देशाच्या वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने भारतीय बाजारात पुन्हा एकदा डिझेल इंजिन असलेल्या गाड्या विक्रीला आणण्याची तयारी केली आहे. डिझेल सेगमेंटमधील वाहनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असून एसयूव्ही आणि मल्टिपर्पज व्हेईकल (MPV) वाहनांची डिमांड वाढत असल्याने मारुती पुन्हा एकदा डिझेल सेगमेंटमध्ये उतरणार असल्याचं वृत्त आहे.

एप्रिल महिन्यात बीएस-6 इंजिनबाबतचे निकष लागू झाल्यानंतर भारतातील आघाडीची कार कंपनी मारुतीने डिझेल इंजिन मॉडेल्स बंद करण्याची घोषणा केली होती. केवळ पेट्रोल आणि CNG मोटर्सचाच वापर करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. पण आता सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनी लवकरच आपला निर्णय बदलण्याची शक्यता असून मारुतीने त्यांचा मानेसर पॉवरट्रेन प्लांट अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून ते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा सणासुदीच्या काळात बीएस-6 डिझेल इंजिन गाड्या सादर करु शकतील. कंपनी आपल्या मानेसर प्रकल्पातील विद्यमान सेटअप अपडेट करण्याची तयारी करत आहे. यापूर्वी कंपनीने याच प्लांटमध्ये विकसित केलेले 1,500 cc चे बीएस-6 उत्सर्जन मानक डिझेल इंजिन बाजारात आणले होते.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी भारताच्या डिझेल इंजिन सेगमेंटमध्ये लवकरच पुनरागमन करणार आहे. पण, यासाठी कोणत्याही तारखेची घोषणा कंपनीकडून करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये डिझेल इंजिन पुन्हा लाँच केलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या गाड्यांमध्ये वापरलं जाणार डिझेल इंजिन? –
2021 मध्ये Maruti Vitara Brezza आणि Ertiga MPV या दोन कार्समध्ये डिझेल इंजिन देऊन भारताच्या डिझेल इंजिन सेगमेंटमध्ये मारुती पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय गाड्यांमध्ये या दोन्ही गाड्यांचा समावेश होतो. मात्र, अद्याप मारुतीकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.