गूगल हा जगभरातील इंटरनेट सर्च इंजिनचा बादशाह. इंटरनेटच्या सुरुवातीची काही र्वष सोडली तर गेल्या दोन-अडीच दशकांपासून ‘गूगल सर्च’ हे इंटरनेटवरील शोधाचं हमखास माध्यम आहे. गूगलच्याच अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर गूगलचंच ‘सर्च’ असणं, हेही त्याचं कारण. पण आता गूगलने ‘सर्च’ अ‍ॅपच्या बाबतीत स्पर्धक कंपन्यांच्या ‘सर्च इंजिन’साठीही दार खुलं केलं आहे. गूगलच्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर लवकरच मायक्रोसॉफ्ट कंपनीचं ‘बिंग सर्च’ हे अ‍ॅप झळकणार आहे. खुद्द गूगलनेच याची घोषणा केली आहे.

गूगलचं सर्च इंजिनसोबत प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या सर्च इंजिनचाही वापरकर्त्यांना अनुभव मिळावा, याकरिता गूगलने अशा सर्च इंजिनकरिता लिलाव आयोजित केला होता. या लिलावाचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनीचं बिंग हे अ‍ॅप जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्ससह १३ देशांतील अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर झळकणार आहे.

गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील संघर्ष छुपा राहिलेला नाही. गूगल क्रोमपासून मोबाइलवरील विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीमपर्यंत या दोघांत चढाओढीचे प्रकार सातत्याने घडतच असतात. मात्र आता ‘बिंग’च्या निमित्ताने या दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी झाली आहे. विशेष म्हणजे, वापरकर्ते ‘बिंग’ला आपल्या फोनवरील ‘डिफॉल्ट सर्च इंजिन’ म्हणून त्याची निवडही करू शकतील.