सर्वसाधारणपणे महिलांसाठी सुयोग्य मानल्या गेलेल्या अध्यापन, रुग्ण शुश्रूषा इत्यादी पारंपरिक क्षेत्रामध्ये जर पुरुष काम करीत असतील, तर ते घरकामातही आपल्या पत्नीला मदत करतात, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आलाय. 
सद्यस्थितीत दोन तृतीयांश घरकामाची जबाबदारी ही घरातील गृहिणीच उचलत असते. मात्र, जर संबंधित घरातील पुरुष हा अध्यापनाचे किंवा शिकवणी घेण्याचे, रुग्णालयात परिचारकाचे काम करीत असेल, तर तो घरात आपल्या पत्नीला जास्त मदत करतो. अमेरिकेतील नोटर डॅम विद्यापीठामध्ये यासंदर्भात अभ्यास करण्यात आला.
सर्वसाधारणपणे पुरुषांनी करावयाची कामे अशा गटात असलेल्या कामांमध्ये जर एखाद्या घरातील पुरुष काम करीत असेल, तो घरकामासाठी खूप कमी वेळ देतो. त्यामुळे संबंधित घरातील गृहिणीला घरकामाची जास्तीत जास्त जबाबदारी उचलावी लागते, असेही अभ्यासात दिसून आल्याचे विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ एलिझाबेथ ऑरा मॅकक्लिंटॉक यांनी सांगितले. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन सोशिओलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक बैठकीमध्ये सादर करण्यात आले.