हवा प्रदूषणाचा केवळ शरीरावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत असतो, असे अभ्यासात दिसून आले आहे. जी मुले जास्त हवा प्रदूषण असलेल्या भागात राहतात, त्यांना स्किझोफ्रेनिया म्हणजे मनोदुभंगाचा मानसिक आजार होण्याची जोखीम अधिक असते असे अभ्यासात निष्पन्न झाले. जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधात म्हटले आहे, की आयसॅक प्रकल्पात जनुकीय माहितीबरोबरच साधारण मानसिक आजारांची माहिती तपासण्यात आली. त्यात स्वमग्नता, बायपोलर डिसऑर्डर, नैराश्य यांचा समावेश होता.

डेन्मार्कचे अ‍ॅरहस विद्यापीठ व इतर संस्थातील संशोधकांनी यात भाग घेतला. या अभ्यासानुसार जी मुले अतिशय जास्त हवा प्रदूषणाच्या भागात राहतात, त्यांना स्किझोफ्रेनिया म्हणजे मनोदुभंगाचा आजार जडण्याची शक्यता अधिक असते.

दर घनमीटरला १० मायक्रोग्रॅम इतके प्रदूषण वाढले तर मनोदुभंगाची शक्यता पाच पटींनी वाढत असते. जी मुले रोज दर घनमीटरला २५ मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त प्रदूषणाला तोंड देतात, त्यांच्यात या रोगाची शक्यता इतरांच्या तुलनेत साठ टक्के वाढते असे आरहस विद्यापीठातील संशोधक हेनरिट थिस्टेड हॉर्सडल यांनी म्हटले आहे. नेहमीच्या परिस्थितीत लोकांना मनोदुभंगाचा रोग होण्याची शक्यता २ टक्के असते. पण जे लोक हवा प्रदूषणास सामोरे जातात, त्यांच्यात ही शक्यता तीन टक्के असते. जनुकीय कारणांमुळेही या रोगाची जोखीम वाढते. हवा प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून मनोदुभंगाची शक्यता वाढत जाते. असे असले तरी हवा प्रदूषणामुळे मनोदुंभगाची शक्यता वाढते या निष्कर्षांवर अधिक संशोधनाची गरज आहे.