‘लेनोवो’ने ‘मोटोरोला’ ही कंपनी ‘गुगल’कडून विकत घेतली व त्यानंतर मोटोरोला’चे मोबाइल ‘मोटो’ या नावाने विकण्यास सुरुवात केली. ‘मोटोरोला’चे ‘मोटो ई’, ‘मोटो जी’, ‘मोटो एक्स’ हे प्रकार प्रसिद्ध आहेतच; परंतु आता एक नवीन मालिका ‘मोटोरोला’ने सुरू केली आहे ज्याचे नाव आहे ‘मोटो एम’. एम हे अक्षर मेटलसाठी वापरण्यात आले असावे. कारण ‘मोटो एम’ हा मोटो आवृत्तीमधील पहिला पूर्णपणे मेटलबॉडी असलेला मोबाइल ‘लेनोवो’ने बाजारात आणला आहे. या मोबाइलमध्ये ५.५ इंचचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे आणि त्यावर गोरिला ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे मोबाइल स्क्रीनचे संरक्षण होईल. ‘मोटो एम’मध्ये मीडिआटेकचा हेलिओ पी १५ ऑक्टा कोर हा सीपीयू आणि माली टी ८६० एमपी २ हा जीपीयू वापरण्यात आला आहे. याच्या वापरामुळे तुम्ही लहान व मध्यम ग्राफिक्स असलेले गेम्स आणि अ‍ॅप हे सहजपणे व विनाअडथळा वापरू शकता. ‘मोटो एम’चे दोन प्रकार उपलब्ध आहेत. थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी व फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी. यात तुम्ही मेमरी कार्डचा वापर करून मेमरी स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोटो एममध्ये ३०५० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर संपूर्ण दिवस सहज वापरू शकता. बऱ्याचदा असे घडते की, आपल्याला बाहेर जायचे असते परंतु मोबाइलची बॅटरी संपायला आलेली असते, अशा वेळी एक तर मोबाइल चार्ज न करता किंवा अर्धवट चार्ज करून आपण बाहेर पडतो. मोबाइल पूर्ण चार्ज झालेला नसतोच, शिवाय बॅटरी कमी असल्यामुळे आपण त्याचा जास्त उपयोगही करू शकत नाही. म्हणूनच ‘मोटो एम’मध्ये बॅटरी जलद चार्ज होणारे तंत्र वापरले आहे, ज्यामुळे मोबाइल जलद चार्ज होऊन आपण त्याचा लगेच उपयोग करू शकतो. समजा, पावसाळ्यात मोबाइल भिजला किंवा घरी चुकून मोबाइलवर पाणी सांडले तर तो बंद पडण्याचा धोका असतो. ‘मोटो एम’मध्ये नॅनो कोटिंग हे तंत्र वापरले आहे, ज्याच्यामुळे मोबाइलवर थोडय़ाफार प्रमाणात पाणी पडले तरी कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही (परंतु ‘मोटो एम’ हा पूर्णपणे पाण्यापासून संरक्षित नाही). फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी यात पाठीमागे १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे तसेच दोन फ्लॅश देण्यात आले आहेत, ज्यामुळे कमी प्रकाशातसुद्धा चांगले फोटो येण्यास मदत होईल. मोबाइलच्या पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा उपयोग सेल्फी किंवा व्हिडीओ कॉलसाठी होऊ शकतो. ‘मोटो एम’ला दोन सिम कार्ड दिली आहेत; परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल फोरजी व्हीओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजीला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे आणि तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता.

तुम्ही मोबाइलमध्ये अधिक प्रमाणात गाणी ऐकत असाल तर ‘मोटो एम’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण चांगल्या दर्जाची आणि अधिक सुस्पष्ट गाणी ऐकायला येण्यासाठी ‘लेनोवो’ने या मोबाइलमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस हे तंत्रज्ञान वापरले आहे. ‘मोटो एम’मध्ये सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. मोबाइलच्या मागच्या बाजूस िफगरिपट्र स्कॅनर देण्यात आले आहे, ज्याचा उपयोग फोनचे अनलॉक काढण्यासाठी करू शकता. मोबाइलचे वजन १६९ ग्रॅम असून त्यामानाने हा मोबाइल जड आहे. ‘मोटो एम’ फक्त ऑनलाइन आणि सोनेरी, चंदेरी या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

फायदे
-नॅनो कोटिंग वापरल्यामुळे पाण्यापासून संरक्षण.
-जलद चार्जिंगला साहाय्य.
-मोबाइलमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस हे तंत्र वापरले आहे, ज्यामुळे गाणी अधिक सुस्पष्ट ऐकू शकता.
-गोरिला ग्लास लावली आहे, ज्यामुळे मोबाइल स्क्रीनवर ओरखडे पडले जाणार नाहीत.

तोटे
-उपलब्ध इतर मोबाइलच्या तुलनेत किंमत अधिक.
-दोन सिम कार्ड वापरणार असाल तर मेमरी कार्ड वापरू शकणार नाही.
-अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
-बॅटरी मोबाइलमध्ये बंद असल्यामुळे ती वापरकर्ता स्वत: काढू किंवा बदलू शकत नाही, त्यासाठी त्याला लेनोवोच्या सेवा केंद्रामध्ये जावे लागेल.

मोबाइल किंमत 
थ्री जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. १५,९९९/-
फोर जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी रु. १७,९९९/-

response.lokprabha@expressindia.com

सौजन्य- लोकप्रभा