देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी मारुती सुझुकीने शुक्रवारी 60 हजाराहून अधिक गाड्या परत(रिकॉल) मागवल्या आहेत. कंपनीने 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत मॅन्युफॅक्चर केलेल्या कार परत मागवल्या आहेत.

एकूण 63,493 गाड्या कंपनीने परत मागवल्यात. परत मागवलेल्या गाड्यांमध्ये सियाझ (Ciaz), अर्टिगा आणि XL6 च्या पेट्रोल स्मार्ट हायब्रिड (SHVS) व्हेरिअंट्सचा समावेश आहे. या कारमधील मोटर व्हेईकल जनरेशन युनिट (MGU) मधील कमतरतेची तपासणी करण्यासाठी या कार परत मागवण्यात आल्या आहेत. परत मागवण्यात आलेल्या कारच्या मालकाशी मारुतीच्या डिलर्सकडून संपर्क साधला जाणार आहे. जर गाडीमध्ये दुरूस्तीची आवश्यकता असेल तर ग्राहकाला पर्यायी वाहन उपलब्ध करुन देण्याचाही कंपनीचा प्रयत्न असेल. दुरूस्तीसाठी कंपनीकडून कोणतेही अतिरिक्त शूल्क आकारले जाणार नाही.

“आपल्या ग्राहकांचं हित लक्षात ठेवून कंपनीने वाहनांच्या तपासणीसाठी गाड्या रिकॉल केल्यात. तपासणीदरम्यान गाड्यांमध्ये समस्या न आढळल्यास त्या गाड्या तातडीने मालकाला सुपूर्द केल्या जातील. तसंच ज्या गाड्यांमध्ये दुरूस्तीची आवश्यकता असेल त्या मोफत दुरूस्त केल्या जातील”, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट महिन्यात ‘फ्युल हॉज’मध्ये दुरुस्तीसाठी 40,618 WagonR (1.0 लीटर) गाड्या परत मागवल्या होत्या.