टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)चा दावा
मोबाइल टॉवरमधील इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फिल्ड (ईएमएफ)मधून उत्सजिर्त होणाऱ्या किरणांचा देशातील वयस्क किंवा लहान मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या तज्ज्ञांनी खोडून काढला आहे.
गुजरात, केरळ, अलाहाबाद, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील उच्च न्यायालयांनी दिलेल्या विविध निकालांमध्ये ‘ईएमएफच्या’ किरणोत्सर्जनामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा सादर केला गेलेला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभाव्य धोका मनुष्याला नसल्याचे ट्रायचे सल्लागार अग्नेश्वर सेन यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या नॉन लॉनिजिंग रेडिएशन प्रोटेक्शन कमिशनने निर्देशित केलेल्या जागतिक पातळीनुसार देशात किरणोत्सर्जनाचे प्रमाण हे १/१० एवढे असल्याची माहिती सोमवारी ‘मानवी आरोग्यावर उत्सर्जनाचे होणारे परिणाम’ या विषयावरील परिषदेत आयोजित चर्चासत्रादरम्यान तज्ज्ञांनी दिली.
ट्रायचे प्रिन्सिपल सल्लागार सुरेश गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दूरसंचार विभागाकडून (डीओटी)ने नोव्हेंबर २०१३ पासून टेलिकॉमची सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांसाठी आखण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ईएमएफनुसार प्रत्येक टॉवरवर १० लाखांचा दंड आकारण्यात येत आहे. ट्राय आणि डीओटीकडून उत्सर्जनाविषयीची नियमावली अधिक कठोर केली गेली असून मोबाइल टॉवरमधून होणाऱ्या किरणोत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
दूरसंचार विभागाच्या अंमलबजावणी, साधन आणि देखरेख या विभागाने प्रत्येक वर्षी विविध स्थानके आणि छतांवरील टॉवरमधून होणाऱ्या ईएमएफ किरणोत्सर्जनाची पातळी ही १० टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील सिलिगुडीतील प्रकाशनगरमध्ये नियमांचे उल्लंघन होताना टॉवरची उंची निर्धारित उंचीपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याचे अधिकारी सुप्रियो दत्त यांनी सांगितले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)