आपण राहत असलेल्या देशातून बाहेर पडल्यावर आर्थिक नियोजनाचा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागतो. तुम्हाला तुमचे बँक खाते, गुंतवणुकी, मालमत्ता, कर इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. पण जर तुम्ही भारतात परतणार आहात, तर तुम्हाला इथल्या बाजारावर विशेष लक्ष ठेऊन आपले आर्थिक नियोजन करावे लागते. त्यामुळे एनआरआय लोकांना आपले आर्थिक नियोजन करणे सोपे व्हावे यासाठी काही खास टीप्स

भारतातील बँकेत एनआरओ / एनआरई खाते उघडा

जर तुम्ही एनआरआय असलात आणि भारतात तुमची कुठल्याही प्रकारची मिळकत सुरू असली, तर तुम्ही बँकेत एनआरओ खाते उघडून त्यात तो पैसा ठेवू शकता. विदेशातून भारतात पैसा पाठवून त्याला भारतीय चलनात जमा करण्यासाठी तुम्हाला एनआरई खाते उघडावे लागेल. एनआरई खाते कर-मुक्त असते. एनआरओ खात्यातील मिळकत करयोग्य असते.

भारतातील मालमत्ता सांभाळण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी करून घ्या

तुमची भारतात काही मालमत्ता असेल, तर तुमच्या वतीने त्याचे व्यवहार पाहाण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नियुक्त करावे लागेल. अशी व्यक्ती तुमचा एखादा मित्र किंवा नातलग, किंवा पगारी नोकरसुद्धा असू शकते. त्यांच्या नावाने तुम्हाला लिखित पॉवर ऑफ अॅटर्नी करून घ्यावे लागेल जेणेकरून ती व्यक्ती तुमच्या अपरोक्ष त्या मालमत्तेचे व्यवहार पाहू शकेल.

तुम्ही भारतात कुठे गुंतवणूक करू शकता?

भारत हे जगातील सर्वात जलद जीडीपी वाढणारे राष्ट्र आहे आणि तुम्हाला इथे गुंतवणूक केलीच पाहिजे. इथे स्थावर मालमत्ता, शेअर बाजार, म्युचुअल फंड, डिबेंचर्स, एनपीएस, बँक मुदत ठेवी इत्यादीसारखे अनेक पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्ही अमेरिका किंवा कॅनडाचे रहिवासी असलात तर मात्र तुम्हाला म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना काही मर्यादा असू शकतात, कारण फारच थोड्या म्युचुअल फंडांमध्ये या देशांतून गुंतवणूक स्वीकार केली जाते.

तुम्हाला आपला पैसा भारतीय बँकेत ठेवायचा असल्यास

परदेशात असताना जर तुम्हाला एखाद्या भारतीय बँकेत पैसा ठेवायची इच्छा असेल, तर अशी बँक शोधा ज्यांची शाखा तुम्ही राहाता त्या देशात असेल. जर तुम्ही काही काळासाठी किंवा कायमचे भारतात परतणार असलात, तर भारतीय बँकेत पैसा ठेवल्याचा फार उपयोग होतो.

चलन दराच्या चढ-उतारावर लक्ष ठेवा

भारतात गुंतवणूक करताना किंवा कर्ज घेताना तुम्हाला चलन-दराच्या चढ-उतारावर लक्ष ठेवायला हवे. विदेशी चलनाच्या भारतीय रूपयांच्या किंमतीत झालेला थोडा बदलसुद्धा तुमचा परतावा कमी-जास्त करू शकतो.

कर्ज घेण्याआधी सर्व पर्याय पडताळून पाहा

एनआरआय असल्यामुळे तुम्ही भारतीय बँकेकडून किंवा परदेशात तुमचे वास्तव्य असेल त्या देशाच्या बँकेकडून कर्ज घेऊ शकता. व्याजाचा दर, चलनवाढीचा दर, फी आणि चलन-दरातील चढ-उतार या सर्व बाबींना धरून कर्ज घेण्यासाठी उत्तम पर्याय निवडावा.

आपल्या कराची नीट व्यवस्था करा

एनआरआय असताना तुम्हाला भारताप्रमाणेच तुम्ही सध्या राहात असलेल्या देशाच्या कर-विधानाचे पालन करावे लागेल. एनआरआय आणि निवासी भारतीयांसाठी कर-विधानातील नियम साधारण सारखेच आहेत. तरीही तुम्ही कर-सल्लागाराकडून याबद्दल खात्री करून घेऊ शकता.

भारतीय अर्थकारणाच्या सद्यःस्थितीवर लक्ष ठेवा

जर भारतात तुमची मालमत्ता किंवा इतर गुंतवणूक असेल, तर तुम्हाला येथील अर्थनीति आणि नियमांतील बदलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या गुंतवणुकीवर कर विधानातील आणि आर्थिक नीतीमधील बदल यांचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे तुम्हाला याची माहिती असायला हवी.

आरोग्यविमा कव्हर घ्या

एनआरआय लोक इलाजासाठी भारतात येणे पसंत करतात कारण इथे त्यांचे लक्ष ठेवायला कुटुंबातील लोक असतात. अशा वेळेस भारतातील आरोग्यविमा पॉलिसी कामास येते. त्यासाठी दिलेल्या प्रीमियमवर कलम 80डी खाली तुम्ही भारतात कर-लाभासाठी पात्र असता. तरीही आपल्या पॉलिसीमधील भौगोलिक नियम वाचून पाहा, कारण जर तुम्ही सध्या राहात असलेल्या देशातच इलाज करून घ्यायचे ठरवले, तर कदाचित ते त्या पॉलिसीनुसार मान्य नसेल.

जर तुम्ही भारतात परत येणार असलात, तर

परदेशात गेल्यावर एक मोठा निर्णय तुम्हाला हाच घ्यावा लागतो – परदेशातच कायम राहावे किंवा भारतात परतावे. जर तुम्ही परत भारतात येणार असलात, तर तुम्हाला भारतात गुंतवणूक वाढवून परदेशातील कर्ज पूर्ण करणे भाग आहे. परतण्या आधी एक निधी ठेवून शक्य तेवढ्या लवकर मालमत्ता विकत घ्या. जर तुम्हाला परदेशात राहात असतानाच मालमत्ता विकत घ्यायची असेल, तर तुम्हाला त्याचे पैसे भारतीय चलनात, भारतीय बँकेमार्फत द्यावे लागतील.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार