News Flash

आंबा पिकतो, रस गळतो…

आंब्याचा मोसम जेमतेम दोनतीन महिन्यांचा. पण तेवढ्या काळात आपल्या जिभेचे पुरवता येतील तेवढे चोचले पुरवून हे फळ साक्षात अमृताची अनुभूती देत असतं...

खरं तर आंबा व आमरस न आवडणारा मराठी माणूस या भूतलावर शोधावा लागेल.

रश्मी करंदीकर – response.lokprabha@expressindia.com
खाऊ आनंदे

आंब्याचा मोसम जेमतेम दोनतीन महिन्यांचा. पण तेवढय़ा काळात आपल्या जिभेचे पुरवता येतील तेवढे चोचले पुरवून हे फळ साक्षात अमृताची अनुभूती देत असतं..

‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ सर्वानी आपल्या लहानपणी आंब्याचे हे गाणे नक्की ऐकले असेल. आंबा या नावातच एक वेगळे माधुर्य आहे. ‘आम्र’ या संस्कृत नावात तर मस्त राजेशाही थाट आहे. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत. चव, रंग, रूप प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले फळ.

जसे राजे-महाराजे त्यांच्या आगमनाची आगाऊ वर्दी देतात, तसेच आंब्याच्या आगमनाची वर्दी आंब्याचा मोहोर देतो. आंब्याच्या लगडलेल्या आमराईत वाऱ्याच्या झुळकीसोबत वेळ घालवणे यासारखी मस्त दुपार नाही.

खरं तर, आंब्याची चाहूल चैत्रातल्या डाळ-कैरी, कैरीच्या पन्ह्य़ात सुरू होते. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवामध्ये थंडगार कैरीचे पन्हे उन्हाच्या काहिलीने तापलेल्या शरीराला थंडावा देते. आताच्या पिढीला शाळेच्या बाहेरील मावशीच्या टोपलीतील कच्च्या कैरीची मजा अनुभवायला नाही मिळणार. कदाचित, शाळेच्या बाहेर गेटजवळ गावरान मेवा घेऊन बसणाऱ्या मावशीच्या टोपलीमध्ये कैरी विकायला आलेली दिसली की समजायचे बाजारात कैऱ्या आल्यात. मग पैसे साठवून कैरीच्या फोडी तिखटमीठ लावून घ्यायच्या आणि करकरीत कैरीने दात आंबट करायचे. सुट्टी सुरू झाल्यावर तर हिरवीकंच कैरी वेगवेगळे रूप पालटून ताटात यायची. कैरीची चटणी, कैरीचा तक्कू, मोरांबा या पदार्थाने ताटाची डावी बाजू सजवली जायची. गंमत म्हणजे कित्येक वेळा पानातील मुख्य भाजी बाजूला पडून गुळांबा, छुंदा किंवा तक्कूबरोबर पोळीचा फडशा उडायचा. आताच्या रेडीमेडच्या जमान्यात गुळांबा, सुधारस, लोणचे हे घरी बनवतानाचे वातावरण अनुभवणे राहून जाते. गुळांबा किंवा साखरांबा करण्यासाठी आईच्या नाहीतर आजीच्या मागे लागल्यावर सुरुवातीला मिळालेला धपाटा त्यानंतर बाजारातून मुरांब्यासाठी खास कैऱ्यांची खरेदी, कैरी किसण्याचा कार्यक्रम, आईच्या मागे लागून कैरी किसताना चुकून बोटाला इजा व्हायची आणि मग पांढऱ्याशुभ्र कैरीच्या किसावर रक्ताची लाल रेष उठायची आणि पाठीत एक धपाटा, त्यानंतर आजीने जवळ घेऊन फिरवलेला मायेचा हात आजही लख्ख आठवतोय. खरं तर या सर्व प्रकारामुळे ‘टीम वर्क’ समजायचे. वाळवण, लोणची, मुरांबा करण्यासाठी लागलेला प्रत्येकाचा हातभार.. कोणत्याही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये न जाता वर्षांनुवर्षे स्वयंपाकघरात ‘किचन मॅनेजमेंट’चे धडे यशस्वीरीत्या पिढय़ान् पिढय़ा शिकवले जातात. कैरीच्या किसात विरघळलेल्या गुळाचा आंबटगोड वास जेव्हा घरभर पसरतो, त्यात पडलेल्या लंवग, दालचिनी आणि वेलचीचा दरवळ.. सोने पे सुहागा, गुळांबा/ मुरांबा यानंतर नंबर लागतो कैरीच्या करकरीत लोणच्याचा. त्याकरिता मात्र आजी किंवा मावशी, आत्याचा अनुभवी हात लागतो. मुरांबा मात्र जसा दुसऱ्या दिवशी चाखता येतो तसं लोणच्याचे नाही. कैरीच्या लोणच्याची मुरलेली चव यायला तेवढा वेळ द्यावा लागतो.

