विवाहित पुरुषांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे घरकामामध्ये पत्नीला मदतीस तत्पर असणारे व दुसरे म्हणजे असे पती जे अजिबात घरकाम न करणारे. अमेरिकेतील विद्यापीठांमधील प्राध्यापकांनी केलेल्या पाहणीत असं आढळून आलेलं आहे, की घरात काम करणाऱ्या विवाहितांपेक्षा घरात काम न करणारे पुरूष हे आपापल्या क्षेत्रात जास्त पैसे कमावतात.

नोत्रे डॅम विद्यापीठानं पर्सनल सायकॉलॉजी या मॅगेझिनमध्ये हा निबंध प्रसिद्ध केला असून घरकाम टाळणारे जास्त पैसे कसे कमावतात यावरच अभ्यास केला आहे. घरात काम करण्यास उत्सुक नसणारे पती आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी देत असल्यामुळे तिथं ते जास्त यशस्वी होतात व अधिक पैसे कमावतात असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

मानसशास्त्रामध्ये मानवी व्यक्तिमत्त्वाचे पाच पैलू सांगताना ‘agreeable’ किंवा स्वीकारायची वृत्ती हा महत्त्वाचा पैलू मानला आहे. अशा व्यक्ती करुणा असलेल्या, मृदू स्वभावाच्या व कायम मदतीस तत्पर अशा असतात. तर ‘disagreeable’ किंवा सहज स्वीकार न करणाऱ्या व्यक्तींकडे हे गुण कमी असतात, मात्र त्या स्वत:मध्ये गुंतलेल्या असतात व अत्यंत स्पर्धात्मक असतात.

ब्रिटनी सॉलोमन, सिंडी मूर (झपाटा), मॅथ्यू हॉल या नोत्रे डॅमच्या प्राध्यापकांसह मिनेसोटा विद्यापीठाच्या एलिझाबेथ कँम्पबेल यांनी हा अभ्यास अहवाल सादर केला आहे. डिसअॅग्रीएबल व्यक्ती या स्वत:वर लक्ष केंद्रीत करतात, या व्यक्ती पत्नीला घरकामात मदत करत नाहीत आणि ते कायम आपल्या कामामध्ये गुंग असतात. परिणामी त्यांचे आर्थिक उत्पन्नही जास्त असते, असे आढळले आहे. डिसअॅग्रीएबल लोकांच्या बाबतीतला हा अनुभव पुरूषांची व स्त्रियांची कामाची विभागणी करायची प्रथा असलेल्या घरांमध्ये जास्तच येतो. अशा घरातील स्त्रियांनी घरकाम आपलीच जबाबदारी मानलेलं असतं आणि त्या ही कामं अत्यंत कार्यक्षमतेनं करत असतात. अर्थात, जर पत्नी घरकामाच्या बाबतीत कर्तव्यनिष्ठ नसेल तर मात्र अशा महिलेच्या डिसअॅग्रीएबल पतीला खूप यश मिळेलच याची हमी देता येत नाही, हे ही नमूद करण्यात आले आहे.

तसंच डिसअॅग्रीएबल व्यक्तींना कार्यालयात जास्त यश मिळत असलं तरी इतरांनी त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करू नये असा इशाराही, तज्ज्ञांनी दिला आहे. या अभ्यासातून असाही निष्कर्ष काढण्यात आलाय की जर कर्मचाऱ्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या किंवा कामाचं ओझं कमी करता आलं तर त्यांची कार्यालयीन कार्यक्षमता वाढू शकेल. घरातली कामं व देखभाल करणारे सर्विस प्रोव्हायडर पुरवणे, मुलांची देखभाल करण्याची व्यवस्था करणं, आवश्यकतेनुसार घरात लागू शकतात अशा सेवा करणारी यंत्रणा उभारणं आदी सुविधा जर कंपनीनं कर्मचाऱ्यांना पुरवल्या तर त्यांची कार्यालयीन कार्यक्षमता वाढू शकते असा निष्कर्षही काढण्यात आला आहे.

यशस्वी व्यक्ती त्यांचा सन्मान झाल्यावर पत्नीचं कौतुक करतात, तिच्यामुळेच हे शक्य झालं वगैरे सांगतात. या अभ्यास अहवालातील प्राध्यापकांच्या सांगण्यानुसार किमान डिसअॅग्रीएबल लोकांच्या बाबतीत असं निश्चित म्हणता येईल की यात तथ्य आहे.