डॉ. नितीन पाटणकर – response.lokprabha@expressindia.com
शर्करायोग
प्रथिनांच्या बाबतीत लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज आहेत. त्यात हा विषय मधुमेदाशी जोडला तर आनंदीआनंद म्हणावे अशी परिस्थिती असते.

गैरसमजांबाबत अग्रमानांकित विषय म्हणजे आहारातील प्रथिने. या विषयात गैरसमज करून घेतलेले किंवा घेऊ इच्छिणारे लोक असंख्य आहेत. बरे ही मंडळी आपले गैरसमज आपल्याच जवळ ठेवू या म्हणून थांबत नाहीत. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे; शहाणे करून सोडावे, सकळ जन’ हे ब्रीद त्यांनी फारच मनावर घेतलेले असते. रस्त्यावरील तसंच गटारे, कचरापेटय़ा, इमारतीतील जिने इत्यादी ठिकाणचे डास हुसकावून लावण्यासाठी एक पांढराधोप धूर सोडतात. तो मग सगळीकडे पसरत जातो आणि सर्व आसमंत धुरकट होते. तसाच आपल्या प्रथिनांबद्दलच्या गैरसमजांचा धूर सोडणारे अनेक जण असतात. (हा धूर सोडल्यामुळे बाहेरचे सगळे डास घरात शिरतात असा अनेकांचा अनुभव आहे). त्यात मधुमेद हा विषय जोडीला आला की मग, ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदीआनंद झाला’ अशी अवस्था होते.

नुकतीच एक चित्रतारका माझ्या क्लिनिकमध्ये आली. तिला कामाचे खूप ‘लोड’ असल्याने, खूप ‘लो एनर्जी आणि ‘विकनेस लाइक’ इशू होते. तिला फॅमिलीमध्ये ‘हाय मात्रामें’ डायबीटीस होता. त्या स्ट्रेसमुळे तिला ‘अंडरआइज डार्क सर्कल’ पण होते. तिला ‘हाय प्रोटीन पाहिजेत’ असं अनेक ‘इन द नो हाऊ’ असलेल्या लोकांनी सांगितले होते. तिच्या ‘वुडबी हसबँडच्या मदरने’ तिला ‘डॉक्टर को पूछे बगर कुछ नही लेना’ असं सांगितल्यामुळे ती माझ्यासमोर आली होती. सिनेमात स्मृतिभ्रंश झालेले लोक ‘मैं कौन हूं’ असा प्रश्न विचारतात. मी ही कधीकधी क्लिनिकमधून बाहेर पडलो की प्रश्न विचारतो स्वत:ला, ‘माझी मातृभाषा कुठची आहे बरं?’ तर ही तारका आणि तिची एक पाठराखीण अशा दोघी समोर बसल्या. तिच्याबरोबरची ताई बोलू लागली. ‘‘डॉक, यू ओनली हॅव टू टेल हर, शी नीडेड प्रोटीन. इफ शी वान्ट टु सरवाईव इन धिस इंडस्ट्री, शी नीडेड प्रोटीन. प्रोटीन इज नॉट देअर इन वेज इटिंग. शी नीडेड फर्स्ट क्लास प्रोटीन. आय अ‍ॅम टेलिंग अ‍ॅण्ड टेलिंलग हर टाइम टु टाइम, बट नॉट लिसनिंग ओन्ली. लास्टली आय थॉट, अ गोल्डवर्कर शुड मेक अ होल इन हर इयर.’’ या शेवटच्या वाक्याचा अर्थ ज्यांना वाचताक्षणी उमगला असेल, त्यांनी आपला आय. क्यू. १२५ च्या पुढे आहे हे छातीठोकपणे सांगायला हरकत नाही. तर हे फर्स्ट क्लास प्रोटीन ही काय भानगड असते ते बघूया. अनेकांना नॉनव्हेज म्हणजे फर्स्ट क्लास असा समज असतो. नॉनव्हेज खाणारे अनेक जण व्हेज जेवणाकडे आणि व्हेजिटेरिअन लोकांकडे, विमानात फर्स्ट क्लास तिकीट काढलेले लोक, रांगेतल्या इकॉनॉमी क्लासच्या लोकांकडे जसे बघतात तसे नेहमी बघतात.

