ऋतू पर्यटन
नवनाथ फडतरे – response.lokprabha@expressindia.com

पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घ्यायचा असेल तर अनेकांची पावलं ईशान्य भारताकडे वळतात. त्यातही पावसाळ्यात तिथे फिरायचं नियोजन केलं तर चेरापुंजी, मानसिंराम यासारख्या प्रचंड पावसाच्या प्रदेशात जाऊन मनसोक्त भिजण्याची मजा अनु़भवता येईल.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

ईशान्य भारत हा समृद्ध वनसंपत्ती असलेला प्रदेश आहे. येथील सात राज्यांना सेव्हन सिस्टर्स असेही म्हणतात. आणि आठवे राज्य म्हणजे सिक्कीम होय. हा भाग भाषिक, वांशिक, सांस्कृतिक विविधतेने जसा नटलेला आहे, त्याचप्रमाणे तो नसाíगक साधन-संपत्तीनेदेखील समृद्ध असा आहे. येथे अभयारण्ये आहेत. त्याचबरोबर इथल्या जमिनीत तेल आणि कोळसाही सापडतो. उत्तरेकडे हिमालयाची पर्वतरांग आहे, तर दक्षिणेकडे असणाऱ्या गारो, खासी, जातीया टेकडय़ा आणि यामधील ब्रह्मपुत्रा नदीचे विशाल असे खोरे आहे. तिला वेगवेगळ्या दिशांमधून मिळणाऱ्या अनेक नद्या आहेत. अमूल्य असा नैसर्गिक ठेवा असणारा भाग म्हणजे ईशान्य भारत होय.

मेघालय : मेघांच्या वास्तव्याचे ठिकाण

ईशान्य भारतातील दक्षिणेकडील एक राज्य म्हणजे मेघालय होय. गारो, खासी आणि जातिया टेकडय़ा हे या भागाचे खास आकर्षण आहे. दूपर्यंत धुक्यात हरवलेली गर्द हिरवीगार झाडी असणारी शिखरे, रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले चहाचे मळे, उंचच उंच डोंगरकडय़ांवरून कोसळणारे शुभ्र पाण्याचे धबधबे, स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याच्या नद्या, खोल दऱ्या आणि नसर्गिकरीत्या तयार झालेल्या गुहा पाहताना माणूस निसर्गाच्या सान्निध्यात हरवून जातो. खरे तर जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणजे मेघालय. टेकडय़ांवर उतरलेले पांढरेशुभ्र ढग पळताना पाहून निसर्गासमोर नतमस्तक व्हायला होते. हा निसर्गाचा नजारा पाहण्यात आपण गुंग होऊन जातो. दूपर्यंत पसरलेले चहाचे मळे पाहताना एका वेगळ्याच विश्वात वावरत असल्याचा भास होत राहतो. पावसाळ्यात इथले वातावरण डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे असते. मेघालयामधील शिलाँग आणि चेरापुंजीला भेट दिल्यानंतर निसर्गाचा नवा आविष्कारच जणू ‘याची देही, याची डोळा’ पाहायला मिळतो. निसर्गप्रेमींच काय, तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी मेघालयाला भेट द्यावी.

शिलाँग

ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक हिल स्टेशन्स वसवली. त्यामधीलच एक म्हणजे मेघालयातील शिलाँग. १८ व्या शतकात ब्रिटिश येथे आले तेव्हा इथला परिसर, टेकडय़ा पाहून म्हणाले होते की, हे तर पूर्वेकडचे स्कॉटलंड. भारतीय हवाई दलाचे पूर्वेकडील मुख्यालय शिलाँग येथे आहे. १९७२ पर्यंत संयुक्त आसामची राजधानी शिलाँग येथे होती. १८ व्या शतकात येथे आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. त्याचबरोबर आधुनिक शिक्षण देण्यासाठी शाळाही सुरू केल्या. शिलाँगमधील पोलीस बाजारमध्ये आपण खरेदी करू शकतो. ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा वारसा असलेल्या येथील घरांच्या विशिष्ट रचना आणि येथील हॉटेल्स आणि कॅफेमधील वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी ओळख आहे. खरे तर मेघालयची राजधानी आणि सर्वात मोठे शहर म्हणजे शिलाँग हे डोंगरउतारावर वसलेले आहे. शिलाँगमधील शिलाँग व्ह्य़ू पॉइंटवरून आपण संपूर्ण शिलाँग शहर पाहू शकतो. आसमंतात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरविलेले शिलाँग शहर वेगळीच अनुभूती देते.

एलिफ न्टा धबधबा

शिलाँगपासून काही अंतरावर असणाऱ्या या धबधब्यास स्थानिक लोक तीन पायऱ्यांचा धबधबा असे म्हणतात. कारण हा धबधबा तीन टप्प्यांत पडत असतो. ब्रिटिशांनी या धबधब्यास एलिफ न्टा हे नाव दिले. कारण या धबधब्याच्या डाव्या बाजूस हत्तीच्या आकाराचा खडक होता. मात्र तो १८९७ साली झालेल्या भूकंपामध्ये नष्ट झाला. पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी येथे बांधण्यात आलेल्या पायऱ्यांमुळे आणि पुलांमुळे आपण धबधबा सर्व बाजूंनी पाहू शकतो. काळ्या खडकांवरून खाली येणारे पाणी हिरव्यागर झाडांमुळे मोहक भासते. या धबधब्यातून उडणारे पाण्याचे तुषार वेगळाच आनंद देऊन जातात.

