रिमझिम
तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

फॅशन मेरे बस की बात नहीं, मी काय फॅशन करत नाही असं कितीही म्हटलं तरी प्रत्येक जण फॅशन करतच असतो. रोज बाहेर पडताना तुम्ही आज कोणते कपडे घालावे, या शर्टवर ही पॅण्ट छान दिसेल का किंवा यात मी जाड तर दिसत नाहीये ना असा विचार तर नक्कीच करता. म्हणजेच काय तर तुम्ही फॅशन करता, फॅशनचा विचार करता. प्रत्येक ऋतूनुसार आपली फॅशन बदलत असते किंवा ती बदलावीच लागते. अगदी ट्रेण्डिंग कपडे वगैरे तुम्ही घालत नसाल तरी कोणत्या ऋतूमध्ये कोणते कपडे घालावेत याचा विचार करावा लागतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण जेवढा कपडय़ांचा, फॅशनचा विचार करत नाही तेवढा जास्त पावसाळ्यात करावा लागतो. कारण तो विचार जर नाही केला तर आपली फॅशनेबल तारांबळ नक्कीच उडते.

पाऊस आणि फॅशन हे समीकरण जुळवून आणणं फार महत्त्वाचं असतं. कारण पावसाळ्यात आपण जरा जरी चुकलो की झालंच.. आपल्या फॅशनचे तीनतेरा वाजतात. आपण पाऊस आणि फॅशन या समीकरणाची सुरवात खरेदीपासून करू. आधी म्हटल्याप्रमाणे ऋतू बदलतात तशी फॅशन बदलते. साहजिकच हा बदल बाजारातही दिसून येतो. नवीन ऋतू, नवीन कलेक्शन. पण जसा एखादा ऋतू संपून पुढच्या ऋतूची चाहूल लागते तसे वेगवेगळे सेलही सुरू होतात. या सेलमधला एक प्रकार म्हणजे ‘स्टॉक क्लिअरन्स सेल’. लास्ट कलेक्शनमध्ये उरलेले कपडे त्यांना विकायचे असतात, कारण बाजारात नवीन कलेक्शन आणायचं असतं. अशावेळी आपण भरघोस सवलत आहे म्हणून भरपूर खरेदी करतो. पण आपण हे विसरतो की त्या सेलमध्ये असणारे कपडे किंवा अ‍ॅक्सेसरीज या आताच्या ऋतूमधे वापरताच येणार नसतात. अनेकदा सेलमध्ये घेतलेल्या गोष्टी या पुढच्यावेळी ट्रेण्डमध्ये असतीलच याची खात्रीही नसते. त्यामुळे पाऊस आणि या सेलमधील खरेदी थोडी विचारपूर्वकच करा. पावसाळी खरेदी म्हणजे स्वतचा पावसापासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असा समज असतो. पण ही पावसाळी खरेदी फक्त तेवढय़ापुरतीच नसते. आपल्याला आपल्या रोजच्या कपडय़ांचीही खरेदी विचारपूर्वक करायला हवी.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म

उन्हाळ्यात जसे आपण कॉटनचे कपडे घालतो तसे पावसाळ्यातही कॉटनचे कपडे घालायला काहीच हरकत नाही. कारण कॉटनचे कपडे लवकर सुकतात. पण १०० टक्के कॉटनचे कपडे मात्र चुकूनही घेऊ नका. कॉटन आणि दुसरं कापड एकत्र असणारे कपडे घ्या. कारण कॉटन पटकन सुकत असलं तरी त्यानंतर मात्र त्याचा वास येतो आणि ते अंगातून पटकन निघतही नाही. त्यामध्ये दुसरं कापड ब्लेण्ड केलेलं असेल तर तसा कमी वास येतो आणि अंगातून पटकन निघतं. या सोबतच आपण पावसाळ्यात चुकून जरी पारदर्शक कपडे वापरले तर भलतीच तारांबळ उडते. कारण अशा कपडय़ांमधून आपलं अंतर्वस्त्र, अंग  दिसतं आणि हे असं दिसणं आपल्याला कोणत्याही ठिकाणी लाज आणतं. त्यामुळे पावसाळ्यासाठी खरेदी करताना गडद रंगाचे आणि पारदर्शक नसलेले कपडे विकत घ्या. पावसाळ्यात पॉलिस्टर, नायलॉनचे कपडे घालावेत असं सांगितलं जाई. पण हेच कपडे जास्त पारदर्शक असतात, त्यामुळे तसे कपडे घेताना नीट लक्ष द्या. पावसाळा आला की नवनवीन, रंगीबेरंगी, फॅशनेबल रेनकोट, चप्पल, छत्र्या बाजारात येतात. पण प्रत्येक छत्री, रेनकोट हे फॅशनसोबतच आपली गरजही पूर्ण करेल असं होत नाही. उंचीला मोठय़ा असणाऱ्या, रंगीबेरंगी, सुंदर िपट्र असणाऱ्या छत्र्या मुली खरेदी करतात. त्या उंच दिसत असल्या तरी त्या उघडल्यावर मोठय़ा नसतात. छत्रीप्रमाणे रेनकोट घेतानाही आपण काही चुका करतो. रंग, डिझाइन आणि फिटिंग छान आहे म्हणून आपण रेनकोट लगेच विकत घेतो. पण रेनकोट घेताना या सगळ्या गोष्टीसोबत  रेनकोटचं कापड बरोबर आहे ना, त्यावरून पाणी ओघळून जाईल ना, त्याच्या सगळ्या चेनची नीट उघडझाप होत आहेत ना, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. रेनकोट शक्यतो दुकानातूनच खरेदी करा. त्याची खरेदी रस्त्यावर नकोच. पावसाळ्यात चपलांची ग्रीप नीट असणं अति महत्त्वाचं असतं नाही तर आहेच भर रस्त्यात आपला कपाळमोक्ष. कापडाचे बूट तर सुकता सुकत नाहीत आणि त्यांची दरुगधी तर वेगळीच. पावसाळ्यात चामडय़ाचे बूट किंवा चप्पल वापरली तर ती आपल्याला परत वापरण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बाजारात आलेले प्लास्टिकचे शूज, चप्पलच वापरा. पावसाळी फुटवेअरची खरेदी दुकानातूनच करावी असं काहीही नाही. रस्त्यावर घेतलेले फुटवेअरही छान टिकतात.  पावसाळ्यात घालायच्या दागिन्यांची निवडही नीट करावी. नाही तर दागिन्यांचा रंग जाणं, ते दागिने अंगाला लागून त्वचेला त्रास होणं असे प्रकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात कमीत कमी दागिने घाला. वॉटरप्रूफ, चांगला दर्जा असलेले दागिने घाला. सध्या चंकी दागिने जास्त ट्रेण्डिंग आहेत आणि ते पाण्याने खराबही होत नाहीत.
चला, तर मग आता पावसाळी खरेदीला.. या टिप्स मात्र विसरू नका.
सौजन्य – लोकप्रभा