News Flash

Merry Christmas 2019: गोष्ट सांताक्लॉजची…भेटवस्तू देणारा ‘सांता’ नेमका कोण?

पूर्वी विजेची तशी सोयही नव्हती. म्हणून  लोक शेकोटी पेटवून दांडय़ाला जुने कपडे गुंडाळून...

नाताळच्या सणाचे बाळगोपाळांचे आकर्षण म्हणजे सांताक्लॉज. रात्री गुपचूप येऊन त्यांना भेटवस्तू देणारा सांताक्लॉज नेमका कोण, ही संकल्पना कुठून आणि कशी आली याबद्दल-

आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप व अमेरिका या पाचही खंडांमध्ये युरोप हा सर्वात जास्त थंड खंड. तेथे हिवाळ्यात दिवस संध्याकाळी पाचच्या आतच मावळतो. थंडीच्या दिवसात सर्वत्र बर्फच बर्फ साचते, पडते, मुरते. त्यामुळे लोकांना संध्याकाळी घराबाहेर पडणे फार मुश्कील ठरते. अशा बिकट जागी दिवसभराचे कामकाज आटोपणे, मित्रमंडळींसह गप्पागोष्टी मारणे, विचारांची देवाणघेवाण करणे, वस्तूंची ने-आण करणे इ. कामे पुरी करणे, कमी वेळात कठीण होऊन जायचे. पूर्वी विजेची तशी सोयही नव्हती. म्हणून  लोक शेकोटी पेटवून दांडय़ाला जुने कपडे गुंडाळून, त्याचे काकडे बनवून दिवा-बत्तीची आरास लावून कामे करत. आपल्या राहुटीबाहेर शेकत बसत, ऊर्जा घेत प्रकाशात हसत, खेळत. गारठय़ात ऊब आणण्यासाठी बदाम, पिस्ता, आक्रोड, खजूर, तिळवडय़ा इ. गरम पदार्थ चघळीत राहत. कसे तरी करून स्वत:ला सक्रिय ठेवत. मुलाबाळांना, सग्या-सोयऱ्यांना खाऊ वाटत. त्याच्यातूनच सर्वसाधारणपणे इ.स. चौथ्या शतकात बाळ येशूच्या जयंतीच्या रूपाने सांताक्लॉजची कल्पना रुजली, चालू झाली. तीच रूढी, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.

अशा प्रकारे त्या काळात बऱ्याच वर्षांपर्यंत युरोपात ख्रिसमस साजरा होई, पण अमेरिकेत त्याचे नावगाव नव्हते. पुढे युरोपियनांनी अमेरिकेत आपले हातपाय पसरविले, कायम स्वरूपी वस्ती केली, तेव्हा तेथेही नाताळचा सण धुमधडाक्यात होऊ लागला. अमेरिकेत प्रथम इ.स.१८७० साली ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. खाऊ-खेळणीची दुकाने थाटली. रंगीबेरंगी दिवे, स्टार झळकले. पताकांच्या माळा लागल्या. आकाशी फटाके गरजले. मुलाबाळांत सांताक्लॉजचे आकर्षण वाढले. मटणाचे शॉप टांगले. विशेष करून टर्की, कोंबडय़ांना मागणी आली. केकचा परिमळ पसरला. गोडधोड सुरू झाले.

‘ख्रिसमस ट्री’ला ख्रिसमस काळात नटवून थटवून त्याभोवती रोषणाई करून नाचायचे. कारण ते एकमेव झाड बर्फाच्छादित कडाक्यात हिरवे गार राहते. आपल्याकडची झाडे ग्रीष्मात, अतिउष्णतेत, जीव तगून ठेवण्यासाठी आपला पालापाचोळा, अनावश्यक काडय़ा गळवून मोकळी होतात, तशी युरोपातील इतर झाडे थंडीत हतबलता स्वीकारून आपली पानगळ सोडून देतात. मात्र फक्त ‘ख्रिसमस ट्री’ आपली गलेगठ्ठ हिरवळ सावरून राहते. सुशोभीकरणासाठी उपयोगी ठरते. म्हणूनच लाडाने त्याला म्हटले जाते, ‘ख्रिसमस ट्री’.  आता डिसेंबर आला. सांताक्लॉज रंगात येईल. मुलाबाळांना नाचवू लागेल, वडीलधाऱ्यांना हसवू लागेल. ख्रिसमस ट्री डोलू लागेल, जिंगल बेल वाजू लागेल, सगळीकडे  नाताळचे वातावरण रंगेल.

