अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एमजी मोटर(मॉरिस गॅरेज)च्या Hector SUV साठी आजपासून(दि.4) अधिकृतपणे बुकिंग सुरु झाली आहे. 50 हजार रुपयांमध्ये गाडीसाठी बुकिंग करता येईल. देशभरातील 50 शहरांमधील 120 MG आउटलेट्समध्ये या गाडीसाठी बुकिंग करता येणार आहे, याशिवाय MG Motor India च्या अधिकृत संकेतस्थळावरुनही बुकिंग करता येणार आहे. काही डिलर्सकडे आधीपासूनच या गाडीसाठी बुकिंग स्वीकारली जात होती. कंपनीची ही भारतातील पहिलीच कार आहे. याशिवाय ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. किंमतीबाबत कंपनीने अद्याप घोषणा केलेली नाही, मात्र या महिनाअखेरीस किंमत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे खासियत –
कंपनीने ‘आयस्मार्ट नेक्स्ट जेन’सह भारतात एक अभूतपूर्व असे तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान अनेक कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, अनलिमिट, एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्टय़े प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील. ही भारतातील पहिली 48V हायब्रेड SUV आहे. यामध्ये कंपनीकडून 19 एक्सक्लुसिव्ह फीचर्स दिले आहेत. MG Hector मध्ये 10.4 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन तुम्ही रिमोटने देखील कंट्रोल करु शकतात. कारच्या आतमध्ये इंटरनेटची सेवा देण्यात आली आहे. सनरूफ, एलईडी हेडलाइट्स, क्रुज कंट्रोल, अॅडजस्टेबल सीट्स यासह 360 डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

एमजी हेक्टरमध्ये व्हॉइस असिस्टची सुविधा असणार आहे. क्लाउड आणि हेड युनिटवर चालणारी ही सुविधा न्यूआन्सने भारतासाठी विकसित केली असून भारतीयांचे उच्चार ओळखण्यासाठी ती तयार केली आहे. हे व्हॉइस असिस्ट ‘हॅलो एमजी’ म्हटल्याने सक्रिय होते. ही यंत्रणा खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, वातानुकूलन यंत्रणा, नेव्हिगेशन इत्यादीचे नियंत्रण करते आहे. आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे वापरता येणार आहे. यातील अनेक सुविधांचा भारतात प्रथमच वापर केला जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रत्येक वेळी अ‍ॅप सुरू केल्यानंतर मोटार स्कॅन केली जाते आणि मोटारीचे स्थान, टायरमधील हवेचा दाब, दरवाजे बंद आहेत की नाही आहे, अशा प्रकारची माहिती दिली जाते. दरवाजे लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्यासाठी हे रिमोट अ‍ॅप वापरू शकतात.

MG Hector भारतात पाच रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्लेज रेड, बर्गंडी रेड, ब्लॅक, ऑरोरा सिल्वर आणि कँडी व्हाइट या रंगांचा पर्याय आहे. कारमध्ये असलेल्या 10.4 इंचाच्या HD स्क्रीनच्या सिस्टिममध्ये काही अॅप्स आधीच लोडेड असतील. याशिवाय कंपनीकडून सुरूवातीच्या काही वर्षांसाठी इंटरनेट मोफत दिलं  जाण्याची शक्यता आहे. कमांड सेंटर स्क्रीनमध्ये गाना प्रीमियम आणि वेदर यांसारखे अॅप्स आधीपासूनच असणार आहेत. एमजी हेक्टरला क्लाउड सेवा पुरवणाऱ्या मायक्रोसॉफ्टद्वारे ही सिस्टिम सिक्युअर करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या एसयुव्हीच्या पुढील आणि मागील बाजूला डिस्क ब्रेकसह, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट हे फीचर्स आहेत. सर्व व्हेरिअंट्समध्ये हे फीचर्स दिले जातील.

पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1.5 लिटरचं टर्बो चार्ज्ड इंजिन आहे. हे इंजिन 143PS पावर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तर, डिझेल व्हेरिअंटमध्ये 2.0 लिटर इंजिन असेन. हे इंजिन 170Ps पावर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या शानदार एसयुव्हीची किंमत 15 ते 20 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.