पाच वर्षांच्या वयापर्यंत कुपोषित असलेल्या मुलांमध्ये पुढील आयुष्यात श्रवण यंत्रणेत दोष निर्माण होण्याची किंवा बहिरे होण्याची शक्यता असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ऐकू न येणे हे जागतिक अपंगत्वात चौथ्या क्रमांकावर आहे. यातील सुमारे ८० टक्के लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत आढळून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

हा अभ्यास ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात २,२०० तरुणांच्या बालपणातील आहाराबाबतीत विश्लेषण करण्यात आले. बहिरेपणाबाबत लोकांमध्ये जागरूकता कमी असून या अभ्यासामुळे या अपंगत्वाकडे लक्ष वेधले जाऊ शकेल. त्याचप्रमाणे योग्य वयात पोषक आहार दिल्यास बहिरेपणाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे किथ वेस्ट यांनी सांगितले. कुपोषित बालकांमध्ये श्रवण यंत्रणेचा पूर्णपणे विकास होत नसल्याने पुढील आयुष्यात बहिरेपणाचा धोका बळावतो. आईला योग्य आहार न मिळाल्यास बालकांमध्ये कुपोषणाची समस्या मातेच्या गर्भात असतानाच सुरू होते.

संशोधकांच्या मते कानाच्या आतील भागाच्या विकासात कुपोषणामुळे अडथळा निर्माण होतो. मातेच्या गर्भात असतानाच कुपोषणामुळे श्रवण यंत्रणेत दोष निर्माण होण्याचा मोठा धोका असल्याचे संशोधकांना आढळले. अभ्यासात भाग घेतलेल्या तरुणांपैकी ज्यांचे वजन बालपणात अत्यंत कमी होते. त्यांच्यामध्ये बहिरेपणाचा दोष आढळून आला आहे. वयोमानाच्या दृष्टीने अत्यंत कमी वजन असणे हे तीव्र कुपोषणाचे लक्षण आहे. तीव्र कुपोषणामुळे मुले संसर्गजन्य रोगांना संवेदनशील होतात. कानांना सतत होणाऱ्या संसर्गामुळे श्रवण यंत्रणेत दोष निर्माण होतो.