प्रथिने ही अनेक छोटय़ा तुकडय़ांची माळ असते. त्या तुकडय़ांना ‘अमायनो अ‍ॅसिड’ म्हणतात. यातील काही तुकडे हे शरीरात बनू शकत नाहीत, तर ते आहारातूनच घ्यावे लागतात. अशा अमायनो अ‍ॅसिडना ‘अनिवार्य’ अमायनो अ‍ॅसिड म्हणतात. सामिष अन्नात रोजच्या रोज लागणारी सर्व अनिवार्य अमायनो अ‍ॅसिड पुरेशा प्रमाणात असतात. डाळी, धान्य, दूध इत्यादी पदार्थात यातील एखादे अनिवार्य अमायनो अ‍ॅसिड नसते किंवा पुरेशा प्रमाणात नसते. म्हणून त्यांना अपूर्ण म्हणता येईल आणि अंडी, मांस यांना पूर्ण म्हणता येईल. यात गोम अशी आहे की पूर्ण किंवा अपूर्ण प्रथिने पहिल्यांदा त्यांच्या स्वतंत्र अमायनो अ‍ॅसिडमध्ये मोडली जातात आणि मग ती शरीरात शोषली जाऊन, पुन्हा हव्या त्या क्रमाने जोडली जाऊन त्यांचे माणसाच्या पूर्ण प्रथिनात रूपांतर होते. म्हणून अंडे खाल्ले किंवा बेसनभरले अळूचे उंडे खाल्ले तरी शरीरात त्यापासून माणसाला हवे ते प्रथिन बनते. म्हणूनच दोन अपूर्ण प्रथिनांचे स्रोत वापरून पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. प्रथिने मिळविण्यासाठी म्हणून सामिष आहार घ्यायलाच हवा असे नाही. मधुमेद झाला, म्हणून प्रथिनांसाठी शाकाहारी माणसाने मांसाहारी व्हायची गरज नाही. तडजोड म्हणून अंडी खायला सुरुवात करण्याचीही गरज नाही. हल्ली व्हे आणि सोय हे शाकाहारी स्रोत उपलब्ध आहेत आणि ते सर्व ‘अनिवार्य’ अमायनो अ‍ॅसिडनी पूर्ण आहेत. हे सगळं मी त्या तारकेला सांगितले तेव्हा तिची सखी म्हणते कशी, ‘‘ये सब सही है, मगर आप जो प्रोटीन बोल रहे हो, सोय और व्हे, वो बडे डब्बेमे आता है, वो लेनेसे किडनी पर बुरा असर होता है, इसलिए हम उसे अ‍ॅडवाईज नही करते. इसके घर मे सबको डायबीटीस है, इसलिए मंने उसके घरवालोंको कम प्रोटीन खाने को बोला है.’’

यातील तथ्य पाहू. सोय किंवा व्हे प्रोटीनने किडनीवर ताण येतो हे असत्य आहे. खरी परिस्थिती अशी आहे की, कुठल्याही स्वरूपात अति प्रथिनांचे सेवन झाले तर किडनीवर ताण येणारच; पण अति म्हणजे किती? वजनाच्या प्रत्येक किलोमागे दोन ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन्स खाल्ले तर ताण येऊ शकतो किडनीवर. इतके व्हेज प्रोटीन सोडाच इतके नॉनव्हेज प्रोटीनही आपण खात नाही.

दुसरा मुद्दा डायबीटीस झालेल्यांनी खूप कमी प्रोटीन खायला हवीत, हेही पूर्ण चुकीचे आहे. डायबीटीस झाल्यानंतरही वजनाच्या प्रति किलोमागे एक ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते. किडनीचे काम खूप खालावले असेल तेव्हाच प्रोटीन्स कमी करण्याची गरज असते.

त्या तारकासखीचे बोलणे ऐकून मला वाटले होते की, ती डाएटिशिअन असावी; पण एकूण तिची मते ऐकून तसे वाटेना. शेवटी मी त्या तारकेला विचारले की, ही ताई कोण आहे? उत्तर ऐकून मी उडालोच. ती ताई तारकेची हेअर ड्रेसर होती; पण ती, ‘खूप क्लेवर आणि डाएटमधला एक्सपीरिअन्स’ असलेली होती. लोकांचा हल्ली शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. तसं नसतं तर त्यांनी होमिओपॅथीची औषधे देणारा इंजिनीअर, मार्केटिंग करता करता झालेला आहारतज्ज्ञ, एम.बी.ए. केलेला मधुमेहतज्ज्ञ अशा शिक्षणरहित तज्ज्ञांवर विश्वास ठेवलाच नसता.

मधुमेद झाला की कर्बोदके म्हणजे काबरेहायड्रेट्स कमी खायला लागतात. याचसोबत एकूणच खाणे कमी ठेवायला लागते. अनेक जण हा दुसरा भाग विसरतात. बटाटा आणि भात कमी करून आहारात डाळी, कडधान्य यांचे प्रमाण वाढवतात. डाळी आणि कडधान्य म्हणजे प्रोटीन्स असा अनेकांचा समज असतो.

