करोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण झाला. तसंच या कालावधीत अनेक उद्योगधंदेही बंद ठेवण्याचा निर्णय घेणअयात आला होता. लॉकडाउनच्या कालावधीत मे महिन्यात कार उत्पादक कंपन्या मारूती सुझुकी आणि ह्युंदाईनं तब्बल ३१ हजार गाड्यांची विक्री केली आहे. यापैकी १० हजार पेक्षा अधिक गाड्यांची विक्री परदेशी बाजारात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मे महिन्यात कंपनीनं जवळपास १८ हजार ५३९ गाड्यांची विक्री केली असल्याची माहिती मारूती सुझुकी इंडियाकडून सोमवारी देण्यात आली. तसंच या दरम्यान कंपनीनं ४ हजार ६५१ गाड्यांची निर्यात केली. परंतु गाड्यांची ही विक्री गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील गाड्यांच्या विक्रीच्या तुलनेत ८६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीनं १ लाख ३४ हजार ६४ गाड्यांची विक्री केली होती. यावर्षी मे महिन्यात करण्यात आलेली गाड्यांची निर्यात गेल्या वर्षी याच वर्षी करण्यात आलेल्या गाड्यांच्या निर्यातीच्या तुलनेत ४८.८२ टक्क्यांनी कमी आहे.

सरकारच्या नियमांचं पालन करत १२ मे पासून मानेसर येथील प्रकल्पात तक १८ मे पासून गुरूग्राम येथील प्रकल्पात गाड्यांच्या उत्पादनाचं काम सुरू करण्यात आलं असल्याचं कंपनीनं सांगितलं. याव्यतिरिक्त गुजरात येथील प्रकल्पातही २५ मे पासून उत्पादन सुरू करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं.

ह्युंदाईकडून १२ हजार ५८३ गाड्यांची विक्री

देशातून सर्वाधिक गाड्या निर्यात करणारी कंपनी ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडनं मे महिन्यात १२ हजार ५८३ गाड्यांची विक्री केली आहे. यादरम्यान देशांतर्गत बाजारात कंपनीनं ६ हजार ८८३ गाड्यांची तर परदेशातील बाजारात ५ हजार ७०० गाड्यांची विक्री केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.