कार उत्पादन क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी MG Motors ची भारतातील पहिली कार MG Hector ला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाला. या कारसाठी 28 हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केल्यानंतर कंपनीने कारसाठी नोंदणी बंद केली होती. या कारला उत्पादन क्षमतेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाल्याने हा निर्णय कंपनीने घेतला होता. पण आता सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनीने ऑक्टोबर महिन्यापासून या कारसाठी बुकिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय MG Motors आता Hector चं उत्पादन वाढवण्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचं वृत्त आहे. परिणामी, जर गेल्या महिन्यात तुम्हाला ही कार खरेदी करता आली नसेल तर पुढच्या महिन्यात तुम्ही या कारसाठी बुकिंग करु शकतात.

या कारच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 12.18 लाख रुपये (एक्स शोरुम) तर टॉप व्हेरिअंटची किंमत 16.88 लाख रुपये आहे. आकर्षक किंमतीमुळे भारतात या कारकडून टाटा हॅरियर, ह्युंडई क्रेटा, निसान किक्स, जीप कंपास यांसारख्या गांड्यांसाठी मोठं आव्हान निर्माण झालंय. या सेगमेंटमध्ये आतापर्यंत टाटाची हॅरियर अव्वल होती. पण हेक्टरच्या आगमनानंतर हे चित्र बदलू शकतं. MG Hectorसाठी बुकिंग करुन अद्यापही डिलिव्हरीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने यापूर्वीच ‘रिवॉर्ड प्रोग्राम’ची सुरूवात केली आहे. याअंतर्गत जर कारच्या डिलिव्हरीसाठी एक आठवडा उशीर झाल्यास ग्राहकांना 1000 पॉइंट्स मिळतील. जर दोन आठवडे उशीर झाल्यास 2000 पॉइंट्स याप्रमाणे पॉइंट मिळतील. या पॉइंट्सचा वापर कंपनीच्या एक्ससरीज खरेदी करण्यासाठी किंवा प्रीपेड मेन्टेनन्ससाठी करता येणार आहे. ही ऑफर केवळ यावर्षी होणाऱ्या कारच्या डिलिव्हरीसाठीच असणार आहे असं कंपनीने स्पष्ट केलंय. यापूर्वी देखील एमजी कंपनीने IIMPACT NGO सह भागीदारी केली होती. कारच्या डिलिव्हरीला दोन आठवडे उशीर झाल्यास ग्राहकाच्या एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा हा प्रोग्राम होता.

कशी आहे Hector SUV वाचा सर्व डिटेल्स –

ही कार दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. सध्याचा काळ वायरलेस कनेक्टीविटीचा आहे. मोबाइल, स्मार्टवॉचद्वारे इंटरनेटचा वापर आपण करतच असतो, तर अ‍ॅमेझॉन एको, गुगल होम यांसारख्या उपकरणांना केवळ बोलून आदेश (व्हॉइस कमांड) देऊन अनेक कामे करू शकतो. याच तंत्रज्ञानाचा वापर भारतात पदार्पण करू पाहणाऱ्या ‘एमजी मोटर’च्या हेक्टर या एसयूव्हीत करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली Hector SUV ही कंपनीची भारतातील पहिलीच कार आहे. याशिवाय ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीत देण्यात आलेल्या काही सुविधा या श्रेणीत प्रथमच देण्यात आल्या असून भारताच्या एसयूव्ही बाजारात हेक्टर एक दमदार दावेदार ठरणार आहे. केवळ एसयूव्ही बाजारात स्वत:चे स्थान तयार करणेच नाही तर एमजीसाठी भारतातील वाट सुकर करण्याची मोठी जबाबदारी हेक्टरवर आहे. हेक्टरच्या यशाचा परिणाम एमजी मोटर्सच्या भारतात येणाऱ्या गाडय़ांवर होणार आहे.

इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे वैशिष्ट आहे. हेक्टरमध्ये आयस्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही सुरक्षित, कनेक्टेड प्रवासाची खात्री करण्यासाठी तयार आहे. भारतीय बाजारात पदार्पणाबाबत एमजी मोटार्स अत्यंत गंभीर असून भारतीय रस्ते, हवामान आणि भारतीय चालकांना अनुरूप हेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहे.

हेक्टर आकाराने मोठी असून इतर एसयूव्हीच्या तुलनेत स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवते. हेक्टर 4655 एमएम लांब असून, रुंदी 1835 एमएम आणि उंची 1760 एमएम आहे. हेक्टर ही उंची, रुंदीने बाजारातील या श्रेणीतील इतर एसयूव्हीच्या तुलनेने मोठी आहे. त्याचप्रमाणे हेक्टरचा व्हिलबेस देखील जास्त आहे. आकाराने मोठय़ा असलेल्या या गाडीची चाक 17 इंचांची आहेत. गाडीचे डिजाइन पाहता हेड लाइटची रचना टाटाच्या हॅरियरप्रमाणे आहे. गाडीत डायन्यामिक टर्न इंडिकेटर्स आहेत. पांढऱ्या एलईडी क्वाड प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फॉग लाइट म्हणून एलईडी देण्यात आले आहेत.

