बराक ओबामांची अमेरिकन अध्यक्षपदाची दुसरी टर्म पूर्ण झाल्यावर ते सहकुटुंब निवांतपणे वेळ घालवत आहेत. अध्यक्षपदाची सूत्रं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोपवल्यावर ते कुटंबासोबत अनेक ठिकाणी सहलींना जात आहेत. ओबामांचे वाॅटर स्केटिंग करतानाचा फोटो गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता नेटकरांच्या चर्चेत आहे तो मिशेल ओबामांचा लूक
गेली आठ वर्ष मिशेल ओबामा त्यांच्या ग्रेसफुल स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिध्द होत्या. त्याचे ‘एलिगंट’ आणि राॅयल वाटणारे ड्रेसेस, त्यांचं एकूणच वावरणं हे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. पण आता त्यांचा मेकअपशिवायचा फोटो नेटवर व्हायरल झालाय आणि त्याची सगळीकडे चर्चा होतेय.
या फोटोमध्ये मिशेल ओबामा अगदी साधी हेअरस्टाईल करून दिसत आहेत. जन्मत: त्यांचे केस कुरळे आहेत. पण गेली आठ वर्ष त्या त्यांचे केस ‘स्ट्रेटनिंग’ करता वावरायच्या. आता व्हायरल झालेल्या त्यांच्या फोटोमध्ये त्यांनी केसांवर कोणतीही ट्रीटमेंट न करता बांधले आहेत. त्यांचा हा नॅचरल लूक सगळ्यांना आवडतोय.
त्याचबरोबर कृष्णवर्णीय स्त्रियांच्या समाजातल्या स्वतंत्र ‘आयडेंटिटी’च्या त्या एक प्रतीक बनल्या आहेत. समाजातल्या तथाकथित सौदर्याची परिमाणं झिडकारणाऱ्या आणि आपल्या निसर्गदत्त सौदर्याला आपलंसं करू पाहणारी त्यांचा हा लूक सगळ्यांना जाम आवडतोय.
कृष्णवर्णीयांचे केस बऱ्याचदा कुरळे असतात. अमेरिकन समाजात ते अनेकदा हेटाळणीचं प्रतीकही होतं. मिशेल ओबामांनी गेली आठ वर्षं त्यांचे केस स्ट्रेटन केल्यामुळे अमेरिकेतल्या अनेक कृष्णवर्षीयांनी नाराजी व्यक्त केली होती. मिशेल ओबामांनी त्यांचे केस कुरळेच ठेवायला हवे होते असं मत बऱ्याचजणांनी व्यक्त केलं होतं.
पण काही का असेना राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी या नात्याने औपचारिक जंजाळातून बाहेर आलेल्या मिशेल ओबामा यांचा हा निवांत लूक सगळ्यांना आवडतोय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 8:29 pm