News Flash

Merry Christmas 2019: म्हातारबाबा..नाताळबाबा..बर्फाच्छादित आजोबा अन् सर्वसमावेशक सांताबाबा!

इसवी सनाच्या चौथ्या शतकात जन्मलेल्या निकोलसच्या औदार्याच्या अनेक कथा आहेत...

(संग्रहित छायाचित्र, सौजन्य - निर्मल हरिंद्रन )

लाल अंगरखा, पांढरी दाढी, भेटवस्तूंचे गाठोडे, रेनडिअरची गाडी अशी प्रतिमा म्हणजे सांताक्लॉज. बेताना, ग्रँडफादर फ्रॉस्ट, ज्युलेनिसेन अशी विविध नावे असणारा सांताक्लॉज सर्व वयोगटांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

‘सांताक्लॉज’ हे ख्रिस्ती धर्मीयांमध्ये विशेषत: मुलांमध्ये प्रसिद्ध असलेले ख्रिस्ती संत. त्यांचे मूळ नाव निकोलस. हे निकोलस दानशूर होते. आपल्या गावातील एका गरीब बापाच्या तीन मुलींची लग्ने पैशांअभावी अडली होती. अशा वेळी निकोलसने त्या घरातील खिडकीमधून पुरेसे पैसे घरात टाकून ठेवले. निकोलसच्या या उदाहरणातून स्फूर्ती घेऊन नाताळच्या आदल्या रात्री आईवडील आपल्या मुलांच्या मोज्यांमध्ये भेटवस्तू ठेवतात व त्या वस्तू सांताक्लॉजने रात्री तुम्ही झोपलेले असताना दिल्या आहेत, असे सांगतात.

रेनडियरची गाडी, सफेद दाढी, लाल अंगरखा, लाल टोपी झुपकेदार, खांद्यावर खाऊचे गाठोडे अशी सांताक्लॉजची प्रतिमा रंगविली जाते. गावागावांतून फिरणाऱ्या सांताक्लॉजच्या या रूपाला ‘जिंगल बेल’च्या गाण्याची साथही लाभलेली असते.

इसवी सनाच्या चौथ्या शतकात जन्मलेल्या निकोलसच्या औदार्याच्या अनेक कथा आहेत. तो घराच्या धुरांडय़ातून प्रवेश करतो व भेटवस्तू, मदत करतो अशा श्रद्धा व समजुती आजही टिकून आहेत. तीच परंपरा नाताळच्या पूर्वसंध्येच्या रात्री घराघरांतील मुलांच्या पायमोज्यांमध्ये किंवा बिछान्याला खाऊ वगैरे मुलांच्या नकळत ठेवून देऊन पाळली जाते. त्यामुळे मुलांचा समज नाताळबाबा म्हणजे सांताक्लॉजनेच या वस्तू ठेवल्या आहेत असा होतो.

युरोप खंडामध्ये सांताक्लॉजचे आकर्षण अन्य ठिकाणांपेक्षा जास्त आहे. विविध खंडं,  देशांमध्ये सांताक्लॉजला वेगवेगळय़ा नावांनी, गुणवैशिष्टय़ांनी ओळखले जाते. रशियामध्ये त्याला ‘बर्फाच्छादित आजोबा’ म्हणजेच ‘ग्रँडफादर फ्रॉस्ट’ असे नामाभिधान मिळाले आहे. येशू ख्रिस्ताला जन्मानंतर भेटण्यासाठी पूर्वेकडून तीन राजे आले व त्यांनी त्याला भेटवस्तू दिल्या, ही पाश्र्वभूमी या सांताक्लॉजच्या आगमनाला आहे. बेल्जियममध्ये सांताक्लॉज ख्रिसमस सणाच्या आदल्या दिवशी लहान मुले सांताच्या रेनडियरला खाण्यासाठी  ओटची पाने स्वयंपाकघरात आणून ठेवतात. मग रात्री सांता त्या मुलांना भेटवस्तू, खाऊ देतो. झेकोस्लोव्हाकियामध्येही मुले त्या तीन राजांचा पोशाख करतात व नाताळगाणी गात गावागावांत फिरतात. नेदरलँडमध्ये सांताक्लॉज पांढऱ्या घोडय़ावर बसून येतो. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडनमध्ये सांताक्लॉजला ‘ज्युलेनिसेन’ म्हणजे पोटमाळय़ावरील म्हातारबाबा असे नाव आहे.