गाडीचे केबिन मोठे आणि आरामदायी आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी पाय ठेवायला पुरेशी जागा देण्यात आली आहे. पुढची सीट गुडघ्याला लागत नसल्याने तीन जण व्यवस्थितरीत्या मागच्या सीटवर बसू शकतात. गाडीचे फ्लोअर सपाट असल्याने मध्ये बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही.

गाडीच्या पुढच्या बाजूला डॅशबोर्ड आणि डोअर पॅडवर चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवर , इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये लेदरचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या केबिनला प्रीमियम दर्जाच्या गाडीसारखे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी देण्यात आल्या आहेत. फ्रंट आणि रिअर पार्किंग कॅमेरे, ३६० अंशात चित्रीकरणाची क्षमता असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. ७ इंचाचा ड्राइवर डिस्प्ले देण्यात आला असून एम्बिएन्ट लाइट दिली आहे. मोठा सनरूफ या गाडीच्या वैशिष्टय़ांमध्ये भर घालतो. हेक्टर पेट्रोल आवृत्तीला 1.5 लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची देण्यात आले आहे. ज्यात 250 एनएमच्या पीक टॉर्कवर 143 पीएस शक्ती उत्पन्न करण्याची क्षमता आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे 2.0 लिटर डिझेल इंजिन 350 एनएमच्या पीक टॉर्कवर 170 पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 48 व्होल्ट लिथियम-या गाडीत ‘48 व्ही’ हायब्रीड प्रणाली वापरली आहे . उत्सर्जन कमी करण्यासोबतच इंधन-कार्यक्षमता वाढण्यासाठी बनवलेले हे युनिट 20 एनएमपर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करण्यास ऊर्जेचा संग्रह करते, असा दावा कंपीने केला आहे. 6-स्पीड डीसीटी- डीसीटी हे अतिशय प्रतिष्ठित व परिष्कृत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे. इतर प्रकारांप्रमाणेच, डीसीटीलाही जागतिक स्तरावर खडतर पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये 2.6 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त तपासण्यात आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सुरक्षा –

गाडीत सुरक्षेसाठी दोन ऐअरबॅग, एबीएस, इबीडी, लहान बाळाची सीट ठेवण्यासाठी सुविधा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रक्शन कंट्रोल या सुविधा आहेत. गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाडीच्या महागडय़ा पर्यायांमध्ये कर्टन ऐअरबॅगसह सहा ऐअरबॅग देण्यात आल्या आहेत. टायरमधील हवेचा दाब पाहण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. थंडी आणि दमट हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी हिटेड विंग प्रणालीचे आरसे देण्यात आले आहेत.

आय स्मार्ट यंत्रणा –

हेक्टरमध्ये 10.4 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. या गाडीत बोलून आदेश समजून घेण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. ‘हॅलो एमजी’ म्हटल्यावर ही यंत्रणा कार्यरत होते. याद्वारे गाडीची वातानुकूलन यंत्रणा, संगीत प्रणाली नियंत्रित करता येऊ शकते. गाडीचे सनरूफदेखील बोलून आदेश देऊन नियंत्रित करता येते. गाडीला कनेक्टेड कार म्हटले असून गाडीची वातानुकूलन यंत्रणा आणि गाडीचे बूट तुम्ही घरी बसल्या नियंत्रित करू शकता. या अत्याधुनिक सुविधांमुळे ग्राहकांना वाहन चालवण्याचा एक वेगळा अनुभव देण्याच्या एमजीचा प्रयत्न आहे.

एमजी मोटर इंडियाविषयी –

1924 मध्ये युके येथे संस्थापित ‘मॉरिस गॅरेजेस व्हेइकल्स’ त्यांच्या स्पोर्ट्स कार, रोडस्टर्स आणि कॅब्रिओलेट श्रृंखलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. आपल्या शैली, अभिजातता आणि भन्नाट कार्यप्रदर्शनासाठी एमजी व्हेईकल्सचे बरेच लोकप्रिय व्यक्ती चाहते आहेत, ज्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान आणि इतकेच नव्हे तर ब्रिटिश राजघराणेसुद्धा सामिल आहेत. 1930 मध्ये अबिंग्डन युके येथे स्थापित एमजी कार क्लब हा मागील 95 वर्षांमध्ये एका आधुनिक, आणि अभिनव ब्रांडमध्ये विकसित झाला आहे. भारतीय बाजारात लवकरच आपली वाहने सादर करण्याच्या योजनेसह एमजी मोटर इंडियाने हलोल गुजरात येथील आपल्या उत्पादन सयंत्रामध्ये उत्पादन कार्य सुरू केले आहे.