स्वतंत्रपणे राहणाऱ्या वृद्धांच्या मेंदू, शरीर व इतर तंदुरुस्तीचे मापन करून त्यात वाढ करण्यासाठी संशोधकांनी एक उपयोजन (अ‍ॅप) तयार केले आहे. यात एका भारतीय संशोधकाचाही समावेश आहे. जेव्हा असंख्य रुग्ण असतील तेव्हा परिचारिकांना त्यांची काळजी घेण्यासाठी हे उपयोजन उपयुक्त आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपयोजने आहेत, पण त्यात केवळ माहितीला महत्त्व दिले जाते.
नॉटर डेम्स विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी सेंटर फॉर नेटवर्क सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन या केंद्राने ई -सीनियर केअर नावाचे अ‍ॅप तयार केले असून त्यामुळे त्यांची व्यक्तिगत माहिती घेतली जाते. त्यामुळे वृद्धांचे सक्षमीकरण होते, शिवाय त्यांची काळजी घेणे परिचरांना सोपे जाते. ज्येष्ठ नागरिक अडचणीत असतील तर ते मदत घेऊ शकतात त्यांना घरातील कुणाचीही गरज लागत नाही.
ज्येष्ठांचा संपर्क परिचर व परिचारिकांशी जोडला जातो. या अ‍ॅपच्या मदतीने ते स्वत:च्या आवाजात किंवा लिखित स्वरूपात संदेश पाठवू शकतात. यात वृद्ध व्यक्ती कमी फास्ट फूड, कमी कॅफिन अशी उद्दिष्टे ठरवून त्याची पूर्तता करू शकतात, त्यानुसार आरोग्य मार्गदर्शकांची मदत घेऊ शकतात. औषधांचे वेळापत्रक, नियोजन, रुग्ण इतिहास, औषधे लक्षात ठेवणे हे सगळे लिखित किंवा दृश्यचित्र स्वरूपात करता येते, हे अ‍ॅप इंटरअ‍ॅक्टिव्ह असून त्यात केव्हा औषधे चुकीची घेतली हेही समजते व त्यावर उपायही सुचवला जातो.
ई-सीनियर केअर या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामुळे बोधनक्षमता व मेंदूच्या कार्यातील सुधारणा शक्य होते, कारण त्यात शब्दकोडे व सुडोकू कोडी दिलेली असतात. काही मेंदूला काम देणारे गेम्स असतात. वृद्ध व्यक्ती प्रथम टॅबलेट अ‍ॅप वापरू लागले, तेव्हा ते तंत्रज्ञानाचा योग्य वापर करतील की नाही, अशी भीती होती किंवा ते वापरतील की नाही अशीही शंका होती, पण आता तसे राहिलेले नाही.
आता अ‍ॅपचे व्यक्तिगत स्वरूप बनवले असून त्याच्या वापरासाठी कुणाची मदत लागत नाही, असे नीतेश चावला यांनी सांगितले. माहिती व तंत्रज्ञान एकत्र आणून त्याचा वापर वृद्धांसाठी करण्याचा यात हेतू आहे, त्यामुळे वृद्धांचे सक्षमीकरण होते, असे हे अ‍ॅप तयार करणाऱ्या कंपनीचे संचालक चावला यांनी स्पष्ट केले.