याबाबत कोणतीही शंका नाही, मात्र त्याविषयीच्या उपाययोजनांच्या शक्याशक्यतांबाबतच प्रश्न निर्माण झाले आहेत. मलेरियाला अटकाव करण्यासाठी आपण सध्या करीत असलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या, तर त्यांच्या माध्यमातून मलेरियाचे निर्मूलन होण्याची फारशी शक्यता नाही, असे त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मलेरिया निर्मूलनाची सध्याची मोहीम सुरू ठेवावी काय, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेला अहवाल डॉ. अलोन्सो यांनी सादर केला. त्या वेळी ते म्हणाले की, मलेरियाविरोधी मोहिमेच्या यशाबद्दल तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शंका दीर्घकाळ कायम आहेत. यावर मात करण्यासाठी कोणतीही सुस्पष्ट योजना अद्याप तयार करता आलेली नाही. त्यामुळे मलेरियाचे निर्मूलन करण्याबाबत कोणतीही ठोस कालमर्यादा सांगता येत नाही, त्याचप्रमाणे यासाठी किती खर्च येईल हेसुद्धा सांगता येत नाही.

जगाभरात मलेरियाचे निर्मूलन व्हावे यासाठी जागतिक आरोग्य संघटना दीर्घ काळापासून प्रयत्नशील आहे. त्यासाठीची मोहीम प्रथम १९५५ मध्ये हाती घेण्यात आली होती. त्यानंतर एका तपाने ही मोहीम बारगळली होती. आतापर्यंत मानवामधील देवी या एकमेव रोगाचे पूर्णत: निर्मूलन झालेले आहे.