हृदयाच्या धमन्यांच्या अगदी बाहेरच्या थरातील मेद हा अनेकदा आरोग्यास उपकारक ठरतो कारण जेव्हा हृदयाच्या स्नायूंवर ताण येतो तेव्हा तो सहन करण्याची ताकद त्यातून मिळत असते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. आतापर्यंत तरी धमन्यातील मेदाचा थर हा घातक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सायंटिफिक रिपोर्ट्स या  प्रसिद्ध नियतकालिकातील माहितीनुसार पेरिव्हॅस्क्लुलर अ‍ॅडिपोज टिश्यू म्हणजे पीव्हीएटीमुळे धमन्यांना स्नायूंवरील ताण सोसण्याची ताकद मिळते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील स्टिफनी व्ॉट्स यांनी म्हटले आहे की, जास्त द्रव सामावण्यासाठी पित्ताशय जसे विस्तारले जाते तसे या धमन्यांमध्ये घडते.  आमच्या अभ्यासानुसार पीव्हीएटीमुळे रक्तवाहिन्यांवर आलेला ताण कमी होतो. रक्तवाहिन्यांचे तीन भाग आतापर्यंत मानले जात होते. त्यात टय़ुनिका इंटिम हा आतला थर, टय़ुनिका मीडिया मधला थर, टय़ुनिका अ‍ॅडव्हेनशिया हा बाहेरचा थर यांचा समावेश होता, पण आता टय़ुनिका अ‍ॅडिपोसा हा आणखी एक थर लक्षात आला आहे.

हा थर म्हणजे अवयवाच्या रक्तवाहिन्यांचे पारपटल असते. अनेक वर्षे टय़ुनिका अ‍ॅडिपोसा या थराकडे दुर्लक्ष केले गेले, पण आता त्याचे महत्त्व लक्षात आले आहे. पीव्हीएटी हा चौथा थर असून त्याला टय़ुनिका अ‍ॅडिपोसा असे म्हणतात. काही वेळा रक्तवाहिन्या आकुं चन पावतात तेव्हा ताण येतो. त्यात या थराचा उपयोग होतो. उंदरांमधील थोरॅकिक अ‍ॅरोटा या रक्तवाहिन्यांमध्ये पीव्हीएटीमुळे ताण कमी झाल्याचे दिसून आले.