उमियाम तलाव

शिलाँग शहराच्या उत्तरेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर उमियाम तलाव आहे. १९५७ साली उमियाम नदीचे पाणी वीजनिर्मिती करण्यासाठी अडवल्यामुळे या तलावाची निर्मिती झाली आहे. हा तलाव गर्द हिरव्यागार झाडींनी वेढलेला आहे. बाजूंनी असणारी डोंगररांग ही तलावाची खरी ओळख आहे. साहसी पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणून हा तलाव प्रसिद्ध आहे. बोटिंग, वॉटर सायकिलग आणि कायाकिंगजर याचा तुम्हाला अनुभव घेण्यासाठी उमियाम तलावाला भेट द्यायलाच हवी.

चेरापुंजी

मेघालयातील चेरापुंजी म्हटले की मोठमोठे धबधबे, डोंगरावर उतरलेले ढग, धुके आणि पाऊस हेच डोळ्यांसमोर येते. सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. चेरापुंजीचे स्थानिक भाषेतील नाव सोहरा होय. येथे ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी सोहरास चुरा म्हटले आणि मग त्याचे चेरापुंजी झाले. या ठिकाणी जास्त पाऊस पडण्यामागचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागराकडून जवळजवळ ४०० किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकडय़ांना धडकतात. ते ढग चेरापुंजीजवळ एकत्र येतात. परिणामी, वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचीवरील तापमान थंड असल्याने त्या बाष्पाचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापुंजीस सर्वात जास्त पाऊस पडतो. शिलाँगपासून चेरापुंजी सुमारे दोन तासांत येते. या ठिकाणी सेव्हन सिस्टर फॉल्स, जिथे एकाच दरीत सात धबधबे कोसळतात. इथल्या मोठमोठय़ा दऱ्या संपूर्णपणे धुक्यांमध्ये न्हाऊन निघतात.

झाडांच्या मुळांपासून नैसर्गिक पूल

चेरापुंजीमध्ये झाडांच्या मुळांपासून बनलेले पूल हे प्रमुख आकर्षण आहे. हे पूल पाहण्यासाठी चेरापुंजीजवळील त्यारना या गावापासून दरीच्या खालच्या टोकास असणाऱ्या नोंग्रियामध्ये जावे लागते. त्यारना ते नोंग्रिया या दोन खेडय़ांमधील अंतर तीन किलोमीटर असून हे अंतर पार करताना सुमारे ३५०० पायऱ्या उतरत खोल दरीमध्ये जावे लागते. या पायऱ्या उतरताना आजूबाजूला असणारी झाडे आणि स्थानिक लोकांची पारंपरिक स्वरूपाची घरे आपण पाहत खाली उतरत परिसर न्याहाळण्याची वेगळीच संधी मिळते. येथे बाजूला असणाऱ्या दुकानांमधून पायऱ्या उतरताना आपण खाण्यासाठी काही घेऊ शकतो. सुमारे तीन हजारहून अधिक पायऱ्या उतरून खाली गेल्यावर जाड अशा तारांपासून बनवलेला एका नदीवर असलेला पूल आपल्याला ओलांडावा लागतो. या जाड तारांच्या पुलावरून एका वेळी चार ते पाच व्यक्ती एकाच वेळी जाऊ शकतात. हा पूल ओलांडताना पुलाखालील निळ्याशार रंगाचे पारदर्शक स्वच्छ पाणी पाहत आपण थोडेसे भीत-भीतच हा पूल ओलांडावा लागतो. पूल ओलांडल्यानंतर काही झाडांच्या मुळांचे पूल आपल्याला ओलांडावे लागतात. मग आपण पोहोचतो त्या डबलडेकर पुलाजवळ. एकावर एक असे दोन पूल येथे असून खालून वाहणारा ओढा आणि त्याचे नितळ, थंड पाणी,  ओढय़ामधील खडकावर बसून थंड पाण्यात पाय बुडवून थकलेल्या पायांना आपण आराम देऊ शकतो. झाडांची मुळे एकमेकांत गुंतत हे पूल तयार होतात. सुरुवातीला येथील स्थानिक लोक नदीकाठच्या झाडांची मुळे एकमेकांत गुंतवतात. मात्र नंतर मुळे नसर्गिकपणे मजबूत होत जातात. हे पूल तयार होण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ लागतो. चेरापुंजीमधील काही पूल तर १०० फूट इतके लांब आहेत. डबलडेकर पूल बघून झाल्यानंतर ३५०० पायऱ्या चढत आपल्याला परतावे लागते. काही पायऱ्या चढल्यानंतर आराम करत आपण अखेर त्यारना या गावात पुन्हा पोहोचतो. येथे चार वाजताच अंधार होत असल्याने साधारणत: सकाळीच हा ट्रेक केल्यास उत्तम. रात्रीसाठी येथे हॉटेल भाडय़ाने घेऊन आपण राहू शकतो. वातावरणात दमटपणा असल्यामुळे हलक्या स्वरूपाचे कपडे घातल्यास अधिक फायदेशीर. तसेच या पायऱ्या उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती असणे गरजेचे आहे.