नाताळमध्ये पिकलेल्या ताडगोळ्याप्रमाणे, पांढरी शुभ्र केसाळ दाढी असलेला, लालभडक झग्याला कापसावाणी धवळी किनार लावलेला, लांब शेंडीची ऐटीत टोपी घातलेला सांताक्लॉज येतो, उंच टाचांचे काळेकुट्ट बूट घालून हाती डौलदार काठी घेऊन, खाडखाड आवाज करत, डोळे मिचकावत, ओळख न दाखवत, येथे तेथे धावणारा हा ढेरपोटय़ा बाबा लहान-थोरांचे तो खास आकर्षण. नाताळ वातावरणनिर्मितीचा तो विलोभनीय क्षण. घराघरातून त्याला टिपण्यासाठी रस्त्यावर सर्व जण टपकत. लहान बालके प्रथमदर्शनी त्याला बिचकत. पण त्याच्याकडून चॉकलेट, खाऊ, खेळणे मिळताच हसतखेळत त्याचं पोट थोपटत, खिसे चाचपडत, पाठीवरची पोतडी खेचत. घाबरलेली बच्चेकंपनी क्षणार्धात त्याच्या भोवती नाचायला लागे, त्यांच्याशी मैत्री जुळवून बघणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आणीत. ही जादू आहे सांताक्लॉजच्या कॅरल सिंगिंगमध्ये, येशू बाळाच्या येण्यामागे. हा आनंदाचा, हर्षांचा, मोदाचा काळ. भाविक त्यासाठी मोलाचा वेळ देतात.

सांताक्लॉज हे नाव सहा डिसेंबरला येणाऱ्या संत निकोलस याच्या सणाची आठवण करून देते. त्या दिवसापासून सांताक्लॉज गावभर फिरून बाळयेशूची पूर्वतयारी करू लागतो. सिंटर क्लास या डच नावावरून ते तयार झाले. संत निकोलसशी सांता खूप जुळता मिळता आहे. संत निकोलसचा कनवाळू स्वभाव सांताक्लॉजसारखाच दयाळू, प्रेमाळू, मनमिळाऊ होता. गोरगरीब बालकांचे ते कैवारी. अबलांना विशेष करून निराश्रित स्त्रियांना ते प्रेमाने समजून घ्यायचे. त्यांना काही तरी नेऊन द्यायचे. जनसामान्यांतली त्यांची ती कळवळ्याची प्रतिमा टिकविण्यासाठी थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध चित्रकाराने पहिला सांताक्लॉज बनविताना फार मोठी मेहनत घेतली. प्रख्यात कवी क्लेमेंट मूर यांच्या कवितेतील सांताचे हुबेहूब चित्र त्यांनी प्रथम १८७० च्या काळात साकारले. त्याची लोकप्रियता त्यामधून सर्वत्र वाढत गेली. अर्थात पुढे व्यावसायिकांनी, दुकानदारांनी आपापल्या सोयीनुसार सांताक्लॉजचे पुतळे उभारले, चित्रे काढली, त्याचा बाजार मांडला, ती गोष्ट वेगळी. पण बाळगोपाळांच्या मनातला सांताक्लॉज एकदम वेगळा आहे. तो घरातल्या प्रेमळ आजोबांसारखा, भेटवस्तू, खाऊ देणारा, प्रेमाने गोंजारणारा, लाड करणारा आहे. बाळगोपाळांचा आवडता सांता सगळ्यांना लाभो.

(हा लेख गेल्या वर्षी लोकप्रभामध्ये प्रकाशित झाला होता, फादर अ‍ॅलेक्स तुस्कानो – response.lokprabha@expressindia.com )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 9:06 am

Web Title: merry christmas 2019 know details and full story about santa claus sas 89
Next Stories
1 flashback 2019 : वर्षभरात सर्वाधिक व्हायरल झालेले व्हिडीओ
2 Video: दोन जहाजं एकमेकांना धडकली; थरारक अपघात कॅमेरात कैद
3 मला चांगले बाबा हवेत; चिमुरड्याची सांताक्लॉजकडे लोभसवणी मागणी
Just Now!
X