कैरीच्यानंतर आगमन होते आंब्याचे.. खरं तर आंबा व आमरस न आवडणारा मराठी माणूस या भूतलावर शोधावा लागेल. अगदी परदेशस्थ मराठी माणसालादेखील आईच्या हातची पुरणपोळी आणि आमरस नक्की आठवत असेल, अक्षय्यतृतीयेला फळांच्या राजाचे, आंब्याचे घरी आगमन होते. अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याचे निरनिराळे पदार्थ ठरवले जातात. आमरस-पुरी, आमरस-पोळी, आमरस-पुरणपोळी, आमरस-मांडे , आमरस-सरगुंडे, महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रांतानुसार आमरसाची साथसंगत ठरते.

आम्रखंड, आंब्याची मलईदार कुल्फी, आंब्याचा शिरा.. या सगळ्या डिशनंतर तुम्ही मुंबई-पुण्यातल्या खाऊ अड्डय़ावर मुशाफिरी करत असाल तर फ्रेश मँगो वुइथ क्रीम आणि मँगो फालुदा हे दोन्ही भन्नाट प्रकार तुम्ही या सीझनमध्ये नक्की चाखू शकता. क्रॉफर्ड मार्केटला खरेदी झाल्यानंतर बादशहाचा मँगो क्रीमचा मोठ्ठा बाऊल तुमच्या तोंडात अक्षरश: विरघळतो. आंबाप्रेमींचा अजून एक आंब्याचा आवडता पदार्थ म्हणजे चितळेंची अांबा बर्फी. पुण्याहून पार्सल आणताना मी तरी बाकरवडीपेक्षा झुकते माप आंबा बर्फीला देते. अस्सल गोड खाणाऱ्या घरात आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या स्वादाचे विविध पदार्थ न बनतील तर नवलच! आमरस आणि टम्म फुगलेली पुरी, नुसते डोळ्यासमोर आलं, तरी लुसलुसीत गरम पुरी आणि त्यामध्ये काठोकाठ भरलेला थंडगार आमरस.. अमृताची चव बहुतेक आमरसासारखीच असावी.. पुरणपोळी आणि आमरस असं एकत्र मी जरा उशिराच चाखलं. खरं तर मांडे आणि आमरस असं कॉम्बिनेशन होतं ते.. पण साजूक तुपात भिजलेली, गुळातील, जायफळयुक्त मऊसूत पुरणपोळी (अस्सल खवय्ये नेहमी गुळातील पुरणपोळीच चाखतात) आणि हापूस आंब्याचा थंडगार, ताजा रस.. अहाहा ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणून समजा.. रविवारची दुपार या जेवणाची असेल तर चार तास झोपेची (वामकुक्षी हो) गॅरंटी. आंब्याच्या रसाची चव जिभेवर रेंगाळताना पंखा फुल्ल करून (हल्लीच्या एसीमध्ये) गारेगार झोपणं यासारखे सुख नाही. माणूस उगाचच सुखाच्या मागे धावतो. आंब्याच्या सिझनमध्ये अांबा किती प्रकारे सुखाचे क्षण घेऊन तुमच्यासमोर उभा असतो. गरज असते फक्त ते क्षण जगण्याची .. आंब्याच्या मोहरलेल्या झाडाचा आसमंतात दरवळलेला सुगंध, घरातल्या आढीत आंबे काढून ठेवल्यावर घरभर मंद दरवळणारा आंब्याचा वास (न चुकता तुम्हाला आंबे खाण्याची आठवण करून देतो), आंब्याच्या झाडावरून ऐकू येणारे कोकिळेचे कुंजन (आंब्याचा मोसम आला आहे याची एवढी सुरेल वर्दी हा पक्षी देतो) उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत.. मला सांगा इतर  कोणत्या फळाचा बहर आल्यावर एवढे सुरेल कुंजन ऐकायला मिळते?