धान्य आणि कडधान्य यांची तुलना करू या. धान्य म्हणजे तांदूळ, गहू, नाचणी इत्यादी. डाळी म्हणजे मूग, तूर, चणा इत्यादी. धान्यात साधारण सात टक्के प्रोटीन्स आणि ९३ टक्के काब्र्ज असतात. डाळींमध्ये १७ टक्के प्रोटीन्स आणि ८३ टक्के काब्र्ज असतात. फक्त दहा टक्के कमी काब्र्ज. या पुढची आकडेमोड ज्यांना गणितात गती आहे त्यांनी करावी. बाकीच्यांनी समजून घ्यावे की धान्य कमी खाऊन जर डाळीचं प्रमाण वाढवलं तरी आहारातील काब्र्ज फार कमी होत नाहीत आणि डाळी आणि कडधान्यं ही फक्त प्रोटीन्स नाहीत. म्हणूनच मधुमेद झाल्यावर शाकाहारी लोकांच्या आहारातून जास्त पिष्टमय पदार्थ पोटात जातात, त्यामुळे त्यांना व्यायाम, औषधे आणि आहारावर नियंत्रण यांची मिश्राहारी किंवा मांसाहारी लोकांपेक्षा जास्त गरज असते.

काही शाकाहारी लोक सोयाबीन आणून ते धान्यात मिसळून त्याची पोळी, भाकरी, चिल्ला बनवतात. यामुळे सोयाबीनमधील प्रोटीन्समुळे आहारातील प्रोटीन्सचे प्रमाण वाढते, त्यातील फायबरमुळे एकूणच काब्र्ज कमी होतात. हे करताना सोयाबीन उच्च तपमानाला तापवून दळले नसेल तर त्यातून पुढे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. घरी श्रीखंड बनविताना, चक्का टांगून ठेवला तर जे पाणी निथळून जमा होते त्याला व्हे म्हणतात. या पाण्यात व्हे प्रोटीन असतात पण अत्यल्प प्रमाणात. या पाण्याचा वापर व्हे प्रोटीन म्हणूनही अनेक जण करतात. हत्तीची तहान भागवायला पळीभर पाणी देण्यासारखे आहे हे.

अनेकदा आपण भाज्यांकडे फक्त फायबर म्हणून बघतो. पण पालेभाजीमध्ये साधारणपणे दर १०० ग्रॅममागे तीन ग्रॅम प्रोटीन असते. हिरव्या वाटाण्यात ते पाच ग्रॅम असते. जे लोक स्नायूंवर ताण देणारे व्यायाम करीत नाहीत त्यांची प्रोटीन्सची गरज खूप कमी असते. शरीरात प्रोटीन्सचे रीसायकलिंग फार उत्तम प्रकारे होते. रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी खरे तर दिवसाला २० ते ३० ग्रॅम प्रोटीन्स पुरेशी असतात. मधुमेद झाला किंवा व्हायची शक्यता असेल तर इन्सुलीन उपयोगात न आणता साखर जाळण्याची थोडी तरी सोय असावी लागते. स्नायूंच्या समताण या प्रकारचे व्यायाम करून इन्सुलिनला मदत करता येते. म्हणून मधुमेद असेल तर थोडी जास्त प्रथिने लागतात. हे प्रमाणही अवाच्या सवा नसते. साधारण ५० ते ६० ग्रॅम प्रोटीन पुरेशी होतात.

मधुमेद झाल्यानंतर लक्षात ठेवायच्या गोष्टी.

१) स्नायूंचे समताण व्यायाम रोज करणे.

२) प्रोटीन्सच्या सोर्सप्रमाणे त्यासोबत येणारी काब्र्ज मोजून, दिवसभरात किती चालायला हवे ते ठरविणे.

३) निदान ५० ते ६० ग्रॅम प्रथिने रोजच्या आहारातून मिळतील हे बघणे.

जाताजाता म्हणता येईल अशी एक गोष्ट. मधुमेद झाला असेल तर पॅनक्रियाजमधून इन्सुलिनप्रमाणेच इतर पाचक द्रव्यंही कमी पाझरतात. त्यामुळे बरेचदा अन्न पूर्ण न पचल्याने त्यातून ‘गॅस’ तयार होतो. जर पिष्टपदार्थ पचत नसतील तर तयार होणारा गॅस हा निर्वास असतो पण प्रथिने पचत नसतील तर तो गॅस दुर्वास असतो. निर्वास किंवा दुर्वास हे त्यांच्या राजमार्गाने कधी घोषणा देत तर कधी मूक मोर्चा काढून बाहेर पडतात. ‘चुपके चुपके’ सिनेमातल्या जीनियस जीजाजीप्रमाणे, काय पचत नाही हे अनेक जिनियस ‘सूंघ के बता सकते है’. पण निर्मात्याला हे लाजिरवाणे वाटू शकते. तेव्हा जाताजाता सांगायला हरकत नाही की मधुमेद झाला तर डायजेस्टीव एन्झाईम्स लागू शकतात.
सौजन्य – लोकप्रभा