करोना व्हायरसच्या संकटकाळात एमजी मोटर इंडियाने मदतीचा हात पुढे केलाय. करोनाविरोधात लढा देणारे देशभरातील डॉक्टर, चिकित्सा विभागातील कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी ‘१०० हेक्टर एसयूव्ही ’ उपलब्ध करुन देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सर्व कार निःशुल्क अर्थात इंधन आणि चालकांसहित उपलब्ध करून दिल्या जातील.

‘लॉकडाउनमध्ये राज्य सरकारच्या नियमांनुसार आणि आपल्या पॅन इंडिया डीलर नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी या १०० एमजी हेक्टर वाहनांची सेवा पुरवेल. डॉक्टर, चिकित्सा विभागाचे कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे फ्रंटलाइन वॉरिअर्स सुरक्षितरित्या प्रवास करू शकतील, याची खबरदारी कंपनीतर्फे घेतली जाईल. मे २०२० च्या अखेरपर्यंत सर्व कार इंधन आणि चालकांसहित उपलब्ध करून दिल्या जातील’, असे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच, या कार नुकत्याच सुरू झालेल्या ‘एमजी डिसइन्फेक्ट अँड डिलिव्हर’ या प्रक्रियेचे पालन करतील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

एमजी मोटर सध्या या साथीच्या काळात विविध समूहांना मदत करत आहे. तसेच कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी आरोग्य व स्वच्छता किट, पीपीई किट, सर्जिकल मास्क, हातमोजे, सॅनिटायजर, सॅनिटायझर स्प्रेअर, खाद्य आणि रेशन किट वितरीत केले आहेत. एमजी मोटर यूकेने देखील कोव्हिड-१९ या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी संपूर्ण ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) पुरवणाऱ्या संस्थांना १०० एमजी झेडएस ईव्ही कार दिल्या आहेत.