करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना भारतात रुग्णांसाठी ऑक्सिजनची मोठी उणीव भासू लागली असून या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने ऑक्सिजनच्या संकटात मदतीचा हात पुढे केला आहे.

करोनाच्या रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्यासाठी कंपनीने मानेसार आणि गुजरातमधील कारखाने १ ते ९ मे दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कंपनीच्या कारखान्यांमध्ये उत्पादन होणार नाही. कारखान्यामध्ये कारच्या प्रोडक्शनसाठी फार कमी ऑक्सिजनचा वापर केला जातो, तर पार्ट्स तयार करण्यासाठी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणजे वाहन घटक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होतो, हे लक्षात घेऊन कंपनीने नियोजित वेळेपूर्वी कारखाने मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका निवेदनाद्वारे कंपनीने ही माहिती दिली. यापूर्वी जूनमध्ये कारखाने मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. परंतु ऑक्सिजन संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनी वेळेपूर्वीच म्हणजे १ ते ९ मे दरम्यान कारखाने मेंटेनन्ससाठी बंद ठेवणार आहे. ९ मे नंतर कंपनीच्या संसाधनाचा वापर ऑक्सिजन निर्मितीसाठी करता येणार आहे.

दुसरीकडे, ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशननेही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांट्ससाठी २० कोटी रुपये आर्थिक मदत पॅकेज देण्याचे जाहीर केले आहे.