11 December 2019

News Flash

मेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध

फेफरे किंवा फीट येणे हा एक गंभीर आजार आहे. पण आता त्यावर एक नवीन औषध विकसित करण्यात आले आहे.

डय़ुक विद्यापीठाचे संशोधन
फेफरे किंवा फीट येणे हा एक गंभीर आजार आहे. पण आता त्यावर एक नवीन औषध विकसित करण्यात आले आहे. कुंभखंड म्हणजे टेम्पोरोल लोब या मेंदूच्या भागाशी संबंधित असा फेफऱ्याचा एक प्रकार असतो, त्यामुळे मेंदूच्या स्मृती व भावभावनांशी निगडित भागावर परिणाम होत असतो. त्यामुळे रुग्णांची खूप मोठी हानी होते. सध्या तरी कुंभखंडाशी संबंधित फेफऱ्यावर औषध नाही. अगदी त्याची तीव्रता कमी करणारेही औषध नाही. पण आता ते विकसित करण्यात येत आहे. डय़ुक विद्यापीठात संशोधकांनी उंदरांवर याबाबत केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत.
हे औषध आता मानवालाही वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे वेळोवेळी फेफरे येण्याचे प्रमाण कमी होईल, असे प्रा. जेम्स मॅकनमारा यांनी म्हटले आहे. किमान काही प्रकरणांत तरी असे फेफरे लहानपणी सुरू होते व नंतर ते वाढतच जाते. संशोधनानुसार टीआरकेबी हा रिसेप्टर अतिक्रियाशील झाल्याने हा रोग होतो. हा रिसेप्टर म्हणजे संग्राहक मेंदूत असतो व त्यामुळे एकदा आलेले फेफरे वारंवार येऊ लागते. २०१३ मध्ये मॅकनमारा यांच्या गटाने टीआरकेबी या रसायनाचा अभ्यास केला व त्याचे कार्य उंदरांमध्ये बंद पाडले असता फेफरे वाढत नाही असे दिसून आले. असे असले तरी टीआरकेबीला लक्ष्य करणे धोकादायक आहे. कारण त्याचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम असतात. या रसायनामुळे मेंदूतील न्यूरॉन्सचे संरक्षण होत असते. संशोधकांच्या मते टीआरकेबीचे काम बंद केले तर उंदराच्या मेंदूतील न्यूरॉन्स मरतात असे दिसून आले आहे.
मेंदूतील अनेक संदेशवहन मार्गातील पेशी या टीआरकेबीमुळे कार्यान्वित होत असतात व त्याचे बरे-वाईट परिणाम दिसून येतात. फेफरे हे फॉस्फोलिपेस सी (गॅमा १) हे वितंचक टीआरकेबीच्या क्रियाशीलतेमुळे उद्दिपीत होते. जर उंदरांमध्ये फॉस्फोलिपेस सी (गॅमा १) या वितंचकाचा संबंध टीआरकेबीपासून तोडला तर कमी नुकसान होते. त्यानंतर संशोधकांनी पीवाय ८१६ हे प्रथिनाधारित औषध तयार केले व त्यामुळे टीआरकेबी व फॉस्फोलिपेस सी (गॅमा १)यांचा संबंध तोडण्यात आला असता मेंदूतील फॉस्फोलिपेस सी (गॅमा १) कमी झाले. तीन दिवस हे औषध उंदरांना देण्यात आले असता त्यांच्यात फेफऱ्यामुळे होणारी हानी कमी झाली. या औषधाने फॉस्फोलिपेस सी (गॅमा १)ची क्रियाशीलता रोखण्यात यश आले आहे.

First Published on October 28, 2015 8:25 am

Web Title: medicine on brain damage deices
टॅग Brain,Medicine
Just Now!
X