आमरस तयार करण्याचा आनंद, तो तयार झाल्यावर पातेले चाटूनपुसून साफ करण्याचा आनंद, तुम्हाला आमरस आवडतो म्हणून घरच्यांनी राखून ठेवलेली आमरसाची वाटी हातात देण्याचा आनंद, आमरस घालून छान साजूक तुपातला शिरा रविवारी नाष्टय़ाला चाखण्याचा आनंद, हेही कमी असेल तर अस्सल केशर घालून हापूसच्या रसातील आम्रखंडाचा आनंद… झालंच तर  मँगो आइस्क्रीम, गिरगावची मँगो कुल्फी, मँगो क्रीम.. अशा अनेकविध पदार्थानी आपले जीवन आम्रमय होऊन जाते आणि मग बघता बघता पाऊस येतो आणि आंब्याचा आणि आपला वियोग सुरू होतो, तो पुढच्या वर्षीपर्यंत.. आता आंब्याचा रस टीनमध्ये मिळतो, पण शेवटी ते दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे.

आता आजकालच्या जमान्यात नेमके आंब्याच्या मोसमामध्ये आपल्याला वजन वाढल्याचा आणि आपण जाड झाल्याचा साक्षात्कार होतो. मग डाएटरूपी राक्षस आपल्या मागे लागतो. ‘आंबा’ बिलकूल खायचा नाही, सांगणारी सर्व डाएटिशियन मंडळी मला माझे हितशत्रू वगैरे वाटू लागतात. हे म्हणजे समोरून आवडता हिरो किंवा हिरॉइन येत असताना, डोळे मिटून घेणे. अशा वेळी माझ्या मैत्रिणीचे एक ब्रह्मवाक्य मला नेहमी कामी येते. ती म्हणते, ‘‘डाएट ही एक अंधश्रद्धा आहे.’’ थोरामोठय़ांचे ऐकावे माणसाने, चांगले असते.. तेव्हा मी लगेच माझा मोर्चा फ्रेश मँगो विथ डबल क्रीमकडे वळवते, पोटात थोडी जागा असेल तर अस्सल मँगो आइस्क्रीमलापण न्याय देते.

आणि अशा प्रकारे माझ्या डाएटरूपी तपश्चर्येचा भंग ‘आम’नामक मेनकेकडून होतो आणि माझा विश्वामित्र होऊन जातो..

खरं तर देवाने फार थोडा काळ म्हणजे महिना-दोन महिनेच या फळाला देऊन आमच्यासारख्या आम्रप्रेमींवर घोर अन्याय केलाय. अस्सो आता उरलेले रविवार आकंठ आम्रानंदात घालविण्यासाठी तयारीला लागू या..

इस मौसम में आम नहीं खाया .. तो क्या जिया

….so be Mangolicius!
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 4:46 pm

Web Title: mango food recipes lokprabha article
Next Stories
1 बॉलिवूड चित्रपटांमुळे पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये पडली ‘या’ ठिकाणांची भर
2 हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी फक्त डायल करा….
3 परोट्याची गोल गोष्ट
Just Now!
X