|| वैद्य अश्विन सावंत

आधुनिक जीवनशैलीजन्य आजार म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, हायपोथायरॉईडिसम, कर्करोग, स्थूलता वगैरे. या असंसर्गजन्य आजारांमागे अनेक कारणे आहेत. मात्र आयुर्वेदाने सांगितलेले एक महत्त्वाचे कारण म्हणजे रात्री उशिरा जेवण!

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत घरामध्ये दिवेलागणीनंतर सात-साडेसातच्या सुमारास जेवण होत असे. परंतु काळ जसजसा पुढे जात आला आहे तसतसे रात्रीच्या जेवणाची वेळही वाढत चालली आहे. शहरवासीयांची रात्री अन्नसेवनाची सरासरी वेळ अकरा झाली आहे आणि कित्येक घरांमध्ये तर बारा, जेव्हा वास्तवात मध्यरात्र झालेली असते.

दिवसभर काम-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असल्याने दुपारी व्यवस्थित जेवण होत नाही. मग रात्री अगदी भरपेट जेवण केले जाते. यामुळे एकाच वेळी अधिक प्रमाणात अन्नसेवन होते.

महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदानुसार रात्री उशिरा शरीराचा अग्नी (भूक, पचनशक्ती व संपूर्ण चयापचय) हा पूर्णत: मंद झालेला असतो. अशा वेळी सेवन केलेले अन्न नीट पचत नाही. अशा वेळी अन्नाचे नीट विघटन न झाल्याने थोडे स्थूल आकाराचे अन्नकण तयार होतात. या मोठ्या आकाराच्या अन्नकणांना शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा विजातीय म्हणजे परकीय समजून उद्दिपीत होते आणि आपल्याच शरीरावर हल्ला चढवते. या सगळ्यामुळे शरीरावर दिसणाऱ्या परिणामांना आपण वेगवेगळ्या आजारांची नावे देतो, जे मुख्यत्वे ऑटोइम्युन डिसॉर्डर म्हणून ओळखले जातात. ज्यामध्ये विविध प्रकारचे अ‍ॅलर्जिक आजार, संधिविकार, त्वचाविकार, श्वसनविकार अगदी मधुमेहही येतो. आपलीच रोगप्रतिकार यंत्रणा आपल्याच शरीरकोशांवर का हल्ला चढवत असेल यावर खूप संशोधन होते. मात्र जीवनशैलीमधील या सर्वसामान्य मात्र गंभीर परिणाम करणाऱ्या घोडचुकीकडे तितक्या गंभीरतेने बघितलं जात नाही.

रात्री अग्नी मंद असतानाही जेवल्यामुळे अर्धवट पचलेल्या अन्नापासून ना शरीराला पर्याप्त ऊर्जा मिळते ना सकस शरीरकोश तयार होतात. ऊर्जा नाही म्हणजे थकवा आणि अनुत्साह तर निकस शरीरकोशांमुळे ना हृदय सक्षमतेने काम करत ना मस्तिष्क, ना सुदृढ स्नायू, ना उत्तम कांती, ना सक्षम रोगप्रतिकारक्षमता, ना निरोगी प्रजननयंत्रणा. अशा व्यक्तीचे शरीर दिसेल कदाचित मोठ्या आकाराचे. मात्र निकस कोशांपासून तयार झालेले आणि साहजिकच कमजोर व दुर्बल.

रात्री उशिरा परतणाऱ्या सर्व मंडळींनी सायंकाळी लवकर जेवण्याची काही ना काही सोय करावी. संध्याकाळी पोट भरेल असा चांगला आहार घ्यावा आणि घरी आल्यावर अन्नसेवन टाळावे. भूक असलीच तर संपूर्ण जेवण न जेवता भाज्यांचे सूप, फळे, शेंगा, बिया, सुकामेवा वगैरे हलका आहार घ्यावा.