भारतातील मानसिक विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून २०२५ पर्यंत देशातील मनोरुग्णांच्या संख्या २३ टक्क्यांनी वाढ होणार आहे, असे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
हा अभ्यास नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार ३८.१ दशलक्ष नागरिक २०२५ पर्यंत मानसिक आजाराने त्रस्त होणार असल्याचे म्हटले आहे. २०१३ च्या अभ्यासात नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीचा विचार करता हा आजार २३ टक्क्यांनी वाढणार आहे.
या संशोधनातील मुख्य अभ्यासक आणि पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विक्रम पटेल म्हणाले की, मानसिक आरोग्याबाबत भारताने विकसित योजना आखल्या आहेत. मात्र, या योजना संपूर्ण देशभरात राबविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडण्यात या बाबी कारणीभूत ठरणार आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठी आहे.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. शिंदे म्हणाले की, भारतातील लोकसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याचा आजार वाढतच जाणार आहे. मानसिक आरोग्याबाबत वैद्यकीय पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. १९९०, २०१३ आणि २०२५ या वर्षांचा तौलनिक अभ्यास करून वरील अहवाल तयार करण्यात आला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)