देशातील नवतरुणांचा (मिलेनियल्स) कार खरेदी करण्याकडे कल कमी झाल्यामुळे वाहन विक्री कमी झाली, त्यामुळे ऑटो क्षेत्रात मंदी आली अशा आशयाचं विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. वाहन विक्रीतील मंदीसाठी सीतारामन यांनी केलेली ही कारणमीमांसा बरीच चर्चेत होती. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी Maruti Suzuki चे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सीतारामन यांच्या त्या विधानाचं समर्थन केलं आहे.

‘द मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, “नवतरुण प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य देतात. परिणामी कार खरेदी करण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही. त्यामुळे ते कार खरेदीवर पैसे खर्च करण्यापेक्षा नवनवे इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट खरेदी करण्याला प्राधान्य देतात”, असं मत भार्गव यांनी वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीबाबत बोलताना व्यक्त केलं. “अशा परिस्थितीत वाहनांवरील जीएसटी तात्पुरता कमी केल्यानेही भविष्याच्या दृष्टीकोनातून जास्त फरक पडणार नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

पुढे बोलताना, “सुरक्षिततेच्या आणि प्रदूषणाच्या नव्या नियमांमुळे वाहनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या नव्या नियमांमुळे वाहनांचा दर्जा वाढला पण भारतीयांची कमाई किंवा खर्च करण्याची क्षमता तितकी वाढलेली नाही. त्यामुळे हे देखील वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमागील एक कारण असू शकतं” असंही भार्गव म्हणाले आहेत.

काय म्हणाल्या होत्या सीतारामन- 
देशाच्या वाहन क्षेत्रातील मंदीला नवतरुण पिढीतील प्रवाशांची बदलती मानसिकता कारणीभूत असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या १०० दिवसांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आय़ोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वाहन विक्रीतील सध्याच्या मंदीची कारणमीमांसा करताना त्यांनी हे विधान केलं होतं.

ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो, पण गेल्या वर्षभरापासून या क्षेत्रात मंदी आली आहे.