मोटोरोला कंपनीने आपला नवा स्मार्टफोन Moto E6 सादर केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे यापूर्वीच्या मोटो E5 या फोनची अद्यायावत आवृत्ती आहे. आधीच्या मॉडलच्या तुलनेत या फोनमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत. नेव्ही ब्ल्यू आणि स्टेरी ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हा फोन सादर करण्यात आला असून अमेरिकेत या फोनची विक्री सुरू झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

या फोनमध्ये 5.5 इंच LCD डिस्प्ले असून स्नॅपड्रॅगन 435 SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. स्नॅपड्रॅगन 427 पेक्षा स्नॅपड्रॅगन 435 प्रोससर 50 टक्क्यांनी अधिक जलद असल्याचा कंपनीचा दावा आहे. अँड्रॉइड 9 पाय या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन कार्यरत राहणार असून यात 13 मेगापिक्सलचा रिअर आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय, ब्ल्यूटूथ 4.2, 3.5mm जॅक, जीपीएस आणि माइक्रोयूएसबी पोर्टचा पर्याय आहे. यात सिंगल नॅनो सिम स्लॉट देण्यात आलंय. फोनमध्ये 3,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज क्षमता या फोनमध्ये असून फोनचं वजन 159 ग्रॅम आहे.

भारतात हा फोन केव्हा लाँच होणार आणि याची किंमत किती असणार याची अद्याप घोषणा कंपनीकडून करण्यात आलेली नाही. मात्र अमेरिकेत याची किंमत 149.99 डॉलर (जवळपास 10 हजार 300 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.