सध्याच्या धकाधकीच्या जीवानात वेळ काढून स्व:तच्या अंर्तमनाशी संवाद साधणे फारच जिकीरीचे झाले आहे. योग्य मानसिक संतुलन  राखायचे असल्यास नियमित ध्यानधारणा करणे अपरिहार्य असते. आजकाल अनेक प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून प्रभावीपणे ध्यानधारणा कशी करावी, याचे विविध मार्ग शिकविले जातात. त्यापैकी ‘माइंडफुलनेस’ हे तंत्र सध्या ध्यानधारणेसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे समोर आले आहे. ‘माइंडफुलनेस’ हे तंत्र व्यक्तीला फक्त वर्तमान काळात जगण्यासाठी उद्युक्त करते. त्यामुळे व्यक्तीचे लक्ष फक्त वर्तमानावर केंद्रित होऊन, काही काळासाठी त्याला भूतकाळातील अपयश किंवा भविष्यातील आव्हानांचा विसर पडतो. या तणावविरहीत परिस्थितीमुळे सकारात्मक दृष्टीकोन वाढीला लागून व्यक्तीच्या उत्पादनक्षमतेत भर पडते असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशातील अनेक उद्योग कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमधील नेतृत्वगुणांचा विकास व्हावा यासाठी , या तंत्राचा प्रत्यक्षात उपयोग करण्यास सुरूवात केली आहे.  तंत्रज्ञान क्षेत्रातील अॅपल कंपनीचे जगप्रसिद्ध सीईओ स्टीव्ह जॉब्ज यांनीसुद्धा ‘माइंडफुलनेस’ ची उपयुक्तता मान्य केली होती.