मानसिंराम

जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या गावाचे नाव ‘मानसिंराम’ असे आहे. पूर्वी चेरापुंजीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असे. आता चेरापुंजीजवळील मानसिंराम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सरासरी १२ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सतत पडणारा पाऊस हे या गावाचे वैशिष्टय़ आहे. येथील वातावरणात ९९ टक्क्यांहून अधिक आद्र्रता असते.

मावस्माई गुहा

मेघालयातीतल दुसरे आकर्षण म्हणजे येथील नसíगकपणे तयार झालेल्या गुहा. येथील टेकडय़ांच्या पायथ्याशी असलेली गुहेचे नाव मावस्माई गुहा असे आहे. चेरापुंजीपासून सहा किलोमीटर अंतरावर ही गुहा पाहण्यासाठी जावे लागते. मावस्माई गुहा जरी खूप मोठी असली तरी १५० मीटर इतका भाग पर्यटकांसाठी खुला आहे. प्रवेश करतेवेळी मोठा आकार असणारी गुहा आपण जसजसे आतमध्ये जातो तसतसा गुहेचा भाग लहान होत जातो. गुहेमध्ये विजेच्या दिव्यांची व्यवस्था असल्याने विजेरी आणि मशालींची गरज भासत नाही. या गुहांमधील चुनखडकांपासून बनलेले अगणित, वेगवेगळे लहानमोठे असे आकार हे निसर्गाचे वेगळेपण आहे. गुहेच्या छतांमधून पडणाऱ्या पाण्याच्या ठिबक्यांनी वेगवेगळे आकार तयार झाले आहेत. आतमध्ये वटवाघळे आणि इतर कीटकांचे अस्तित्व आहे.

नोहाकलीकाई धबधबा

चेरापुंजीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला नोहाकलीकाई धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. चेरापुंजीच्या पठारावरून ११०० फुटांवरून खाली हा धबधबा कोसळतो. हा धबधबा कोसळताना निर्माण होणारे तुषार खाली टेकडय़ांना स्पर्श करणाऱ्या ढगात मिसळून जातात. ते सुंदर दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून आणि परदेशातून लोक येतात. या पठारावरून दूपर्यंत पसरलेल्या हिरव्या दाट झाडी असलेल्या दऱ्या आणि यामधून वाहणारे पाण्याचे प्रवाह येथून अधिकच मोहक दिसतात.

का खोह रामहाह

शंकूच्या आकाराचा अजस्र असा खडक म्हणजे ‘का खोह रामहाह’ होय. हे नाव स्थानिक लोकांनी दिलेले आहे. या मोठय़ा आकाराच्या खडकाशेजारी तशाच प्रकारचे, परंतु लहान आकाराचे दोन खडक आहेत. पावसाळ्यात या खडकाच्या आसपासचा परिसर धबधबे आणि हिरवीगार दाट झाडी यांमुळे मोहक दिसतो.

इको पार्क चेरापुंजी

मेघालय सरकारने विकसित केलेला हा पार्क आहे. आसपासच्या हिरव्यागार खोल दऱ्या आणि कोसळणारे धबधबे येथून आपण पाहू शकतो. या पार्कमधून वाहणारा एक पाण्याचा प्रवाह आणि त्यावर बांधलेला पूल ओलांडल्यानंतर आपण येथून खालील बांगलादेशमधील सिल्हेट खोऱ्याचे विहंगम दृश्य आपण येथून पाहू शकतो. वेगवेगळी गार्डन्स तयार करण्यात आली आहेत.

सेव्हन सिस्टर फॉल्स

चेरापुंजीतील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील प्रमुख आकर्षण आहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून ‘सेव्हन सिस्टर’ असे नाव या धबधब्याला पडले आहे. हा धबधबा डोंगरकडय़ावरून सात वेगवेगळ्या भागांतून खाली कोसळतो म्हणूनदेखील सेव्हन सिस्टर फॉल्स म्हटले जाते. १००० फुटांवरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावसमायी या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात. सूर्याची किरणे या धबधब्याच्या तुषारावर पडून इंद्रधनुष्य तयार होते ते विलोभनीय दिसते.

पावसाळ्याची खरीखुरी अनुभूती घ्यायची असेल, तर ईशान्य भारतातील मेघालय हा उत्तम पर्याय आहे. मेघालय रेल्वेने अद्यापपर्यंत जोडले गेले नसले, तरी आसाममधील गुवाहाटी शहरातून मेघालयला जाण्यासाठी खासगी बस आहे.  खासगी वाहने भाडय़ाने घेऊन जाता येते.

मग, येताय ना.. मेघालय सफरीला?
सौजन्य – लोकप्रभा