मिनोसायक्लिन या नवीन प्रतिजैवकाच्या मदतीने मेंदूच्या ऱ्हासामुळे होणारे रोग नियंत्रित ठेवता येतात असे गोल कृमींवर करण्यात आलेल्या प्रयोगातून दिसून आले आहे. या प्रयोगात त्यांचा जीवनकाल वाढलेला दिसून आला. अमायट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस, अल्झायमर, पार्किन्सन व प्रियॉन यासारख्या आजारात त्याचा आगामी काळात उपयोग करता येऊ शकतो. इलाइफ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून वयपरत्वे होणाऱ्या विकारांवर मिनोसायक्लिन हे औषध उपयोगी ठरत आहे.

वयानुसार मेंदूत प्रथिनांचे थर जमत जातात, त्यामुळे अनेक रोग होतात. मिनोसायक्लिन या औषधामुळे हे थर जमण्यास विरोध होतो व प्रथिनांचे उत्पादन व त्याची विल्हेवाट यांची प्रक्रिया म्हणजे प्रोटिओस्टॅटिस संतुलित राहते. वयोमानानुसार प्रोटिओस्टॅटिस प्रक्रियेतील समतोल बिघडत जातो ,त्यामुळे हा समतोल साधला तर मेंदूचे रोग होणार नाहीत. प्रथिनांचे थर जमणे हे यातील पहिले लक्षण असते असे अमेरिकेतील स्क्रिप्स रीसर्चचे प्राध्यापक ग्रेगरी सोलिस यांनी सांगितले. मिनोसायक्लिनमुळे प्रथिनांचे साठणे कमी होऊन सजीवांचा जीवनकाल वाढतो. केनॉरहॅबडिटीस एलेगन्स या कृमीवर एकूण २१ औषधी रेणूंचा प्रयोग करण्यात आला. त्यात सर्वच औषधांनी चांगला परिणाम केला, पण वयाने जास्त असलेल्या कृमींवर मिनोसायक्लिनने आणखी जास्त परिणाम केला त्यामुळे त्याचे महत्त्व वेगळे आहे. सजीवांमधील प्रथिन निर्मितीचा कारखाना असलेल्या रायबोसोमवर या औषधाचा परिणाम होतो, त्यामुळे प्रथिनांची अतिरिक्त निर्मिती टळते.