पाऊस सुरू झाला की फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. ग्रुप, कुटुंब अथवा ऑफिस सहकाऱ्यांसोबत प्लॅन होतात. पावसाळा सुरु झाला कि वर्षासहलीपासून ते दुर्गभटकंतीपर्यंत स्वतःच्या कुवतीनुसार अनेक बेत रचले जातात. पावसामुळे डोंगर हिरवेगार झालेले असतात, डोंगरावरून धबधबे वाहात असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे नटलेली असतात. अशा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत असतानाच अमुक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे पर्यटकाचा मृत्यू, धबधब्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक वाहून गेले, धुक्यात पर्यटक जंगलात वाट चुकले अश्या बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे डोंगरदऱ्या, जंगलांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर भटकंतीला गेल्यावर विशेष काळजी घेतल्यास दुर्घटना टाळता येऊ शकतात. तर काही ठिकाणी पावसांमध्ये भटकंतीला न जाणे केंव्हाही चांगलेच. पावसाच्या विश्रांतीनंतर किंवा पावसाने निरोप घेतल्यास तुम्ही त्या ठिकाणी मनोसोक्त भटकंती करा.

भारताच्या शाश्वत साहस क्षेत्रातील तज्ज्ञ ट्रिप 360ने अशा काही पर्यटनस्थाळाची नावे सांगितली आहे. तिथे जाणं शक्यतो टाळणे योग्य ठरले. सुट्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये काही ठिकाणांवर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे परिणाम होत असल्याची चिंता वाढत आहे. ‘अतीपर्यटना’चा हा प्रकार या ठिकाणांच्या नाजूक पर्यावरण व्यवस्थेला धक्का लावत तिथे ताण निर्माण करत आहे. जागरूक पर्यटक ही काळाची गरज झाली असून आम्ही तुम्हाला काही ठिकाणे सुचवत आहोत, जी वगळणं या ठिकाणांसाठी भल्याचं होईल.

पावासात या ठिकाणी जाणे टाळा –

पेबे किल्ला – विकटगड पेब किल्ल्याला त्याचे नाव ‘पेबी’ नावाच्या देवीवरून मिळाले असून ती सह्याद्रीच्या कित्येक डोंगररांगांपैकी एक आणि समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंचीवर वसलेली आहे. हा मध्यम पातळीचा ट्रेक स्वतःला आव्हान देत पुढच्या पातळीवर जाऊ पाहाणाऱ्यांसाठी उत्तम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या स्वर्गीय स्थळाला अतीगर्दीचा सामना करावा लागत आहे. अतीगर्दीमुळे इथे पावसाळ्यात लोकांच्या रांगा आणि भरपूर कचरा पाहायला मिळतो. जबाबदार ट्रेकिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या ट्रेकर्सच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे इथल्या नाजूक पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हे ठिकाण वगळून तुम्ही त्याची अवस्था जपण्यासाठी एकप्रकारे मदतच करत आहात.

माहुली – मुंबईपासून तुलनेने जवळच्या अंतरावर वसलेला हा किल्ला ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला असून पावसाळ्यात पर्यटकांची बरीच गर्दी तिथे जमते. गुंतागुंतीच्या संरचनेमुळे हा किल्ला रॉक क्लाम्बर्समध्ये लोकप्रिय असून त्यांच्यासाठी स्वर्ग मानला जात आहे. याच्या उंच शिखरावरून हिरवीगार जमीन पाहाण्याचा आनंद घेता येतो, मात्र तिथे येणारे गर्दीचे थवे पाहाणं निश्चितच वेदनादायी असतं. पावसाळ्यात इथे ट्रेकर्सची जत्रा भरते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. उंच शिखर लाभलेला माहुली रोज शेकडो लोकांचं स्वागत करत असतो आणि आता ही संख्या लवकरच हजारांवर जाईल.

कळसूबाई – समुद्रसपाटीपासून 5400 फुटांवर वसलेल्या कळसूबाई शिखराला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हटलं जातं. इथं जाण्यासाठी रात्री केला जाणारा ट्रेक आणि गडावरून दिसणारा सूर्योदयाचा चौफेर देखावा यांमुळे कळसूबाई सर करणं हे कित्येक फोटोग्राफर्सचंही ध्येय असतं. या ट्रेकमध्ये आव्हानात्मक चढण असूनदरम्यान केवळ चार शिडीचे पॉइंट्स आहेत. कळसूबाई सर करणं इतकं कठीण असून तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली नाही. कळसूबाईला भेट देणाऱ्यांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. कित्येक संस्थांनी यापूर्वी इथे स्वच्छता मोहीम हाती घेतली असून कचऱ्याची समस्या इथलं भीषण वास्तव ठरत आहे. गडाच्या शिखरावर उडत राहाणारं प्लॅस्टिक पाहाणं हे निराशादायक असून कळसूबाईला अतिरेकी पर्यटनाचा फटका बसत असल्याचं चिन्ह आहे.

कलावंतिणीचा सुळका – कलावंतिणीची सुळका हा महाराष्ट्रातल्या सर्वात थरारक ट्रेक्सपैकी एक मानला जातो. पूर्वी टेहळणी बुरूजाप्रमाणे फायदेशीर ठरणाऱ्या या सुळक्यावरून दिसणारं दृश्य विहंगम असतं. दगडातून कोरून काढलेल्या पायऱ्या तुम्हाला या दृश्याकडे घेऊन जातात. कित्येक ब्लॉग्जनी या गडाला आवर्जून भेट देण्यासारख्या ठिकाणाचा दर्जा बहाल केलेला आहे. चढण्यास अवघड असूनही इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. तीव्र पायऱ्या निश्चितच घाबरवणाऱ्या आहेत, पण त्याहीपेक्षा या ठिकाणी दिसणारी पर्यटकांची रांग जास्त भीतीदायक असते. बेजबाबदार पर्यटकांमुळे इथली स्वच्छता तसंच निसर्गाला धोका उत्पन्न झाला आहे.

डोंगरांवर जाऊच नका
पावसाळ्यात डोंगराळ भागात किंवा रानमाळावर पर्यटनासाठी जाणे पर्यटकांनी टाळले पाहिजे. पावसाने डोंगराचा रस्ता निसरडा झालेला असतो. अशात माहिती नसताना कुणी पर्यटनासाठी गेल्यास डोंगरावरून पाय घसरून अपघाताला सामोरे जावे लागते. प्रसंगी काहींना प्राणदेखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगराळ भागात जाणे पर्यटकांनी टाळलेच पाहिजे, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

बॅकवॉटरचा मोह टाळावा
पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांच्या सर्वच ठिकाणच्या बॅकवॉटरला पर्यटकांची गर्दी होत असते. विशेष म्हणजे धरण परिक्षेत्रात जाणे गुन्हा असतानादेखील नेहमीच पर्यटक बॅकवॉटरला गर्दी करीत असतात. यात बॅकवाॅटरच्या पाण्याचा अंदाज नसल्याने पाण्यात उतरण्याचा मोह काही जणांकडून आवरत नाही. परंतु, असे करण्याने अनेकांना धरणांच्या बॅकवॉटरमध्ये जलसमाधी मिळाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे धरण परिक्षेत्रात जाणे टाळावे व गेल्यास पाण्यात उतरू नये, बॅकवॉटरचा मोह टाळावा, जेणेकरून संभाव्य धोका टळू शकेल.