राज्यातील सहकारी, तसेच खासगी दूध संघांकडून गाय तसेच म्हैस दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाईच्या दुधाची विक्री प्रतिलिटर ४६ वरून ४८ रुपये या दराने, तर म्हशीच्या दुधाची विक्री प्रतिलिटर ५६ वरून ५८ रुपये या दराने होणार आहे. नवीन दरवाढ रविवारपासून (१२ जानेवारी) पासून लागू होईल. गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २९ वरून ३१ रुपये करण्यात आला आहे, तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर ४२ रुपये प्रतिलिटर हा खरेदी दर कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात दुधाच्या संकलनात अपेक्षित प्रमाणात वाढ झालेली नाही. मात्र, पावडरच्या दरवाढीमुळे दुधाला मागणी वाढली आहे.

दूध पावडरचे भाव प्रतिकिलो ३०५ ते ३१० रुपये झाले असून ही वाढ सातत्याने सुरू आहे. परिणामी, जादा भाव देऊन पावडर उत्पादनासाठी दुधाची पळवापळवी सुरू असून या पार्श्वभूमीवर दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्यावर शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्यालयात कल्याणकारी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के होते. संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर आणि सहकारी व खासगी दूध संघाचे एकूण ७३ संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.