फ्रान्समध्ये ‘सांताक्लॉज’च्या सादरीकरणाचा प्रकार थोडा वेगळा आढळतो. तेथे नाताळच्या आदल्या रात्री बाळ येशूच घरात येऊन मुलांसाठी त्यांच्या बुटात खाऊ वगैरे ठेवतो असे मानतात. नाताळच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला, बाळ येशूला भेटायला आलेल्या तीन राजांपैकी मेल्किओर राजाची प्रतिकृती बनवून ती गावात मिरवितात. त्या राजाच्या पाठीवर मोठी पिशवी बांधतात. त्या पिशवीत लोक खाऊ व भेटवस्तू टाकतात. मग त्या साऱ्या वस्तू गावातील गरिबांना वाटून टाकतात. भारतातही दक्षिणेकडे काही ठिकाणी अशाच प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. इटलीमध्ये सांताक्लॉज ‘बेताना’ म्हणजे ‘म्हातारा जादूगार’ म्हणतात. या नाताळबाबाचे कपडे मात्र फाटके व मळलेले असतात. तो झाडूवर स्वार होऊन येतो. या सांताक्लॉजचं वैशिष्टय़ असं की, तो चांगल्या मुलांना चांगलं गोडधोड देतो; पण वाईट, व्रात्य मुलांना मात्र चुलीतली राख भेट म्हणून देतो.

जगातील विविध देशांमधील संस्कृतीप्रमाणे सांताक्लॉज आजवर सादर करण्यात आले आहेत. स्वित्र्झलडमध्येही नाताळबाबा फिरतो; पण त्याचबरोबर सैतानबाबादेखील फिरविण्यात येतो. अर्थातच नाताळबाबा चांगल्या मुलांना भेटतो व वाईट मुलामाणसांना सैतानबाबा शिक्षा करतो, त्यांना छडीचे फटके देतो.

उत्तर अमेरिकेतील नाताळचा उत्सव तसेच सांताक्लॉजचा आविष्कार  भारतातील दहीहंडी उत्सवासारखाच साजरा केला जातो. हे साधम्र्य फार रंजक आहे. नाताळच्या दिवशी, ज्या गाईच्या गोठय़ात येशूचा जन्म झाला होता, तशा गोठय़ातील छताला मोठे मडके लटकवतात. रात्री त्या मडक्यात फळे, गोडधोड, पैसे, भेटवस्तू ठेवतात. मग दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ज्याप्रमाणे दहीहंडीतील दही खाण्यासाठी थर रचून वर चढतात, तसे थर रचून ती मुले त्या वस्तू हंडी फोडून घेतात. कृष्णजन्म आणि येशूजन्माच्या काळातील हे साधम्र्य फार महत्त्वाचे आणि जगभरातील सर्वच धर्मीय लोकांना समानतेचा संदेश देणारे आहे, त्याचप्रमाणे मानवतेचीही महती सांगणारे आहे. यानिमित्ताने वसईतील एका धर्मगुरूंनी हा नाताळबाबा पूर्ण भारतीय वेशात सादर व्हावा, अशीही अपेक्षा काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. भारतीय नाताळबाबाचा वेश डोक्याला फेटा, अंगात भरजरी झगा, पायात चुणीदार, लांब दाढी किंवा जुन्या जमान्यातील संस्थानिक महाराजांच्या वेशात असावा, अशी त्यांची इच्छा होती.

इसवी सनाच्या चौथ्या शतकात आशिया मायनर भागात संत निकोलस होऊन गेला. तो बिशप होता. पुढे त्याला संतपद बहाल करण्यात आले. ‘संत निकोलस’चे संक्षिप्त रूप ‘सांताक्लॉज’. डच लोकांनी त्याला ‘सांताक्लॉज’ हे नाव दिले आहे, जे आज जगभरात लोकप्रिय  झाले आहे. निकोलसच्या बिशप पदाची कथाही अद्वितीय म्हणावी अशी आहे. आशिया मायनरमधील मायरा धर्म प्रांताचे बिशप अचानक वारले. त्या वेळी तेथील धर्मगुरूंनी ठरवले की, उद्या सकाळी जी व्यक्ती सर्वप्रथम चर्चमध्ये प्रवेश करेल तिला बिशप पदाचे  संस्कार द्यायचे. त्याच वेळी निकोलस नेमके पहाटे त्या चर्चमध्ये  सर्वाआधी प्रवेश करते झाले. ते खरं तर त्यांची तीर्थयात्रा सफल झाली होती म्हणून देवाचे आभार मानायला चर्चमध्ये आले होते; परंतु त्यांच्या गळय़ात आणखी मोठी माळ जबाबदारीची पडली होती. बिशप निकोलसच्याच काळात भरलेल्या ‘द ग्रेट काऊन्सिल ऑफ नाईसिया’मध्ये चर्चला ‘आय बिलिव्ह’ हे बोधवाक्य मिळालं.

