भारताने बंदी घातलेल्या इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप टिकटॉकवर अमेरिकाही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात आघाडीची माइक्रोसॉफ्ट कंपनी TikTok चा अमेरिकेतील व्यवसाय हस्तगत करण्याच्या विचारात आहे. टिकटॉकचे अमेरिकेतील सर्व हक्क आणि ‘ऑपरेशनल राईट’ खरेदी करण्याची तयारी माइक्रोसॉफ्टने केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा मुद्दा सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी आणण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनीही रविवारी राष्ट्रपती टिकटोकविरूद्ध कडक कारवाईची घोषणा करणार आहेत,असे सांगितले होते. त्यानंतर माइक्रोसॉफ्टने टिकटॉकची मालकी असलेल्या बाइटडान्स कंपनीसोबत बोलणी थांबवल्याची चर्चा होती. पण रविवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माइक्रोसॉफ्टने, चिनी मालकीच्या टिकटॉकशी अमेरिकेतील व्यवसाय हस्तगत करण्याबाबत चर्चा करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. “माइक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर माइक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकटॉकच्या खरेदीबाबत चर्चा सुरू ठेवण्यास तयार आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, १५ सप्टेंबरपर्यंत माइक्रसॉफ्ट आणि टिकटॉकचा करार अंतिम टप्प्यात पोहोचेल.

दरम्यान, भारताने चीनच्या टिकटॉकसह एकूण १०६ अ‍ॅप्लिकेशनवर बंदी घातली आहे. त्यामुळे टिकटॉकला अगोदरच मोठा झटका बसला आहे.