जनुकीय बदलांनी संस्कारित केलेल्या कोंबडय़ांच्या अंडय़ांमध्ये जी प्रथिने असतात त्यांच्या अभ्यासातून कर्करोगासह इतर रोगांवर गुणकारी औषधे तयार करणे शक्य होणार आहे. वैज्ञानिक संशोधनासाठी उच्च प्रतीची प्रथिने तयार करण्याच्या हेतूने काही जनुक संस्कारित कोंबडय़ा तयार करण्यात आल्या त्यांच्या अंडय़ांमध्ये वेगळ्या प्रकारची प्रथिने आढळून आली. याच प्रथिनाप्रमाणे काम करणारे औषध शोधून काढणे सध्याच्या काळात शक्य आहे असा दावा एडिंबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.

या कोंबडय़ांच्या अंडय़ातील प्रथिने एका विशिष्ट पद्धतीने वेगळी करून त्यांचे स्वरूप जाणून घेण्यात आले. जर्नल बीएमसी बायोटेक्नॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार यातून उच्च प्रतीची औषधे तयार करता येणार आहेत. कोंबडीची अंडी ही याअगोदरच लशींमध्ये वापरले जाणारे विषाणू तयार करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. त्यामुळे आता या अंडय़ांचा वापर औषधे तयार करण्यासाठी होणार असून कोंबडीच्या डीएनएचा अभ्यासही यात केला आहे.

माणसाच्या प्रतिकोरशक्तीसाठी आयएफएननाल्फा २ ए हे प्रथिन महत्त्वाचे ठरते ते कर्करोगावर मात करू शकते. माणूस व डुकरात या प्रथिनाला मॅक्रोफेज सीएसएफ म्हणतात. ते या कोंबडीच्या अंडय़ांचा वापर करून तयार करता येते. औषध तयार करण्यासाठी यात तीन अंडी पुरेशी असतात. कोंबडय़ा वर्षांतून तीनशे अंडी देतात त्यातून जास्त किफायतशीर दरात औषधे तयार करता येतात. औषध संशोधनात उपयोगी प्रथिने तयार करण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त आहे असे हेलेन सँग यांनी सांगितले. प्रथिनांवर आधारित औषधात अ‍ॅव्हास्तिन व हेरसेप्टिन यांचा समावेश होतो ती कर्करोगावर वापरली जातात.