सांताक्लॉज म्हणजे संत निकोलसच्या दातृत्वाची परंपरा ख्रिस्ती धर्मीयांनी सुमारे चौदा दशके पुढे चालविली आहे. नाताळ सणाच्या काळात भारतभरच्या ख्रिस्ती समाजामध्ये तेथील प्रादेशिक संस्कृतीनुसार, परंतु मूळ संकल्पनेला बाधा न आणता सांताक्लॉज व त्याच्याभोवती गुंफलेल्या प्रथा आणि कथा लोक आपल्या उत्सव साजरीकरणात पुन्हा जागवतात. वसईसारख्या ठिकाणी जेथे चार शतकांपूर्वी पोर्तुगीजांचा अंमल होता, तेथे आजही ख्रिस्ती धर्मीयांच्या नाताळ सणात तेथील स्थानिक हिंदू समाज, विशेषत: सोमवंशी क्षत्रिय, शेषवंशी क्षत्रिय, सामवेदी ब्राह्मण, वाडवळ समाज सहभागी होतात. तसेच हिंदूंच्या दिवाळी सणातील करंजी, चकलीचा आस्वाद ख्रिस्ती धर्मीय घेतात. आता तर दिवाळीसह नाताळातही केकबरोबर करंजी, चकल्या, लाडू बनवले जातात.

दरवर्षी सहा डिसेंबर रोजी संत निकोलसचा सण जगभर साजरा करण्यात येतो.

बायबलचे अभ्यासक फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोजा यांच्याशी या संदर्भात बोलताना काही नवीन गोष्टी कळल्या. त्यांच्या मते, ‘नाताळ सणाचे स्वरूप आता बदललंय. भाविकांचं लक्ष (नाताळच्या काळात) प्रभू येशूूकडून सांताक्लाजकडे वळतंय. सांताक्लॉजचं आकर्षण आज केवळ ख्रिस्ती अबालवृद्धांनाच नसून ख्रिस्तेतर हिंदू व अन्य धर्मीय लोकांनाही आहे. सांताक्लॉजचं खाऊने भरलेलं गाठोडं, त्याच्या स्टॉकिंग्समध्ये खाऊ असतो, यांचे लोकांना आकर्षण असते. आता सांताक्लॉज चालत फार कमी येतो. तो मोटारसायकल, मोटारगाडीतून येतो. खरं तर नाताळ सणाचा म्हणजे येशुजन्माचा आनंद पसरला पाहिजे. तसं होत नाही. परंतु तरीही हेही खरं आहे की, त्यातून सकारात्मक संदेश असा घ्यायचा आहे की, परमेश्वर मानव होऊन गरजवंत, वंचितांना भेटवस्तूच्या स्वरूपात दान देत आहे. ही प्रेरणा तो माणसांना देतो. सांताक्लॉज सर्वसमावेशक आहे. आज ख्रिस्ती सर्वोच्च धर्माधिकारी पोप फ्रान्सिस  आदेशानुसार सर्वधर्मीयांचे धोरण मानवाने स्वीकारले पाहिजे. या पाश्र्वभूमीवर ‘धर्माच्या पलीकडे जाणारी आध्यात्मिकता’ आज जगाला आवश्यक आहे, ती सांताक्लॉजच्या सादरीकरणातून मिळते. वसईत तसेच मुंबई व भारताच्या अन्य ख्रिस्ती समाजाच्या भागात ही सर्वसमावेशकता आढळून येते. ही आश्वासक गोष्ट आहे.’

संदीप राऊत – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 9:34 am

Web Title: merry christmas 2019 know everything about santa claus
Next Stories
1 Merry Christmas 2019: गोष्ट सांताक्लॉजची…भेटवस्तू देणारा ‘सांता’ नेमका कोण?
2 flashback 2019 : वर्षभरात सर्वाधिक व्हायरल झालेले व्हिडीओ
3 Video: दोन जहाजं एकमेकांना धडकली; थरारक अपघात कॅमेरात कैद
Just Now!
X