ज्या मुली लवकर वयात येतात त्यांच्यात अर्धशिशीचा आजार जडण्याची जोखीम जास्त असते असे एका अभ्यासात संशोधकांना दिसून आले आहे. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जेव्हा पाळीचे चक्र सुरू होते तेव्हा डोकेदुखी सुरू होते (अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे) असे यापूर्वीच्या संशोधनातही दिसून आले आहे. पण यात नेमक्या कुठल्या टप्प्यांवर थेलार्ची व पुबार्ची हे डोकेदुखीचे टप्पे मेनार्चीत सुरू होतात याचा सखोल अभ्यास  झालेला नाही  तो यात करण्यात आलेला आहे.

मुलांना पौगंडावस्थेत अर्धशीशी जडण्यापेक्षा मुलींना त्या अवस्थेत ती जडण्याचे प्रमाण जास्त आहे.  अमेरिकन हेडेक सोसायटीला हा संशोधन अभ्यास सादर करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, शाळेत जाणाऱ्या दहा टक्के मुलींना अर्धशिशीचा  त्रास होतो, पौगंडावस्था जवळ येते तसे मुलींमध्ये अर्धशिशी वाढते. वयाच्या सतराव्या वर्षी ८ टक्के मुले व २३ टक्के मुलींना अर्धशिशीचा अनुभव येतो.

संशोधक व्हिन्सेन मार्टिन यांच्या मते जेव्हा मुलींमध्ये मासिक पाळी  सुरू होते तेव्हा त्या टप्प्यात त्यांच्यातील अर्धशिशीचे प्रमाण वाढते. याचा अर्थ त्याची सुरुवात त्याआधीच झालेली असते. सरासरी सोळा वयोगटातील मुला-मुलींची पाहणी यात करण्यात आली. ज्या मुलींमध्ये अर्धशिशी असते त्यांच्या स्तनांचा विकास हा नियोजित वेळेआधीच होतो व पाळीही लवकर येते, असेही निष्कर्ष यात काढण्यात आले आहेत. एस्ट्रोजेनमुळे पहिल्यांदा अर्धशिशी सुरू होत असावी असा प्राथमिक अंदाज आहे.